
Dispute Appointment of Guardian Minister : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथे जाण्याआधी केलेल्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्या आता वादात सापडल्या आहेत. तर महायुतीतील पक्षांमध्येच हमरी-तुमरी होत आहे. यावरून विरोधकांनी देखील सत्ताधारी महायुतीवर निशाना साधत टीका करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान रायगडमध्ये नियुक्तीच्या पहिल्याच दिवशी वाद उफाळला येथे मंत्री गोगावले यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.
आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या वादात उडी घेतली आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मंत्री भरत गोगावले यांनीदेखील उत्तर दिल्याने वाद वाढतच चालला आहे. पण या प्रकरणात अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रीया दिलेली नाही. की शिवसेना प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. यामुळे रायगडमध्ये उफाळलेला महायुतीतील वाद कधी शमणार असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.
रायगडमध्ये आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री नियुक्तीवरून वाद सुरू झाल्यानंतर ती नियुक्ती थांबण्यात आली आहे. तर यावरून शिंदे सेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यांसह त्यांची मुलगी आदिती तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी देखील तटकरे यांच्यावर टीका केल्याने आता वाद वाढण्याची शक्यता आहे.
तटकरे यांच्यावर टीका करताना तिन्ही आमदारांनी, तटकरे आपल्या भावाचे होऊ शकते नाहीत. ते आमचे काय होणार असा सवाल उपस्थित करत टीका केलीय. हिंमत असेल तर श्री बल्लाळेश्वराच्या समोर छातीवर हात ठेवून तटकरे यांनी शपथ घेऊन सेनेच्या आम्हाला तिघांना पाडण्याचा प्रयत्न केला नाही हे सांगावे. कुणाला कुणी फसवलं? याचे उत्तर द्यावे असे आवाहान मंत्री भरत गोगावले यांनी थेट तटकरे यांना केले होते. जो स्वतःच्या भावाचा होऊ शकला नाही, तो आमचा काय होणार? अशी जहरी टीका गोगावले यांनी केली होती.
या वाकयुद्धानंतर आता वातावर आणखी तापले असून तटकरे यांनी शिवसेना नेत्यांच्या टीकेला प्रत्त्युत्तर दिले आहे. त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यासह आमदारांनी केलेल्या टीकेवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राज्यात महायुतीला प्रचंड यश मिळाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री दावोसला परकीय गुंतवणूक आणण्यासाठी गेले आहेत. मात्र इकडे रायगडच्या पालकमंत्रिपदावरून वाद निर्माण केला जातोय. महायुतीच्या मिळालेल्या यशाला गालबोट लावण्याचे कृत्य केलं जातयं, जे अनाकलनीय आहे. महायुतीला जे अशोभनीय असल्याची टीका तटकरे यांनी केली आहे. तर गोगावले यांनी केलेल्या टीकेला तटकरे यांनी थेट प्रतित्त्युत्तर दिले आहे. त्यांनी पालकमंत्रिपदासह सर्व विषयावरील समस्यांचे समाधान परस्पर समन्वय राखून काढला जाईल, असेही म्हटले आहे.
एकीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले थेट पालकमंत्रीपदावरून आमने-सामने आले असून एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. यामुळे जिल्ह्याचे राजकीय स्वास्थ बिघडत चालले आहे. मात्र दोन्ही पक्षाचे प्रमुख यामध्ये लक्ष घालत नसून योग्य तो तोडगा का काढला जात नाही अशी विचारणा आता दबक्या आवाजात केली जात आहे.
दरम्यान रायगडच्या प्रश्नावर समन्वयाने मार्ग काढू असे म्हटले तटकरे यांनी म्हटले असताना शिवसेनेसह भाजपचे आमदार यासाठी तयार नसल्याचे दिसत आहे. रायगडमध्ये आधीपासूनच आदिती तटकरे यांच्या पालकमंत्रीपदाला विरोध होता. पण राष्ट्रवादीचा जिल्ह्यात फक्त एक आमदार असतानाही आदिती तटकरे यांच्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे.
यावरून आता महायुतीत मतभेद समोर येत आहेत. ही नियुक्ती रद्द झाली असलीतरीही पालकमंत्री आपल्यालाच करण्यात यावे अशी मागणी मंत्री भरत गोगावले यांच्यासह शिवसेना आमदार आणि भाजपच्या आमदारांनी लावून धरली आहे. आता मुख्यमंत्री रायगडबाबत कोणता निर्णय घेतात? गोगावले यांना पालकमंत्री करणार का? आदिती तटकरे यांच्याकडे दुसरी कोणती जबाबदारी देणार? यासह राष्ट्रवादीसह शिवसेनेचे म्होरके या प्रश्न निकाली कसा काढतात हे पाहावं लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.