Delimitation Bill Controversy : डिलिमिटेशनवरून मविआत ठिणगी! नताशा आव्हाडांसाठी काँग्रेसची युवा महिला नेत्या मैदानात, सुप्रिया सुळेंनाच सल्ला; 'विवेक गहाण...'

Shivani Wadettiwar Criticism Supriya Sule Over Natasha Awhad Statement : डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा म्हणजे संविधानाशी प्रतारणा असल्याची भूमिका जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाड यांनी घेतली आहे. यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील मतभेद उघड झाले आहेत.
Delimitation Bill Controversy; Supriya Sule, Natasha Awhad And Shivani Wadettiwar
Delimitation Bill Controversy; Supriya Sule, Natasha Awhad And Shivani WadettiwarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Political News : डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद आता उघडपणे समोर आले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयकाबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. मात्र, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा आव्हाड यांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

आता या वादात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनीही उडी घेत नताशा आव्हाड यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. तसेच, सुप्रिया सुळे यांनी डिलिमिटेशन विधेयकाचा सखोल अभ्यास करून निर्णय घ्यावा, असा सल्लाही दिला आहे. त्यामुळे डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत नव्या राजकीय संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत.

केंद्रातील मोदी सरकार आगामी हिवाळी अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक सादर करण्याची शक्यता आहे. या विधेयकाला बहुमत मिळवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. या पक्षाचे लोकसभेत आठ खासदार आहेत. मात्र, विधेयकाला पाठिंबा देण्याच्या संभाव्य भूमिकेला नताशा आव्हाड यांनी विरोध दर्शवला आहे.

Delimitation Bill Controversy; Supriya Sule, Natasha Awhad And Shivani Wadettiwar
Delimitation Bill : 'लेकीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड येणार नाही; जितेंद्र आव्हाडांची निष्ठा शरद पवारांच्या राष्ट्रवादीबरोबरच, डिलिमिटेशनवरून पक्षात खदखद!

डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणे म्हणजे देशाशी आणि संविधानाशी प्रतारणा करण्यासारखे असल्याचे मत नताशा आव्हाड यांनी व्यक्त केले आहे. 'जर माझा पक्ष डिलिमिटेशन विधेयकाच्या बाजूने जाण्याचा विचार करत असेल, तर मी पक्षाच्या भूमिकेचा निषेध करते,' अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली. त्यांच्या या भूमिकेला त्यांचे वडील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेदांची चर्चा अधिक तीव्र झाली आहे.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी नताशा आव्हाड यांच्या भूमिकेचे स्वागत केले. मात्र, त्याचवेळी नव्या आणि जुन्या पिढीतील विचारांमधील फरक अधोरेखित केला. त्या म्हणाल्या, 'आपण नताशा आव्हाड यांच्या भूमिकेचे स्वागत करतो. विकास फक्त इमारती बांधल्याने होत नाही, तर तो कुटुंबातून घडतो. एका कुटुंबात मुलीचे मत वडिलांपेक्षा वेगळे असू शकते. नवीन पिढीत या गोष्टी असतात. मात्र, आपण जुन्या पिढीतील आहोत. माझ्या पिढीत आई-वडिलांचे शब्द अंतिम असतात. माझ्या पिढीत मी आई-वडिलांच्या शब्दांच्या बाहेर नाही.'

सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याचा नताशा आव्हाड यांना टोला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्यातच आता शिवानी वडेट्टीवार यांनीही या वादात उडी घेतली आहे. डिलिमिटेशन विधेयकाचा सखोल अभ्यास करूनच योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी सुप्रिया सुळे यांना केले आहे. तसेच, नताशा आव्हाड यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या निर्णयाकडे आपले बारीक लक्ष राहील, असे सांगत त्यांनी नताशा यांच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिला.

सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी नताशा आव्हाड यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा विचार करावा. लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्याच्या भूमिकेला पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षाही शिवानी वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. सुप्रिया सुळे यांना डिलिमिटेशन विधेयकाचे समर्थन करायचे असेल, तर त्यांनी तो निर्णय घ्यावा; मात्र त्यासाठी काँग्रेसचे नाव पुढे करू नये, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

सुप्रिया सुळे यांच्या 'जेन-झी' संदर्भातील वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिवानी यांनी कोणत्याही राजकीय पक्षाने तरुण नेते आणि नव्या पिढीच्या मतांकडे दुर्लक्ष करू नये, असे म्हटले. 'पक्षाशी निष्ठा म्हणजे स्वतःच्या विवेकाला दाबून टाकणे नव्हे,' अशी भूमिका मांडत त्यांनी नताशा आव्हाड यांच्या धाडसाचे कौतुक केले.

संविधानाशी संबंधित प्रश्न निर्माण झाल्यास स्वतःच्या पक्षालाही प्रश्न विचारणाऱ्या स्पष्टवक्त्या आवाजांची लोकशाहीला गरज आहे, असे मत शिवानी यांनी व्यक्त केले. आपण एका युवा नेतृत्वाच्या भूमिकेला पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट करताना देश आणि संविधान सर्वप्रथम असून, त्यानंतर राजकीय पक्ष येतात, असेही त्यांनी सांगितले. एखादी भूमिका असंवैधानिक असेल, तर केवळ पक्षाच्या निर्णयामुळे तिचे समर्थन करता येणार नाही. आजच्या तरुण पिढीनेही स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीला महत्त्व द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

Delimitation Bill Controversy; Supriya Sule, Natasha Awhad And Shivani Wadettiwar
Delimitation Bill: मोदी सरकार पोहोचलं दोन तृतीयांश बहुमताच्याजवळ! संसदेत डिलिमिटेशन विधेयक आणण्याच्या हालचालींना वेग

एकूणच, डिलिमिटेशन विधेयकाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेदांसोबतच महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्येही राजकीय मतभिन्नता समोर येत आहे. त्यामुळे आगामी काळात या विधेयकावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका काय असणार आणि त्याचा महाविकास आघाडीच्या एकजुटीवर काय परिणाम होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.