
Impact of Women's Inclusion in Defense Services : भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली. या ऑपरेशनची माहिती दिल्लीत एका पत्रकार परिषदेतून देण्यात आली. यामध्ये भारतीय लष्कराच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी नेतृत्व करत भारताची बाजू कणखरपणे मांडली. त्यानंतर या दोघींसह लष्करातील नारीशक्तीचे देशभरात कौतुक होत आहे.
भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह आणि भारतीय लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी संपूर्ण ऑपरेशनची माहिती दिली. त्यानंतर सोशल मीडियात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडूनही त्यांचं कौतुक करण्यात आलं आहे. तसेच पक्षाध्यक्ष शरद पवार हे संरक्षणमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाची आठवणही पक्षाने करून दिली आहे.
पक्षाच्या एक्स अकाऊंटवर याबाबत पोस्ट करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, एक दूरदृष्टीचा निर्णय, जो आज इतिहास घडवतोय. भारताचे संरक्षण मंत्री असताना, शरदचंद्र पवार साहेबांनी एक धाडसी निर्णय घेतला. 'महिलांना भारतीय संरक्षण दलात स्थान द्यायचं!' सुरुवातीला तिन्ही दलांचे प्रमुख याला तयार नव्हते. पण पवार साहेबांची दूरदृष्टी, निर्णयक्षमता आणि महिला सक्षमीकरणाबद्दलची असामान्य बांधिलकी यामुळे त्यांनी 11% आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
आज पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्यासारख्या महिला अधिकाऱ्यांनी देशाचं नेतृत्व करत भारतीय सैन्याचं शौर्य जगाला दाखवून दिलं. ही फक्त संधी नव्हती, ही शक्तीची ओळख होती! हा निर्णय नव्हे, क्रांती होती!, असे पक्षाच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, शरद पवार यांनीही यापूर्वी अनेकदा महिलांना लष्करात दिलेल्या 11 टक्के आरक्षणामागची भूमिका सार्वजनिक व्यासपीठावर मांडली आहे. 1991 मध्ये त्यांना हा निर्णय घेतला होता. लष्कराच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांचा सुरूवातीला महिलांना लष्करात घेण्यास विरोध होता. पण आपण निर्णय घेतल्यानंतर तुम्हाला त्याची अंमलबजावणी करायची आहे, असे अधिकाऱ्यांना सांगून महिलांना 11 टक्के आरक्षण लागू केल्याची आठवण शरद पवार यांच्याकडून अनेकदा सांगितली जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.