Eknath Shinde Aabhar yatra News : एकनाथ शिंदे या माणसाने शिवसेना वाचवली, भगवा आणि बाळासाहेबांचे विचार वाचवले. हा माणूस जादूगर आहे, नांदेड जिल्ह्यात महायुतीचे नऊ आमदार ही त्यांचीच जादू आहे. आम्ही विधानसभेला 80 जागा लढलो आणि 60 जिंकल्या. अजितदादांची मागून एन्ट्री झाली नसती तर आमचेही शंभर आमदार असते, असा दावा शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नांदेड येथील आभार यात्रेत (Gulabrao Patil) गुलाबराव पाटील यांनी केलेल्या या विधानाने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुंवया उंचावल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या आधी झालेल्या भाषणात गुलाबराव पाटील यांनी आपल्या स्टाईलमध्ये विरोधकांचा समाचार घेतला. एकनाथ शिंदे यांच्यामुळे नांदेडचा इतिहास बदलला आहे. या जिल्ह्यात शिवसेना वाढवण्याचे काम हेमंत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.
पण कष्टाने वाढवलेली बाळासाहेबांची शिवसेना त्यांचे विचार काही लोकांनी काँग्रेसच्या दावणीला बांधले. (Eknath Shinde) एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना, भगवा आणि शिवसेना प्रमुखांचे विचार वाचवण्याचे काम केले. त्यासाठीच आम्ही सुरत मार्गे गुवहाटीला गेलो. पण आमच्या या निर्णयावर गद्दार म्हणून टीका केली जाते. पण विधानसभा निवडणुकीत आमच्या लाडक्या बहिणींनी रेकाॅर्डब्रेक यश दिले आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा 237 आमदार महायुतीचे निवडून आले.
राज्यातील गोरगरीबांसाठी योजना राबवत एकनाथ शिंदे यांचा हात कोणीही धरू शकत नाही. ते खऱ्या अर्थाने जादूगर आहेत, त्यांच्या जादूमुळेच लोकसभेला सात खासदार आणि विधानसभेत 80 जागा लढवून आमचे 60 आमदार निवडून आले. अजितदादा नसते तर आमचेही शंभर आमदार निवडून आले असते, पण त्यांची मागून एन्ट्री झाली. दिल्लीहून काही निर्णय झाले, ते स्वीकारावे लागतात, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
तुमचा बालाजी कलाकार
नांदेड उत्तरचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांचा उल्लेख करत 'तुमचा बालाजी कलाकार'असल्याचा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला. मुख्यमंत्री असतांना एकनाथ शिंदे यांच्यासोबत आणि जवळ सगळ्यात जास्त कोण राहिलं असेल तर तो बालाजी होता. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या गाडीत आम्ही मंत्री असून कमी पण बालाजी अधिक वेळा दिसायचा. मी मंत्री असून मला बावीसशे कोटींचा निधी मिळाला अन् तुमच्या बालाजीने साडेतीन हजार कोटींचा निधी आणला आणि पुन्हा म्हणतो शिंदे साहेब माझ्यावर आशीर्वाद असू द्या, असा चिमटाही पाटील यांनी आपल्या भाषणातून कल्याणकर यांना काढला.
बालाजीने रडून रडून साडेतीन हजार कोटींचा निधी मिळवला, हे मला आता कळालं. बालाजी हा श्रीमंतांचा देव, तो देतो, तुमच्या बालाजीने एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असतांना त्यांच्याकडून घेतले, असेही पाटील म्हणाले.संजय राऊतने शिवसेना फोडली असे म्हणत शिवसेनेला जो जो आडवा येईल त्याचा सत्यनाश होवो,अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर टीका केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे परभणीचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी शिवसेनेते प्रवेश केला. एक लाख पंधरा हजार मते विशालने विधानसभा निवडणुकीत घेतले, अशा लोकांना बळ दिले पाहिजे, असे मतही पाटील यांनी व्यक्त केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.