
CIDCO : मागील काही वर्षांमध्ये मुंबई महापालिकेच्या जवळपास 11 हजार कोटींच्या मुदत ठेवी मोडीत काढल्या. याशिवाय आणखी 16 हजार कोटींच्या मुदत ठेवी मोडण्यात येणार आहेत. यापाठोपाठ आता अतिश्रीमंत अशी ख्याती असलेले 'सिडको' या महामंडळाच्या मुदत ठेवी मोठ्या प्रमाणात मोडल्या असल्याचे समोर आले आहे. 2015 ते 2024 या मागील 10 वर्षांमध्ये तब्बल 2 हजार 324 कोटी रुपयांनी मुदत ठेवी कमी झाल्या आहेत.
वास्तविक ओसंडून वाहणारी तिजोरी पाहून 'सिडको' महामंडळाची गणना ही नेहमी श्रीमंत महामंडळात केली जायची. 2015 पर्यंत महामंडळाच्या 7 हजार 706 कोटी रुपयांच्या मुदत ठेवी होत्या. गेल्या दशकभरात सिडकोने अनेक प्रकल्प हाती घेतले. वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूकही केली. मोठ्या प्रमाणावर भूखंड विक्री केलेली आहे. त्यामुळे सिडकोच्या मुदत ठेवींचा आकडा वाढणे अपेक्षित होते. मग ठेवी वाढण्याऐवजी कमी कशा झाल्या? असा प्रश्न आहे.'सिडको'ची प्रगती नेमकी कोणाच्या डोळ्यात खुपत आहे, असाही प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
नवी मुंबईतील सजग नागरिक मंचला माहिती अधिकारातून या मुदत ठेवींबाबत धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. 2015 ते 2024 या काळात सिडकोच्या मुदत ठेवीत 2 हजार 324 कोटी रुपयांची घट झाली आहे. 2024-25 चे लेखापरीक्षण न झाल्यामुळे या कालावधीतील मुदत ठेवी संदर्भातील माहिती उपलब्ध नसल्याची माहिती साहाय्यक लेखा अधिकारी (वित्त) यांनी दिली. मुदत ठेवी मोडण्यामागचे कारण माहिती अधिकारात विचारले होते. त्यास उत्तर देताना 'यूटीलाइज फॉर कॅश फ्लो पर्पज' असे नमूद केले आहे.
'सिडको' महामंडळाच्या पैशांचा वापर गेल्या 10 वर्षांमध्ये सत्ताधाऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये केला असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी 'समृद्धी' महामार्ग प्रकल्पासाठीही 1 हजार कोटींचा निधी दिल्याची चर्चा प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये आहे. पण, यातील खरे काय हे कळण्यास सिडकोच्या गुप्त कारभारामुळे वेळ लागत आहे. सिडकोने ठेवी मोडून त्याचा विनियोग ज्या कामासाठी केलेला आहे, त्याचा तपशील संकेतस्थळावर जाहीर करावा, जेणेकरून जनमानसात असणाऱ्या विविध शंकांचे निरसन होऊ शकेल, अशी मागणी केली जात आहे.
मुंबई महापालिकेच्या विविध बँकांत तब्बल 92 हजार कोटींच्या मुदत ठेवी जमा होत्या. या ठेवींमधून मिळणाऱ्या व्याजातून महापालिकेची विविध कामे मार्गी लागत होती. 2 वर्षांपूर्वी यातील तब्बल 11 हजार कोटींच्या मुदत ठेवी मोडीत काढल्या आहेत. आता बँकांमध्ये 81, 774 हजार 42 कोटींच्या ठेवी जमा आहेत. यातीलही विकास प्रकल्पांसाठी 16 हजार 699 कोटी रुपयांच्या ठेवी मोडीत काढण्यात येणार असल्याची माहिती आहे. सध्या विशेष राखीव निधीमधून वेळोवेळी निधी काढण्याच्या मार्ग अवलंब केला जात आहे. त्यामुळे चिंताजनक परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.