

स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, राष्ट्रवादी आणि महायुतीमध्ये वाद-प्रतिवाद सुरू झाले आहेत.
आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांना लोकसभेला केलेली मदत ही मोठी चूक असल्याचे वक्तव्य केले.
यावर तटकरे यांनी पलटवार करत, “ते डोक्यावर पडलेले आमदार आहेत” अशी जोरदार टीका केली.
Raigad News : कोकणातील रायगड जिल्ह्यात महायुतीमधील शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यात वाद आता विकोपाला गेला असून तो अद्याप थांबलेला नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते तथा मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात वाद- प्रतिवाद आणि आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. नुकताच युतीच्या प्रस्तावरून तटकरे यांनी गोगावलेंची खिल्ली उडवली होती. त्यामुळे येथे वाद चिघळला होता. यादरम्याम आता पुन्हा एकदा आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरेंवर हल्लाबोल करत जोरदार टीका केली होती. त्या टीकेला राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी त्याच शब्दात उत्तर दिले आहे. ज्याची सध्या जिल्ह्यात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
महेंद्र दळवींनी काही दिवसांपूर्वी, लोकसभा निवडणुकीत आम्ही मतभेद बाजूला ठेवून सुनील तटकरेंना दिल्लीला पाठवलं, पण त्यांनी आम्हाला फसवलं, असा हल्लाबोल केला होता. तसेच दळवी यांनी, तटकरे यांना लोकसभेला केलेली मदत ही सर्वात मोठी चूक होती, ती चूक सुधारणे आता काळाची गरज असून आम्ही कोलाड नाक्यावरील 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार देखील पाहिल्याचे म्हणत तटकरेंवर आगपाखड केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीमध्ये निवडणुकांपूर्वीच वादाचा भडका उडाला आहे.
दळवी यांनी केलेल्या टीकेवरून राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी महेंद्र दळवी हे डोक्यावर पडलेले आमदार असल्याचे म्हणत पलटवार केला आहे. यावेळी ते म्हणाले की, शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी हे डोक्यावर पडलेले आमदार असून ते स्वतः चिटर आमदार आहेत. त्यामुळेच ते दुसऱ्यालाही त्याच नजरेने पाहतात.
आमदार दळवी हे आमच्या नेत्यांवर बेताल वक्तव्य करत असून त्यांच्या या बेताल वक्तव्याला आवर घालण्यासाठी आम्ही त्यांचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करणार आहोत. याशिवाय महेंद्र दळवी हे स्वतःला मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे समजत आहेत, आता त्यांना आवरण्याची गरज आहे, असेही तटकरे यांनी म्हटले. राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी काल रोह्यात शिवसेना पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाला उत्तर देताना अनिकेत तटकरे यांनी आगामी निवडणुकीत सर्व जागा आम्ही जिंकू, असा दावाही त्यांनी केलाय.
दरम्यान या घणाघाती टीकेनंतर आता महेंद्र दळवी यांनी पलटवार केला असून घोडा मैदान आता जास्त लांब नाही, त्यामुळे येथे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईलच असे म्हटले आहे. तसेच आमदार असणाऱ्यांना त्यांच्याच होम ग्राउंडवर उमेदवार सापडत नाहीत, त्यांनी आम्हाला आवाहन देऊ नये असा टोलादेखील दळवींनी लगावलाय.
काय म्हणाले होते दळवी
रायगडच्या कोलाडमधील पक्ष प्रवेश कार्यक्रम प्रसंगी आमदार दळवी यांनी, सध्या राज्यातील परिस्थिती भयानक असून समोर येत असलेले घोटाळे पाहता हे घोटाळे निवडणुकीपूर्वी कसे समोर आले? याचा शोध घ्यावा लागेल. तर काही राष्ट्रवादीचे नेतेच त्यांच्याच नेत्यांचा घात करत असल्याचा आरोप देखील दळवी यांनी सुनील तटकरे यांचं नाव न घेता केला.
तर भरत गोगावले हे मंत्री असल्यामुळे त्यांना काही बंधने आहेत त्यामुळे त्यांना जास्त बोलता येत नाही. त्यामुळे मी खरं बोलतोय. तटकरे यांना लोकसभेला आम्ही निवडणून दिले. मात्र, त्यांना त्यावेळी दिलेली माफी आता आमच्या अंगलट आली आहे. पण आता या चुकीला दिलेल्या माफीचा आता शेवट करण्याची वेळ आल्याचेही ते म्हणाले.
1. महेंद्र दळवी यांनी काय वक्तव्य केले?
महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांना लोकसभेला केलेली मदत ही मोठी चूक असल्याचे म्हटले आहे.
2. अनिकेत तटकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली?
अनिकेत तटकरे यांनी दळवी यांच्यावर पलटवार करत “डोक्यावर पडलेले आमदार” अशी टीका केली आहे.
3. या वादात भरत गोगावले यांचा काय सहभाग आहे?
भरत गोगावले हे या प्रकरणात मध्यस्थ नेते असून त्यांनी दोन्ही बाजूंकडून संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे.
4. हा वाद कोणत्या पार्श्वभूमीवर सुरू झाला?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद उफाळला आहे.
5. याचा परिणाम निवडणुकीवर कसा होऊ शकतो?
या वादामुळे महायुतीतील तणाव वाढून उमेदवारी आणि प्रचारात मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.