Mumbai News : राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदारांची मुदत जून 2020 मध्ये संपली आहे. त्यानंतर जवळपास चार वर्षांचा कालावधी लोटला असला तरी राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या निवडीला मुहूर्त लागलेला नाही. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात शेवटपर्यंत माजी राज्यपाल कोश्यारी यांनी ठाकरे सरकारने दिलेली 12 नावे मंजूर केली नव्हती. यावरुन राजकारणही रंगले होते. मात्र, येत्या चार महिन्यात विधानसभेचा कार्यकाळ संपणार असल्याने ही लांबणीवर पडलेली आमदारांची नियुक्ती लवकरच केली जाणार असल्याचे समजते.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती रखडली आहे. त्यावरून मोठे राजकारण रंगले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून ही नियुक्ती रखडली होती. येत्या काळात ही नियुक्ती मार्गी लागण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशन पार पडल्यानंतर राज्यपाल नियुक्त 12 आमदार नियुक्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी महायुतीमधील (Mahayuti) घटक पक्षांचा फॉर्म्युला ठरला आहे.
मविआ सरकारच्या कार्यकाळात राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा गाजला होता. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 12 आमदार नियुक्तीसाठी यादी पाठवली होती. मात्र, तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ही यादी मंजूर केली नव्हती. त्यामुळे ही यादी प्रलंबित राहिली. त्यानंतर 1 जुलै 2022 ला राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले. त्या वेळेसपासून मविआ सरकारने दिलेल्या यादीवर कोणतीच चर्चा झाली नाही.
दरम्यान, महायुती सरकारच्या हातात शेवटचे दोन महिने राहिले आहेत. त्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे सुत्रांने दिलेल्या माहितीनुसार महायुतीमधील घटक पक्षांचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार भाजपच्या वाट्याला 6, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 3 आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागा असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, 12 राज्यपाल नियुक्तीवरील सुप्रीम कोर्टाने स्थगिती हटवल्यानंतर आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. अधिवेशनानंतर एकीकडे राज्य मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा जोरात असताना आता राज्यपाल नियुक्त आमदार नियुक्तीबाबत तीन पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर ही यादी राज्यपालांना पाठवली जाणार असल्याचे समजते. त्यानंतर आता या जागांवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
जून 2021 मध्ये महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी 12 जणांची यादी दिली होती. मात्र, राज्यपाल कोश्यारी यांनी ती शेवटपर्यंत मंजूर केली नाही. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतानाही उद्धव ठाकरे यांनी या 12 आमदारांच्या मुद्द्यावरुन राज्यपालांना टोला लगावला होता.
महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली यादी पुढीलप्रमाणे
शिवसेना : उर्मिला मातोंडकर (कला), नितीन बानगुडे पाटील (शिवव्याख्याते) विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी (समाजसेवा), राष्ट्रवादी काँग्रेस : एकनाथ खडसे (समाजसेवा आणि सहकार) राजू शेट्टी (समाजसेवा आणि सहकार) यशपाल भिंगे (साहित्य) आनंद शिंदे (कला), काँग्रेस : रजनी पाटील (समाजसेवा आणि सहकार), सचिन सावंत (समाजसेवा आणि सहकार), मुझफ्फर पटेल (समाजसेवा) अनिरुद्ध वनकर (कला) अशी बारा जणांची यादी पाठवली होती.
अशी होते राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड
विधान परिषदेच्या रिक्त जागांवर नियुक्ती करण्याचा अधिकार घटनेने राज्यपालांना दिला आहे. मात्र, ही नियुक्ती करण्यासाठी त्यांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला घ्यावा लागतो. कलम 163 (1) अंतर्गत विधान परिषदेच्या जागांसाठी राज्यपाल नियुक्ती करु शकतात. तर कलम 171 (5) नुसार राज्यपालांना साहित्य, कला, विज्ञान, सामाजिक, सहकार या पाच क्षेत्रातील व्यक्तींची नियुक्ती करता येते. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राज्यपाल आमदारांची नियुक्ती करु शकतात. मात्र, अंतिम निर्णय हा राज्यपालांचा असतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.