Dharashiv News : विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या शेवटचा दिवस शिल्लक राहिला आहे. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीच्या गोटात वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यातच महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले आहे. आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आठ जागा आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसचा पहिला उमेदवार ठरला आहे. धाराशिव-बीड-लातूरमधून नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. पहिल्याच वेळी जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या युवा नेत्याला उमेदवारी दिली आहे.
धाराशिव-बीड-लातूर मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. याठिकाणी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी तीन वेळा विजया मिळवला होता. आता या मतदारसंघातून काँग्रेसने जिल्हा परिषद सदस्य महेश देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महेश देशमुख सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोंहचली आहे.
धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महाविकास आघाडीकडून जागा काँग्रेसला (Congress) सुटली होती. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविवारी जिल्हा परिषद सदस्य महेश देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांनी पोस्ट शेअर करीत केली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील पक्षीय बलाबल पाहता याठिकाणी महायुतीचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे याठिकाणी महायुतीमधून पुन्हा भाजपला उमेदवारीची संधी मिळणार आहे. धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य मतदारसंघात एकूण 904 मते आहेत. त्यामध्ये भाजप 301, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 68, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 138 असे एकूण 537 सदस्य महायुतीचे आहेत तर काँग्रेस 155, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 32, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 54 असे एकूण 241 सदस्य महविकास आघाडीचे आहेत. त्याशिवाय अपक्ष 25, छोटे पक्ष व विविध आघाडीचे 78 मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे याठिकाणी महायुतीचा उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. अद्याप भाजपचा (BJP) उमेदवार ठरला नसल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी भाजपकडून चार नेत्यांची नावे दिल्ली दरबारी पाठविण्यात आली आहेत. त्यामध्ये माजी मंत्री व लातूर जिल्हा भाजपचे अध्यक्ष बसवराज पाटील, धाराशिव जिल्हा भाजप अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील-निलंगेकर व बीड जिल्ह्यातून सीएम फडणवीस यांचे एकेकाळचे स्वीय सहाय्यक व विश्वासू सहकारी ओमप्रकाश शेटे या चार जणांची नावे दिल्ली दरबारी पाठविण्यात आली आहेत. त्यापैकी एका नावावर रविवारी एकमत होऊन उमेदवारी जाहीर होणार असल्याची माहिती भाजपमधील विश्वसनीय सूत्राने दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.