Pune News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. विशेषतः आतापर्यंत एकमेकांवर आरोप न करणाऱ्या महायुतीमध्ये टीका टिपण्णी केली जात असल्यामुळे महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आले की उलट्या होतात असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी केल्यानंतर वातावरण चांगलेच तापले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार (Ajit Pawar)गटाकडून त्यांच्यावर टीका केली जात असून सावंतांना उत्तर देताना अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंनी हल्लाबोल केला.
धाराशिव येथील एका कार्यक्रमप्रसंगी शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे नेते आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सावंत यांनी राष्ट्रवादीसोबत आपले कधीच पटले नाही. कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं आहे. त्यानंतर आता महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावरती आली आहे.
तानाजी सावंतांना उत्तर देताना अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंनी पलटवार केला आहे. शेळके म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीसोबत सत्तेत आल्यापासून तानाजी सावंतांच्या पोटात नेमकं काय गेलंय हे माहीत नाही. त्यांना जे बोलायचं ते बोलून घेऊ द्यात. आगामी विधानसभा निवडणुकीत कोण-कोणाच्या मांडीला मांडी लावून बसलो आणि कोणाची गरज कोणाला आहे, हे लक्षात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सावंत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी, उमेश पाटील यांनी त्यांच्या शब्दात उत्तर दिले आहे. शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून केल्या जात असलेल्या टीकेमुळे महायुतीचा प्रवास फुटीच्या दिशेने प्रवास सुरु झालाय का? ही चर्चा रंगली आहे.
काही दिवसापूर्वीच भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण व शिंदे गटाचे माजी मंत्री रामदास कदम यांनी एकमेकावर टीका केल्याने वातावरण चांगेलच तापले होते. त्यानंतर सातत्याने करण्यात येणाऱ्या टीकेमुळे महायुतीमधील वातावरण पूर्वीप्रमाणे राहिले नसल्याची चर्चा आहे.
दरम्यान, तानाजी सावंत नागरिकांशी संवाद साधतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तोंडसुख घेतल्याच्या चर्चा आहेत. अगदी शिकत असल्यापासून आपल्यात शिवसेनेचे विचार परिपूर्ण भिनलेले आहेत. म्हणूनच काँग्रेस, राष्ट्रवादीपासून लांब राहत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पुडी खाल्ल्यावर जशी उलटी होते तशी. आम्ही तत्वाशी बांधील आहोत, असेही सावंत यावेळी म्हणाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे येत्या काळात या दोन पक्षातील वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.