
Shivsena News : राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे सध्या नाराज असल्याच्या चर्चा दररोज ऐकायला मिळतात. राज्याच्या सत्तेत हवा तसा आणि पाहिजे तेवढा वाटा न मिळाल्यामुळे, पालकमंत्री निवडताना भाजपाचा हस्तक्षेप यामुळे शिंदे नाराज असल्याचे बोलले जाते. या नाराजीतही एकनाथ शिंदे राज्यात आभार दौरे करत आहेत.
मराठवाड्यात जालना येथे त्यांचा काही दिवसापुर्वी आभार मेळावा झाला. (Shivsena) 6 फेब्रुवारी रोजी ते नांदेडमध्ये आभार दौरा करत आहेत. मात्र पक्षाला सहा आमदार देणाऱ्या छत्रपती संभाजीनगरकरांचे आभार मानायला ते कधी येणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लोकसभा आणि त्या पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने महायुतीली भक्कम साथ दिली. संदीपान भुमरे हे मराठवाड्यातील महायुतीचे एकमेव निवडून आलेले खासदार ठरले. तर विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व नऊ आमदार हे महायुतीचे विजयी झाले.
महायुतीला शतप्रतिशत रिझल्ट दिल्यानंतरही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दीड महिना उलटून गेला तरी संभाजीनगर मध्ये आले नाहीत. ते कोणावर नाराज आहेत का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. राज्यातील जनतेने विधानसभा निवडणुकीत महायुतीतील सर्वच घटक पक्षांना भरभरून मतदान केले. हे यश आणि ते देणारे मतदार यांचे आभार मानण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचा दौरा करण्याचे निश्चित केले आहे.
मराठवाड्यात जालना येथे नुकताच त्यांनी आपला पहिला आभार दौरा केला. त्यांच्या या दौऱ्यात काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक नेते, माजी नगरसेवक यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश देखील केला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेने उद्धवसेनेला एकपाठोपाठ एक धक्के देण्यास सुरूवात केली आहे. जवळपास सगळेच माजी महापौरांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.
तर दहा ते बारा माजी नगरसेवक पक्ष प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. एकनाथ शिंदे यांचा लवकरच शहरात आभार दौरा होणार आहे, त्यावेळी हे प्रवेश केले जातील, असे या माजी नगरसेवकांना सांगितले जात आहे. त्यामुळे ते चातकासारखी शिंदेंच्या आभार दौऱ्याची वाट पहात आहेत. जालन्यानंतर 6 फेब्रुवारीला नांदेडमध्ये एकनाथ शिंदे यांचा आभार दौरा होत आहे. मराठवाड्यातील या दोन शहरात आभार दौरे होत आहेत, संभाजीनगरला मात्र अद्याप शिंदेनी वेळ दिलेली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेत अंतर्गत गटबाजी आणि कुरबुरी वाढल्या आहेत. कदाचित त्यामुळेच शिंदे दौरा टाळत आहेत, असे बोलले जाते. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिल्यामुळे आमदार अब्दुल सत्तार नाराज आहेत. तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या कार्यपद्धतीवर आमदार प्रदीप जैस्वाल नाखूष असल्याची चर्चा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे संभाजीनगरला येणे टाळत आहेत का? आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाचा भूमिका काय असले? याची स्पष्टता शिंदे यांच्या दौऱ्यानंतर होणार आहे.
दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने शहराचे दौरे सुरु केले आहेत. शिवसेना जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष असूनही एकनाथ शिंदे अजून दौऱ्यावर का आले नाहीत? याबद्दल उलटसुलट चर्चा होतांना दिसत आहेत. शिवसेनेचे नेते मात्र लवकरच शिंदे यांचा आभार दौरा संभाजीनगरात होईल, असे सांगत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.