

Ratnagiri News : जवळपास दोन वर्षांपासून रखडलेला रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यावर रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे. तर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आले आहे. राज्य शासनाने यासंदर्भातील आदेश जारी केले. यानंतर गोगावले यांच्यासह गिरीश महाजन यांचे त्यांच्या जिल्ह्यात जंगी स्वागत केले जात आहे. यामुळे गोगावले-महाजन यांच्या कार्यकर्त्यांत जल्लोष पाहायला मिळत आहे.
पण दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून या नियुक्त्यांवरून टीका केली जात आहे. महाजन-गोगावले पालकमंत्री होताच आमदार भास्कर जाधवांनी बोचरी टीका केली आहे. त्यांनी महाजनांना भ्रष्टाचाराचं प्रमोशन देण्यात आलं असून, गोगावले यांना नाशिकप्रमाणेच रायगडातही खड्डे पाडण्यासाठी पालकमंत्री करण्यात आले आहे, असे म्हणत टोला लगावला आहे.
रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा प्रश्न आता सुटला असून, गोगावले-महाजन यांच्यावर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पण या घोषणेआधीच महायुती सरकारने १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला ध्वजारोहणाची जबाबदारी या दोघांकडे देत पालकमंत्रिपदाबाबत संकेत दिले होते. रायगड जिल्ह्यात ध्वजारोहणाची जबाबदारी भरत गोगावले यांच्याकडे आणि नाशिकची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आली.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात कुंभमेळ्यातील कथित भ्रष्टाचारावरून वाद सुरू झाला असून, गिरीश महाजन यांच्या नातेवाईकांचा यात समावेश असल्याचा आरोप होत आहे. तसेच रायगड जिल्ह्यात रस्त्यावरील खड्ड्यांवरून नागरिक त्रस्त झाले असून, काहीच दिवसांपूर्वी शाळकरी मुलींनी केलेल्या ग्राऊंड रिपोर्टिंगमुळे येथील रस्त्यांची दुरवस्था जगासमोर आली होती. यामुळे खुद्द आमदार महेंद्र थोरवेंना समोर येऊन स्पष्टीकरण द्यायला लागले होते. एकीकडे जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार अधिक असताना, राज्यात शिवसेना सत्तेत असतानाही जिल्ह्यातील रस्त्यांच्या अवस्थेवरून नाराजी व्यक्त केली जात होती.
या आरोपांच्या दरम्यानच महाजन यांची नाशिकच्या, तर गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीवरूनच आता वाद सुरू झाला असून, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी भरत गोगावले आणि गिरीश महाजन यांच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीवर जोरदार टीका केली आहे.
भास्कर जाधव यांनी, नाशिकमधील कुंभमेळ्याच्या तयारी आणि टेंडर प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचाराचे प्रमोशन म्हणून महाजन यांना नाशिकची धुरा देण्यात आली आहे, अशी टीका जाधवांनी केली आहे. तर मुंबई-गोवा महामार्गावर अधिक खड्डे पाडण्यासाठीच भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रिपद दिले असावे, असा टोला लगावला आहे.
तसेच राज्यात गाजणाऱ्या रस्त्यांच्या खड्ड्यांवरून टीका करताना, त्यांनी आपल्या मतदारसंघाचा दाखला दिला आहे. माझ्या मतदारसंघात दहा वर्षांपूर्वी रस्ते केले असून, त्याला एकही खड्डा नाही. मात्र, सध्याच्या सरकारमध्ये जे रस्ते झाले, त्या ठिकाणी रस्ते शोधावे लागतात. रस्ता कुठे आणि खड्डे कुठे, हा प्रश्न पडतो, असे म्हणत जाधव यांनी टीका केली आहे.
राजकीय समझोता
दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली होती. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा विषय दीर्घकाळ प्रलंबित होता. तर रायगडच्या पालकमंत्रिपदावरून एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही रस्सीखेच सुरू होती. पण नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीवेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे सुपुत्र तथा अदिती तटकरे यांचे बंधू अनिकेत तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी शिवसेनेच्या सहकार्याच्या पार्श्वभूमीवर रायगडचे पालकमंत्रिपद सोडण्याबाबत राजकीय समझोता झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.