Maharashtra Political News : भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वागण्याला कंटाळून त्यांच्या आई परळीत न राहता नाथ्रा गावाला जाऊन राहत असल्याचा दावा केला. यावर धनंजय मुंडे यांनी संताप व्यक्त करतानाच माझ्या जन्मदात्या आईवर असे खोटे आरोप करण्याची हिम्मत कुणी करत असेल तर हे स्वीकारणे आणि गप्प राहणे अशक्य आहे, अशा शब्दात इशारा दिला. राजकारण आता या स्तरावर गेले याचे वाईट वाटत असल्याचेही मुंडे यांनी म्हटले आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या, अवादा कंपनीला मागण्यात आलेल्या दोन कोटींच्या खंडणीचे प्रकरण आणि (Dhananjay Munde) धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांच्या खात्यामार्फत झालेल्या दोनशे कोटींच्या घोटाळा प्रकरणात भाजपा आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली. देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी असलेले संबंध दाखवून त्यांचा राजीनामा घेण्यास सरकारला भाग पाडण्यात धस यांची महत्वाची भूमिका होती.
कृषी खात्यातील दोनशे कोटींच्या घोटाळा प्रकरणी ईडीकडे तक्रार करणार असल्याचे धस यांनी सांगितले. या शिवाय धनंजय मुंडे यांच्या वागण्याला त्यांच्या आई देखील कंटाळल्या आणि त्या परळीऐवजी नाथ्रा गावातील घरी राहायला गेल्या, असा दावाही सुरेश धस (Suresh Dhas) यांनी नुकताच एका मुलाखती दरम्यान केला. यावरून धनंजय मुंडे संतापले असून त्यांनी वस्तुस्थिती काय आहे? हे आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून स्पष्ट केले. तसेच आईबद्दल खोटे आरोप करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशाराही दिला.
परळी वैजनाथ शहरातील पंढरी या माझ्या निवासस्थानाचे नूतनीकरणाचे काम हाती घ्यायचे असल्याने मी माझी आई व कुटुंबीय मागील काही महिन्यांपासून आमच्या नाथरा या जन्म गावात असलेल्या शेतातील घरात स्थलांतरित झालो आहोत. तिथेच राहत आहोत, ही गोष्ट सर्वांनाच माहित आहे. ज्यांनी आरोप केले त्यांनीच या आधी एका मुलाखतीत मी शेतातील घरात राहतो असे सांगितले होते. काल मात्र त्यांनी फक्त माझी आई राहते असे सांगितले आणि खोटे नाटे आरोप केले.
काही शिल्लक नसल्याने आता कुटुंबावर खोटे आरोप..
माझे चुलत भाऊ हे प्रत्येक निर्णयात माझ्या सोबतीने भक्कमपणे उभे असतात, हेही सर्वांना माहित आहे मात्र त्याबाबतीतही चुकीचे आरोप केल्या गेले. मागील काही महिन्यांपासून माझ्यावर सातत्याने आरोप केले जात आहेत. मात्र आता कदाचित आणखी काही खोटे आरोप करायला शिल्लक नसावेत म्हणून काहीजण माझ्या कुटुंबावर सुध्दा असे खोटारडे आरोप करून घृणास्पद राजकारण साधत आहेत, हे उद्विग्न करणारे आहे.
राजकीय आणि सामाजिक जीवनात अलीकडच्या काळात माझ्यावर या प्रकारचे खोटे आरोप आणि ड्रामा स्क्रिप्ट रचण्यात आल्या. माझ्या आजार आणि आरोग्यावर व्यंग आणि निंदा केली गेली, शंका निर्माण केल्या गेल्या, तेही सगळं मी सहन केलं. मात्र माझ्या जन्मदात्या आईवर असे खोटे आरोप करण्याची हिम्मत कुणी करत असेल तर हे स्वीकारणे आणि गप्प राहणे अशक्य आहे. राजकारण आता या स्तरावर गेले याचे वाईट वाटत आहे, असेही मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.