Mumbai News : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला सर्वच स्थरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने एकीकडे राज्यात चांगले वातावरण आहे. या योजनेचा महायुती सरकारला फायदा होईल, असे चित्र आहे. त्यामुळे एकीकडे महायुतीमध्ये उत्साहाचे वातावरण असताना नेमका गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादातून दोन पक्षात चांगलाच वाद रंगला. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला असला तरी महायुतीमध्ये वारंवार होणारा वाद चिंतेत वाढ करणारा आहे.
बॅनरवर 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना असे न लिहता केवळ लाडकी बहीण योजना असे छापले जात असल्याचा आरोप शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर केला. मुख्यमंत्री नाव बॅनरवर घेतले जावा असा आक्षेप दादा भूसे, दीपक केसरकर यांनी घेतला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मध्यस्थी करुन याचा कोणी एकाने श्रेय घ्यायचे नाही, असे स्पष्ट केले.
त्यातच काही दिवसापूर्वी शिंदे गटाचे नेते रामदास कदम व भाजप मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यातील वाद, त्यानंतर मंत्री तानाजी सावंत यांच्या टीकेनंतर अजित पवार गटाचे अमोल मिटकरी, उमेश पाटील, रुपाली पाटील यांनी केलेली टीका हे वाद संपत नसतानाच मंत्रिमंडळ बैठकीत पुन्हा एकदा शिंदे गट व अजित पवार गट आमने-सामने आल्याने पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा वाद मिटवावा लागला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांचे नाव काढून दादाचा वादा असे श्रेय कसे काय घेतले जात आहे, असा आरोप यावेळी शिंदे गटातील मंत्र्यांनी केला. त्यानंतर या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करुन तोडगा काढला. या योजनेचे कोणी एकाने श्रेय घ्यायचे नाही, असे म्हटले आहे.
दुसरीकडे पुन्हा या प्रकरणावरून शिंदे गट व अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या प्रवक्त्यांनी एकमेकांवर टीका केली आहे. त्यामुळे येत्या काळात हा वाद पुन्हा एकदा रंगण्याची शक्यता आहे. प्रत्येकवेळी महायुतीत कोणतेही खटके उडू नयेत म्हणून आम्ही या भूमिकेत असतो. परतू पुन्हा पुन्हा तेच होत असेल, एखाद्या बॅनरवर लाईन आली तर समजू शकतो. पण जाणून बुजून मुख्यमंत्री हा शब्द नसावा हा अट्टाहास कशाला हवा.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे आपल्या सरकारचे यश आहे. सर्वजण मिळून करत आहोत पण मग एकच वादा, दादा का वादा हे का. पक्षाच्या कार्यक्रमात या घोषणा चालतात. आम्ही शिंदे साहेबांचा घोष करु. कोणी देवेंद्र फडणवीस यांचे करतील. याला आमचा विरोध नाही. पण एखादी योजना आम्ही आणली असे सांगणं इतरांना दुखावण्याचा प्रकार असल्याची टीका शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी केली.
याच विषयावरून गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कुरबूर झाल्याचे समजते. दर वेळेला आम्ही सामंजस्याची भूमिका घेतोय. काही गडबड होऊ नये. प्रत्येक गोष्टीला आम्ही उत्तर द्यायचे मग त्यांनी द्यायचं हे आता थांबवलं पाहिजे. एकत्र पणे हातात हात घेऊन या योजना पुढे घेऊन गेल्या पाहिजे, हे आमचं स्पष्ट मत असल्याचे शिरसाठ म्हणाले.
काही दिवसापूर्वीच मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावरुन या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलवून आधी तानाजी सावंत यांच्याबाबत भूमिका स्पष्ट केली पाहिजे होती. मंत्रिमंडळातील जबाबदार व्यक्ती असताना असे वक्तव्य करत असताना त्याच्यावर निर्णय घेण्याऐवजी राज्यात अजित पवार त्याचा प्रसार करत आहेत. योजना ते राज्यात पोहोचवत आहेत. त्यावर त्यांना जळजळ का होत आहे ? असा सवाल अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.