

Sindhudurg News : मुंबईतील प्रसिद्ध ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’ आणि गुजरातच्या जगप्रसिद्ध ‘वनतारा’ प्रकल्पाच्या धर्तीवर आता दोडामार्ग येथील तिलारी खोऱ्यात भव्य राष्ट्रीय उद्यान साकारणार आहे. आमदार प्रमोद जठार यांनी पावसाळी अधिवेशनात मांडलेल्या लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली. तिलारी परिसरात हे राष्ट्रीय उद्यान उभारण्यास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली असून, या उद्यानाला ‘श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी राष्ट्रीय उद्यान’ असे नाव देण्यात येणार आहे.
या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करताना पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. या प्रकल्पामुळे आता दोडामार्ग तालुका थेट जगाच्या आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर येईल आणि येथील निसर्ग व जैवविविधता जागतिक पातळीवर पोहचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वनमंत्र्यांच्या या घोषणेनंतर संपूर्ण सिंधुदुर्गात आणि स्थानिक पर्यटन व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विस्तीर्ण वनक्षेत्र आणि दाट जैवविविधतेमुळे तिलारी खोऱ्याला 'सिंधुदुर्गचे अॅमेझॉन' म्हणून ओळखले जाते. हा परिसर 'टायगर कॉरिडॉर' म्हणून प्रसिद्ध असून येथे नैसर्गिकरीत्या सिंह वगळता जवळपास सर्वच वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. कोकणातील पर्यटन सहसा ठराविक हंगामापुरते मर्यादित असते. मात्र, या राष्ट्रीय उद्यानामुळे आणि इथे सुरू होणाऱ्या जंगल सफारीमुळे सिंधुदुर्गातील 'बारमाही पर्यटनाला' एक नवी व भक्कम दिशा मिळणार आहे.
गोवा येथील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हे उद्यान अवघ्या काही अंतरावर आहे. त्यामुळे देश-विदेशातील पर्यटकांना थेट आकर्षित करणे सोपे होईल, ज्यामुळे दोडामार्ग तालुका जागतिक स्तरावर हायलाइट होणार आहे. गुजरातच्या प्रसिद्ध 'वनतारा' प्रकल्पाप्रमाणेच या उद्यानात वन्यजीवांचे अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाचे संरक्षण व संवर्धन केले जाईल. पर्यटकांसाठी येथे खास 'जंगल सफारी' सुरू करण्यात येणार आहे. यामुळे वन्यजीवप्रेमींना थेट निसर्गाचा आणि प्राण्यांचा थरार अनुभवता येईल.
या प्रकल्पामुळे हॉटेल, ट्रॅव्हल्स, गाईड्स आणि स्थानिक उत्पादने विकणाऱ्या लघुउद्योजकांसाठी बारमाही व्यवसायाच्या आणि रोजगाराच्या हजारो नव्या संधी उपलब्ध होतील. पर्यायाने स्थानिक अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलणार आहे. पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, दोडामार्ग तालुक्याला निसर्गाने भरभरून वैभव दिले आहे.
आमदार प्रमोद जठार यांनी अधिवेशनात केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे आणि वनमंत्र्यांच्या मंजुरीमुळे दोडामार्गच्या शाश्वत विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. हे राष्ट्रीय उद्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचे होणार असल्याने, जगभरातील पर्यटकांची पावले आता दोडामार्गकडे वळतील आणि हा परिसर जागतिक पर्यटनाचे प्रमुख केंद्र बनेल.
सिंधुदुर्गच्या अर्थव्यवस्थेचे चित्र बदलणार
आमदार प्रमोद जठार यांचा पुढाकार, वनमंत्री गणेश नाईक यांची मंजुरी आणि राज्य सरकारचा सकारात्मक निर्णय यामुळे हा प्रकल्प सिंधुदुर्गच्या अर्थव्यवस्थेचे चित्र बदलणारा ठरणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने आमदार जठार, वनमंत्री नाईक व राज्य सरकारचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.