

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी महायुतीची घोषणा खासदार नारायण राणे यांनी केली.
जागावाटपात इच्छुक मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने भाजप पदाधिकाऱ्यांत तीव्र नाराजी निर्माण झाली.
ओरोस मंडळ अध्यक्षांसह एकूण 43 भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडे राजीनामे दिले.
Sindhudurg News : राज्यात नगर पालिका नगर पंचायतींसह आता महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपसह महायुतीला मोठं यश मिळाले आहे. या यशानंतर आता महायुतीने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसह कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती जाहीर करण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी ही महायुतीची घोषणा करत जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला.
तसेच आम्हाला ‘विरोधकच नाहीत’ असा दावा केला. पण आता त्यांचा हा दावा त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी फोल ठरवला असून या महायुतीला विरोध केला आहे. तसेच मंडळ अध्यक्ष, ओबीसी जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य यांच्यासह अनेकांनी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्या नाट्यानंतर आता भाजपसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती जाहीर करण्यात आली आहे. पण या घोषणेनंतर भाजप पदाधिकाऱ्यांत 'नाराजी नाट्य' सुरू झाले आहे. महायुतीच्या वाटाघाटीत निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने ही नाराजी सुरू झाली असून ओरोस मंडळ अध्यक्ष भाई सावंत, ओबीसी जिल्हाध्यक्ष छोटू पारकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य लॉरेन्स मान्येकर, उदयकुमार जांभवडेकर यांच्यासह ४३ जणांनी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडे राजीनामा दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होताच खासदार नारायण राणे यांनी महायुतीची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजप, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला जाहीर केला आहे. यात भाजप ३१, शिवसेना १९ जिल्हा परिषद मतदारसंघ निश्चित करण्यात आले; मात्र या फॉर्म्युल्यानंतर अवघ्या काही तासांतच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप ओरोस मंडळ अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दिलेल्या राजीनाम्यात, मी ओरोस मंडळ अध्यक्ष या पदाचा राजीनामा देत आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत या पदावर राहून काम करणे मला आता उचित वाटत नाही. माझी कोणत्याही नेत्यावर नाराजी नाही. तरी माझा हा राजीनामा त्वरित स्वीकारण्यात यावा, असे नमूद केले आहे. हा राजीनामा त्यांनी जिल्हाध्यक्ष सावंत यांना सादर केला आहे. ही माहिती त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
भाई सावंत यांच्या राजीनाम्यानंतर ओरोस मंडळमधील ओबीसी जिल्हाध्यक्ष छोटू पारकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य मान्येकर, उदयकुमार जांभवडेकर, ओरोस मंडळ उपाध्यक्ष आबा मुंज, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष जयेश चिंचळकर यांच्यासह अनुसूचित जाती मोर्चा मंडळ अध्यक्ष सुनील जाधव, ओरोस मंडळामधील बूथ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख असे मिळून ४३ जणांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात खासदार राणे यांच्या नेतृत्वाखाली महायुती एकत्रित निवडणुका लढवत आहे. याबाबत आजच नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला; मात्र त्यानंतर भाजपात नाराजी नाट्य पाहायला मिळाले. यानंतर राजीनाम्यावर भाजप पदाधिकारी ठाम राहतात की वरिष्ठ त्यांची समजूत काढतात, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. राजीनाम्यावर भाजप पदाधिकारी ठाम राहिल्यास ओरोस मंडळमध्ये भाजपचे मोठे नुकसान होणार आहे.
1) सिंधुदुर्गात महायुती कोणी जाहीर केली?
माजी केंद्रीय मंत्री व भाजप खासदार नारायण राणे यांनी महायुतीची घोषणा केली.
2) महायुतीत कोणकोणते पक्ष सहभागी आहेत?
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष महायुतीत सहभागी आहेत.
3) भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामे का दिले?
जागावाटपात निवडणूक लढवू इच्छित मतदारसंघ शिवसेनेला दिल्यामुळे नाराजी निर्माण झाली.
4) किती भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत?
एकूण 43 भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामे सादर केले आहेत.
5) या नाराजीचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
भाजपमधील अंतर्गत असंतोषामुळे महायुतीच्या निवडणूक रणनितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.