
Panji News : 'मुख्यमंत्र्यांना गाडा', असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या सामाजिक मुद्यांवर आवाज उठवणारे कार्यकर्ते रामा काणकोण यांना शुक्रवारी पणजी पोलिसांनी अटक केली. काणकोणकरांचे वक्तव्य घृणास्पद, अपमानजनक आणि धमकी देणारे असल्याचे म्हणत त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता 353 (2) आणि 351 (3) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रामा यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
राम काणकोणकर यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, बुधवारी सायंकाळी 6.30 वाजता काणकोणकर यांनी पणजी येथील आझाद मैदानात माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्याविरोधात अपमानजनक आणि धमकी देणारे विधान केले. काणकोणकरांचे वक्तव्य चिथावणीखोर असल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.
गोव्यातील रामा काणकोणकरांनी आझाद मैदानात मीडियाशी संवाद साधताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना जिंवत गाडा़, असे वक्तव्य केले होते. सांकवाळ पंचायतीच्या सदस्यांना स्थलांतरितांकडून मिळालेल्या कथित धमकी प्रकरणी कारवाई का केली जात नाही, असा सवाल काणकोणकरांनी उपस्थित केला होता. रामा यांच्या वक्तव्यानंतर त्यांना चौकशीसाठी पोलिस समन्स बजावण्यात आला होता. चौकशीला हजर न राहिल्याने शुक्रवारी त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, रामा काणकोणकर यांच्या अटकेवरुन विरोधी पक्षातील नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. "गोवा सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे. सामाजिक कार्यकर्ता रामा काणकोणकर यांना अटक ही पूर्णत: दादागिरी आहे. अशाप्रकारे आवाज दाबणे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. चर्चेतून लोकशाही अधिक बळकट होते, धमकी देऊन नाही. खोटे गुन्हे दाखल करून गोमंतकीयांना गप्प करण्याचा प्रयत्न करणे हा अशा कारवाईचा एकमेव हेतू आहे पण तो चालणार नाही! आम्ही घाबरणार नाही", अशा शब्दात गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी टीका केली आहे.
रामा काणकोणकर यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणे माझ्या मते बेकायदेशीर आणि पोलिसांच्या अधिकारांचा उघड गैरवापर आहे. ही कारवाई लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न असून हिटलरच्या दडपशाहीची आठवण करून देणारी आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा पाया आहे. रामा काणकोणकर यांच्या अटकेचा मी निषेध करतो आणि त्यांना पाठिंबा देतो.
भाजपच्या (BJP) भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या रामा काणकोणकर यांची अटक बेकायदेशीर असून, हा लोकशाहीवरील हल्ला आहे. प्रमोद सावंत हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असून, भाजपविरोधात आवाज उठवणाऱ्यांना टार्गेट करतायेत. काँग्रेस या कारवाईचा निषेध करते, असे काँग्रेस नेते अमित पाटकर म्हणाले
आप नेते अमित पालेकर यांनी देखील काणकोणकरांच्या अटकेचा निषेध करत ही कारावाई अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी मानवी हक्क आयोग आणि गोवा पोलिसांच्या तक्रार विभागाने सू- मोटो दखल घ्यावी. गोव्याचे मिर्जापूर होत असून, लोकांचा पोलिसांवरील विश्वास कमी होतोय, असे पालेकरांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.