Drought-Hit Talukas List : मोठी बातमी! दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढली, नवीन चार तालुक्यांचा यादीत समावेश; मदतीचा मार्ग मोकळा!

Dindori Chiplun Wada : राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आले होते. आता त्यामध्ये आणखी चार तालुक्यांची भर पडली आहे.
Maharashtra Drought Update
Maharashtra Drought NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Drought News : परतीच्या पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झालेल्या आणखी चार तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत दिंडोरीसह चिपळूण, वाडा आणि विक्रमगड या चार तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यास मान्यता देण्यात आली.

दुष्काळग्रस्त म्हणून मान्यता मिळाल्यानंतर आता प्रत्यक्ष नुकसानभरपाई किती मिळणार आणि ती कधी मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रात यंदा पावसाने पाठ फिरवली. परिणामी प्रमुख खरीप पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली, अनेक ठिकाणी पिके सुकली, तर अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी झाली. आधीच बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि मशागतीवर मोठा खर्च केलेल्या शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले.

या पार्श्वभूमीवर उर्वरित तालुक्यांचाही दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी, विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून सातत्याने करण्यात येत होती. शासनाच्या निर्देशानुसार महसूल आणि कृषी विभागाने पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. पंचनामे आणि सर्वेक्षणाच्या माध्यमातून परिस्थितीचा आढावा घेऊन अहवाल प्रशासनाकडे सादर करण्यात आले. या अहवालांची पडताळणी केल्यानंतर अखेर मंत्रिमंडळ उपसमितीने या तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्यास मान्यता दिली.

दरम्यान, राज्यातील इतर काही तालुक्यांमध्येही दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, गडहिंग्लज, कागल आणि करवीर या तालुक्यांमधील परिस्थितीचाही मुद्दा बैठकीत उपस्थित झाला. या तालुक्यांसह अन्य मागणी असलेल्या भागांचे निकषांनुसार संपूर्ण सर्वेक्षण करून पुढील बैठकीत अहवाल सादर करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी संबंधित प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे आगामी बैठकीत आणखी काही तालुक्यांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना कोणते लाभ मिळणार?

तालुक्यांना दुष्काळग्रस्त म्हणून मान्यता मिळाल्याने शेतकऱ्यांच्या मदतीचा मार्ग मोकळा झाला असला, तरी प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी शासनाकडून पुढील आदेश आणि अंमलबजावणी महत्त्वाची ठरणार आहे. दुष्काळी परिस्थितीत लागू होणाऱ्या शासकीय सवलती, पात्रतेनुसार आर्थिक मदत, पीक नुकसानीची भरपाई आणि अन्य मदत योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्याची अपेक्षा आहे.

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देताना प्रत्यक्ष पीकनुकसान आणि संबंधित निकषांचा विचार होणार आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त म्हणून मान्यता मिळाल्यानंतर प्रशासनाकडून पुढील कार्यवाही किती वेगाने होते, याकडे लक्ष लागले आहे. यंदाच्या हंगामात उत्पादन घटल्याने आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.