
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद मिळविताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आधी एक दशांश सदस्य संख्येवरून घोडे अडले होते. त्यावर विधिमंडळ सचिवालयाने उत्तर दिले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस करणारे पत्र पाठविले. मात्र महाविकास आघाडीतील अन्य पक्षांनी पाठिंब्याचे पत्र अद्यापही दिलेले नाही. उलट, काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांनी लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
विधीमंडळातील सदस्य संख्येच्या किमान 10 टक्के बळ असलेल्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद द्यावे असा संकेत आहे. त्यानुसार या पदासाठी किमान 28 आमदारांची गरज असते आणि ती संख्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे नाही. मात्र, अशा संख्येचे प्रावधानच नसल्याची भूमिका या पक्षाने घेतली. त्यासाठी दिल्ली विधानसभेचे उदाहरण देखील दिले गेले. दिल्लीत भाजपचे तीन आमदार असूनही विरोधी पक्ष नेते पद दिले गेले होते. विधिमंडळ सचिवालयालाही असा काही नियम आहे का? याची माहिती द्यावी असे पत्र पाठवले.
त्यानुसार नियमपुस्तिकेत अशी कोणतीही अट नसल्याचे विधिमंडळ सचिवालयाने कळविले असल्याची माहिती आहे. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 'विरोधी पक्षनेता नेमा' आणि त्यावर भास्कर जाधव यांची नियुक्ती करा असे शिफारस पत्र विधिमंडळ सचिवालयाला दिले. पण त्यासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जोडपत्र नाही. मात्र अशा कोणत्याही जोड पत्राची गरज नसल्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाचा दावा आहे.
एकाच पक्षाची सदस्यसंख्या गृहित धरूनच विरोधी पक्षनेतेपद आजवर दिले गेले असल्याचे दाखले विधिमंडळ घटनातज्ज्ञांनी पुढे आणले असल्याचे समजते. नारायण राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले तेव्हा रामदास कदम यांना विरोधी पक्षनेता करण्याचा दावा सादर झाला होता, तेव्हाही युतीत सहभागी झालेल्या भाजपचे पाठिंबापत्र नव्हते, असे समजते. या घडामोडींकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष असतानाच आता काँग्रेसने लोकलेखासमितीचे अध्यक्षपद आम्हाला द्या, असा आग्रह धरला आहे.
लोकलेखासमिती ही सर्व समित्यांमध्ये अत्यंत महत्वाची समिती मानली जाते. या समितीचे अध्यक्षपद हे सामान्यतः विरोधी पक्षाला दिले जाते. लेख्यांवर लक्ष ठेवणे म्हणजे सरकारच्या कारभारावरच लक्ष ठेवणे आहे. हे पद भरा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. पक्षाने नेमलेले गटनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत तसेच माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे तिघेही या पदासाठी उत्सुक असल्याचे बोलले जाते. अर्थात, काँग्रेसमधील अंतर्गत स्पर्धा पाहता शरद पवार यांचा पक्षही या पदावर हक्क सांगू शकेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.