
चंद्रपूर : माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आणि राज्याचे अतिथी हंसराज अहीर यांना इंधन नसल्याने जिल्हा प्रशासनाने गाडी नाकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहीर यांना सरकारकडून राज्य अतिथींचा दर्जा देण्यात आला आहे. त्यांनाच अशी वागणूक दिल्याची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहे.
हंसराज अहीर यांना शासकीय दौऱ्यासाठी वाहन उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. 4 एप्रिलला 2025 रोजी दिल्ली येथून आले असता 4 दिवस त्यांना शासकीय दौरा करायचा होता. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. यावर चंद्रपूरचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच्या दौऱ्याचा इंधन निधी मिळाला नसल्याने पेट्रोल पंपाच्या संचालकाने इंधन देण्यास नकार दिला असल्याचे अहीर यांना सांगितले. त्यावेळी सलग 15 दिवस अहीर यांना गाडी देण्यास नकार दिला.
एवढचे नव्हे तर त्यांच्या सचिवांना स्वतः इंधन भरल्यास वाहन उपलब्ध करून देऊ असा निरोप दिला. त्यानंतरच्या महिन्यात फक्त 3 दिवस गाडी उपलब्ध करून दिली. नंतर वाहन देणेच बंद केले. सातत्याने जिल्हा प्रशासनामार्फत राज्याच्या अतिथींना अवमानजनक वागणूक दिली जात असल्याने अहीर यांच्यावतीने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांची तातडीने बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हंसराज अहीर यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नागपूरच्या विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्य अतिथीशी संबंधित हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याने चौकशीचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत.
यापूर्वी भूषण गवई यांनी देशाचे सरन्यायाधीश यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ते प्रथमच मुंबईत आले असता त्यांच्या स्वागतासाठी एकही बडा अधिकारी गेला नव्हता. भूषण गवई यांनी याबाबत खंत व्यक्त केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी गवई यांना कायमस्वरूपी राज्याच्या अतिथींचा दर्जा बहाल केला आणि त्यांचा प्रोटोकॉलही जाहीर केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.