

Mumbai News : सध्या जागतिक पातळीवर पेटलेल्या इराण-इस्त्रायल युद्धामुळे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय व्यापाराला त्याचा मोठा फटका बसल्याचं दिसून येत आहे. त्यात साखर उद्योगावरहीया युद्धाचा मोठा परिणाम झाला असल्याचं समोर येत आहे. ही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यापासून केंद्र सरकारनं साखर कारखान्यांना निर्यातीसाठी दिलेल्या कोट्यानुसार होणारी साखर निर्यात ठप्प झाल्याचं समोर आल्यानं साखर कारखान्यांवर मोठं संकट उभं ठाकलं आहे.
एकीकडे इराण-इस्त्रायल युद्धामुळे समुद्री मार्गावरील वाहतूक आणि व्यापार विस्कळीत झाल्याचं चित्रं आहे. याचदरम्यान, महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशभरातून निर्यात होणारी साखर अनेक बंदरांवर अडकून पडल्यानं साखर कारखान्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. तसेच साखरेच्या दरातील स्थिरता आणि एफआरपी (FRP) च्या वाढीमुळे राज्यातील साखर उद्योग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे.
महाराष्ट्र राज्यातील पुढील हंगामात 50 टक्के साखर कारखाने बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सुमारे 3 हजार कोटींचं नुकसान आणि 4 हजार 315 कोटींची एफआरपी थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब 2019 पासून साखरेचे किमान विक्री मूल्य (MSP) ₹31 किलोवर स्थिर असून एफआरपी तब्बल सहावेळा वाढ करण्यात आली आहे. यामुळे साखर व्यवसाय कोलमडून पडल्याचं दिसून येत आहे.
राज्यात आगामी काळात उसाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच प्रतिकूल हवामानामुळे निम्म्या कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचं दिसून येत आहे. साखरेला उठाव नसून, बी-हेवी मोलॅसिस तयार करण्याची क्षमता असूनही राज्याला मर्यादित कोटा (20 टक्के) मिळाला आहे. तसेच निर्यात न झाल्याने गोदामात साखरेचा साठा वाढून देशांतर्गत दरात घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचाच मोठा आर्थिक फटका बसून कारखाने अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे.
देशातून परदेशात पाठवण्यात येत असलेला शेतमाल युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक बंदरे आणि समुद्रातील मार्गांवरच अडकून पडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे निर्यात प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असून याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचं सांगितलं जात आहे. अशाचप्रकारे साखर निर्यात ठप्प राहिली, तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी राज्यातील साखर कारखान्यांच्या आर्थिक नुकसानीवर सडेतोड भाष्य करताना साखर कारखाना हा उद्योग ग्रामीण भागाला चालना देणारा उद्योग असून गेल्या दोन वर्षांत सहावेळा FRP वाढली पण MSP एकदाही वाढली नसल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं.
याचवेळी त्यांनी काही कारखान्यांना NCDC च्या माध्यमातून मदतीची गरज असताना मदत केली जात नाही, असा आरोपही केला. साखर उद्योगासाठी सरकारी पातळीवर मुख्यमंत्री काय निर्णय घेणार आहेत? अशी विचारणाही सतेज पाटलांनी सहकार मंत्र्यांकडे केली होती.
तसेच यावेळी त्यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना टोला लगावताना तुमच्या काळात 50 टक्के साखर कारखाने बंद पडले असा इतिहास लिहू देऊ नका, असा खोचक टोला विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी सहकार मंत्री बाबासाहेब यांना लगावला होता. यावर बाबासाहेब पाटील यांनी लवकरच राज्य पातळीवरील साखर कारखानदारांची बैठक घेण्याचं आश्वासन दिल्याची माहिती समोर आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.