Shivsena : नांदेड नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जिल्ह्यातील सर्व नऊ जागा जिंकल्या. विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीचा इथे धुव्वा उडाला, मात्र तरी देखील महायुतीतील घटक पक्षांचे समाधान झालेले नाही. भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सत्र अजूनही सुरूच आहे. शिवसेनेचे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी भाजपवर थेट आपल्या विरोधात पैसे वाटल्याचा आणि युती धर्म न पाळल्याचा गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत केवळ साडेतीन हजार मतांनी झालेला विजय फार मोठा नाही, हे का घडले? याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. जो विजय मिळाला तो मी पाच वर्षे मतदारसंघात केलेल्या कामाचा जनतेने दिलेला आशीर्वाद आहे. (MLA Balaji Kalyankar) पहाटे पाच वाजेपासून घरातून बाहेर पडत लोकांच्या सुख दु:खात सहभागी झालो. मतदारसंघातील प्रश्न पोटतिडकीने सोडवले, त्यामुळे कसा बसा विजय मिळाला. परंतु महायुती असूनही भाजपच्या नव्याने पक्षात आलेल्या लोकांनी माझे काम केले नाही. उलट माझ्या विरोधात पैसे वाटून मला पाडण्याचा प्रयत्न केला. याचाही भविष्यात विचार करावा लागेल, असा इशारा कल्याणकर यांनी दिला.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर (Nanded) नांदेड जिल्ह्यात महायुतीने विधानसभा निवडणुकीत जोरदार कमबॅक केले. जिल्ह्यातील नऊ मतदारसंघात विजय मिळवत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला. मात्र अनेक महायुतीचे आमदार हे अगदी थोड्या मतांनी विजयी झाले. यापैकीच एक म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे बालाजी कल्याणकर. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बालाजी कल्याणकर यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला होता.
त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदार त्यांना धडा शिकवणार, अशी चर्चा होती. मात्र ते काठावर विजयी झाले. आपण गेल्या पाच वर्षात केलेली कामं पाहता पन्नास हजाराच्या मताधिक्याने विजय मिळायला हवा होता. मात्र केवळ साडेतीन हजाराची लीड हे काही चांगले लक्षण नाही. असे का घडले? याचा विचार आणि चिंतन करावे लागेल. त्या सोबतच महायुती म्हणून एकत्र असताना मित्र पक्षांनी आपले काम केले नाही हे सत्य देखील नाकारून चालणार नाही.
भाजपच्या जुन्या मंडळींनी मदत केली पण नव्याने पक्षात आलेल्या लोकांनी माझे काम केले नाही. उलट माझ्या विरोधात मतदार संघात पैसे वाटले आणि मला पाडण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे, असे म्हणत बालाजी कल्याणकर यांनी भाजपवर निशाणा साधला. गेल्या काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यातील महायुतीमध्ये कुरबूरींचे प्रमाण वाढले आहे.
भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्यामुळे शिवसेनेचे नेते नाराज झाले आहेत. आमदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण म्हणजे भाजप नव्हे, असे म्हणत त्यांच्या स्वबळाच्या निर्णयाला विरोध दर्शवला. तर आता आमदार बालाजी कल्याणकर यांनीही भाजप विरोधी सूर आळवला आहे. एकूणच नांदेड जिल्ह्यात महायुतीत वादा वादी सुरू असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत हे नेते एकत्र कसे काम करणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.