

Kokan Political News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार भास्कर जाधव यांच्यावर भाजपचे प्रेम काही जास्तच उतू जात असल्याचे समोर आले आहे. नुकताच भाजपचे नेते तथा कॅबिनेट मंत्री आशीष शेलार यांनी जाधव यांच्या कार्यालयाला भेट दिली होती. यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अशातच भाजपचे आमदार प्रमोद जठार यांनी जाधव यांना थेट भाजपमध्ये येण्याचे खुले निमंत्रण दिले. ज्यानंतर या ऑफरची राज्यभर जोरदार चर्चा रंगली. मात्र, जाधव यांनी या ऑफरवर अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. यामुळे विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
आठ ते दहा दिवसांपूर्वीच राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि भाजप नेते आशीष शेलार यांनी चिपळूण येथे जाऊन आमदार भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली होती. यावेळी शेलार यांचे नगरसेवकांनी जोरदार स्वागत केले होते. तसेच दोन्ही नेत्यांमधील नियोजित भेटीदरम्यान शेलार यांना उशीर झाल्याने प्रत्यक्ष भेट होऊ शकली नव्हती. तरीही या अनपेक्षित भेटीमुळे कोकणातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले होते.
या चर्चा संपतात न संपतात तोच भाजपचे आमदार प्रमोद जठार यांनी जाधव यांना भाजपमध्ये येण्याचे खुले निमंत्रण दिले. 'जाधव, कोकणाला तुमची गरज आहे, तुम्ही आम्हाला पाहिजे आहात,' असे भाष्य जठार यांनी केले होते. त्याचबरोबर जाधव यांना खुली ऑफर देत, जाधव हे ज्येष्ठ आमदार असून राज्याच्या राजकारणात त्यांचे वेगळे स्थान असल्याचे म्हटले होते.
तसेच ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांना जे काम द्यायला पाहिजे ते दिले जात नाही, त्यांचा उपयोग करून घेतला जात नाही आणि त्यांना विरोधी पक्षनेताही करत नाहीत, असा टोला लगावला होता. तर भास्कर जाधव यांची सत्तेत गरज असल्याचेही म्हटले होते. ज्यानंतर जठार यांच्या वक्तव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जाधव यांनी भाष्य केले आहे. मात्र, त्यांनी भाजपच्या ऑफरवर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
यावेळी जठार हे माझे जुने मित्र आहेत. त्यांनी माझ्याबद्दल व्यक्त केलेल्या सहानुभूतीबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे, असे जाधव म्हणाले. 'प्रमोद जठार यांच्याशी माझे अनेक वर्षांचे मैत्रीचे संबंध आहेत. त्यांना माझी कार्यपद्धती आणि स्वभाव चांगला माहिती आहे. मी एकदा दिलेला शब्द पाळण्यासाठी कोणतेही संकट स्वीकारण्याची तयारी ठेवतो. त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेल्या भावना आणि सहानुभूतीबद्दल मी त्यांचे आभार मानतो.' पण जठार यांच्या ऑफरला थेट उत्तर देणे त्यांनी टाळले आहे. याचवेळी भास्कर जाधव यांनी, भाजपमध्ये प्रवेशाची ऑफर देण्यापेक्षा विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असा टोला आमदार जठार यांना लगावला आहे.
यादरम्यान, आता जठार यांनी जाधव यांना दिलेली ऑफर वैयक्तिक पातळीवर की, भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करून दिली, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. भाजपचे केंद्रीय अथवा राज्यातील वरिष्ठ नेते जाधव यांना पक्षात घेण्यास तयार आहेत का? असा प्रश्नही उपस्थित केला जात होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.