

Kolhapur Municipal Election News: कोल्हापूर महापालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या दिग्गजांच्या लढतीबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. या लढतीत बाजी कोण मारणार हे आज दुपारी समजेल. त्यातही ज्या नऊ ठिकाणी १८ माजी नगरसेवकच आमने-सामने आहेत, त्या प्रभागातील निकालाची उत्सुकता तर शिगेला पोहचली आहे.
भाजपचे संजय निकम व काँग्रेस पुरस्कृत विधानसभेचे उमेदवार, माजी नगरसेवक राजेश लाटकर या लढतीकडेही प्रभागाच्या नजरा लागल्या आहेत. दोघेही उमेदवार ताकदवान तर आहेतच, पण या दोघांच्या निमित्ताने आमदार सतेज पाटील व खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
अशीच लढत प्रभाग क्र. ९ मध्ये राहुल माने विरुद्ध शारंगधर देशमुख या दोन माजी नगरसेवकांत होत आहे. याठिकाणीही आमदार पाटील यांच्याबरोबरच पालकमंत्री प्रकाश आबिटकर व आमदार क्षीरसागर यांची या प्रभागातील ताकद स्पष्ट करणारी ठरणार आहे. प्रभाग क्रमांक सहामधील माजी नगरसेवक नंदकुमार मोरे व प्रतापसिंह जाधव यांचीही लक्षवेधी लढत चर्चेचा विषय आहे.
या प्रभागाला लागून असलेल्या प्रभाग क्रमांक सातमध्ये माजी नगरसेवक उमा बनछोडे विरुद्ध माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांच्या पत्नी दीपा ठाणेकर यांच्यातील लढत ही दोघांचेही राजकीय भवितव्य ठरवणारी ठरणार आहे.
प्रभाग क्रमांक ११ ब मधील तिरंगी लढतीत काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या पत्नी व माजी नगरसेविका जयश्री चव्हाण, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवक यशोदा मोहिते व 'जनसुराज्य'च्या चिन्हावर रिंगणात असलेल्या माजी नगरसेविका शारदा देवणे यांचा कस लागणार आहे.
क्षीरसागर-सरदार लढत प्रतिष्ठेची शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज यांच्या विरोधात अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या विजय साळोखे सरदार या लढतीकडे तर संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे. समाजमाध्यमांवरील आपल्या वैशिष्टपूर्ण प्रचाराने साळोखे यांनी केवळ प्रभागाचेच नव्हे, तर शहराचेही लक्ष वेधून घेतले आहे. ही लढत आमदार क्षीरसागर यांच्यादृष्टीने प्रतिष्ठेची ठरणार आहे.
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष आदिल फरास व काँग्रेसचे ईश्वर परमार या दोन दिग्गज माजी नगरसेवकांतील लढतीवर तर थेट बेटींग लागले आहे. अशीच स्थिती अजित मोरे विरुद्ध विनायक फाळके या दोन माजी नगरसेवकांच्या प्रभाग क्रमांक १४ ड मधील लढतीची आहे. भाजपच्या रूपाराणी निकम व काँग्रेसचे भूपाल शेटे या दोन ताकदीच्या माजी नगरसेवकांतील लढतही लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.
माजी महापौर सई खराडे यांचे पुत्र शिवतेज व माजी नगरसेवक इंद्रजित बोद्रे या नात्या-गोत्यातील लढतीवर शिवाजी पेठेचे भविष्यातील राजकारणच ठरणार आहे. भाजपचे विजयसिंह खाडे व काँग्रेसचे मधुकर रामाणे या दोन माजी नगरसेवकांतील काटाजोड लढतीने प्रभागाचे लक्ष वेधले आहे.
याशिवाय माजी नगरसेवक शिवाजी डवरी यांच्या पत्नी व माजी शिक्षण समिती सभापती प्रेमा डवरी विरुद्ध दिलशाद सत्तार मुल्ला या पारंपरिक विरोधकांतील लढतही चुरशीची होण्याची शक्यता आहे. डवरी या राष्ट्रवादी अजित पवार पक्षांकडून, तर मुल्ला या काँग्रेसकडून रिंगणात आहेत.
१६ ठिकाणी दुरंगी लढत एकूण ८१ ठिकाणांपैकी १६ ठिकाणी थेट दुरंगी लढतीचे चित्र आहे. यापैकी दहा ठिकाणी काँग्रेस विरुद्ध भाजप, तर सहा ठिकाणी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा सामना आहे. पैशाचा वारेमाप वापर, शेवटच्या क्षणापर्यंत एका-एका मतासाठी सुरू असलेली चुरस आणि नेत्यांनी लावलेला बळाचा पट या १६ ठिकाणी कुणाला विजयापर्यंत नेणार हे उद्या स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.