

Ratnagiri News : काहीच दिवसांपूर्वी लोटे एमआयडीसी औद्योगिक वसाहतीतील विजय केमिकल कंपनीच्या परिसरात शिंदेंच्या शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन काते यांना मारहाण झाली होती. या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव यांच्यासह अन्य दहा जणांवर गुन्हा दाखल झाला होता. ज्यानंतर त्यांनी शिंदे गटाचे पदाधिकारी व्यावसायिकांकडे खंडणी मागून लूट करत आहेत. आमच्या कंपनीच्या सुपरवायझरकडे दहा लाखाची खंडणी मागण्यात आली असा आरोप केला होता. ज्यानंतर विक्रांत जाधव यांच्याविरोधात शिवसेनेतून टीकेची झोड उठवण्यात आली आहे. योगेश कदम यांनी तर विक्रांत जाधव यांचे सर्व आरोप निराधार असल्याचे म्हणत त्यांनी, दुसऱ्याच्या बदनामीत समाधान मानू नये, अशी खोचक टीका केली होती. आता या वादात भास्कर जाधव यांनी उडी घेतली असून मुलावर आरोप आणि टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दापोली येथे घेण्यात आलेल्या गटनिहाय आढावा बैठकीत ते बोलत होते.
लोटे एमआयडीसीत काम करायचे असेल तर आम्हाला विश्वासात घ्या,दहा लाखाची खंडणी द्या अशी मागणी शिंदे सेनेच्या युवासेनेचे पदाधिकाऱ्यांनी सुपरवायझर दर्शन शिंदे यांच्याकडे करत काम बंद पाडले होते. तसेच धमकीही देण्यात आली होती. याप्रकरणी खेड पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर ती काही नावे नाव वगळून तक्रार दिल्यास ती घेतो अशी अट ठेवली. तसेच कदम यांच्या दबावामुळेच ती घेण्यात आली नाही. यानंतरच आम्ही जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केल्याचा आरोप विक्रांत जाधव यांनी केला होता.
ज्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी जाधव यांनी केलेले सर्व आरोप निराधार असून ते विधिमंडळातील ज्येष्ठ नेते भास्कर जाधव त्यांचे मुलगे असून त्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये करणे योग्य नाही. जाधव यांनी विकासावर बोलावे. स्वतःची बदनामी करून घेतलीच आहे आता दुसऱ्याची बदनामी करण्यात समाधान मानू नये, असा टोला कदम यांनी लगावला होता. तसेच जाधव यांनी केलेले सर्व आरोप निराधार असून पोलिस आपले काम स्वतंत्रपणे करत असतात, कोणतीही नावे वगळण्याबाबत निर्देश दिलेले नाहीत. या प्रकरणाचे सत्य लवकरच समोर येईल, असाही दावा त्यांनी केला होता.
आता या प्रकरणात आमदार भास्कर जाधव यांनी निशाना साधला असून विकासाची भाषा करणारे आज सर्वत्र दिसतात. पण ज्या मतदार संघाचे नेतृत्व गृहराज्यमंत्री करत आहेत त्या भागातील रस्ते आणि सुविधांची अवस्था आजही बिकट आहे. पैशाने निवडणुका जिंकल्या जातात; पण लोकांची मने मात्र विचारानेच जिंकली जातात, असा टोला लगावला आहे.
रामदास कदम यांचा भाऊ अण्णा कदम आणि जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण हॉटेलमध्ये बसून भुरट्या चोरांना पाठवून माझ्या मुलाकडून दहा लाखाची खंडणी आणायला सांगतात. यामध्ये त्यांची काही चूक नाही. त्यांचा नेताच बाया नाचवून पैसे जमा करणारा असेल तर ते तरी काय करणार, अशा शेलक्या भाषेत रामदास कदम आणि योगेश कदम यांचा समाचार घेतला. तसेच आम्ही आमच्या आयुष्यात कार्यकर्त्यांना किंवा इतर कोणालाही अशी वळणे लावली नाहीत, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.