
तळ कोकणात स्थानिक स्वराज्य निवडणुका जवळ आल्याने मोर्चेबांधणी वेग घेत आहे.
सिंधुदुर्गातील कुडाळ नगरपंचायतीत भाजपने मोठी कारवाई केली.
नगराध्यक्षासह सहा नगरसेवकांना निलंबित करण्यात आले.
ही कारवाई भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली.
शिवसेना कार्यक्रमांना हजेरी लावल्यामुळे ही कारवाई झाल्याची चर्चा आहे.
Kudal News : तळ कोकणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला वेग आला आहे. अशातच भाजपनेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्याच नगराध्यक्षासह पाच नगरसेवकांवर कारवाईचा बडगा उगारत खळबळ उडवून दिली आहे. भाजपच्या ‘कमळ’ चिन्हावर निवडून आलेल्या कुडाळ नगरपंचायतमध्ये ही कारवाई झाली असून येथे भाजपचे आठ नगरसेवक निवडून आले होते. ही कारवाई जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली असून निलंबनाचे पत्र सर्व नगरसेवकांना पाठवण्यात आले आहे. तर ही कारवाई शिवसेनेच्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यावरून करण्यात आल्याची येथे चर्चा सुरू आहे.
आगामी स्थानिकच्या तोंडावर जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. येथे पक्ष फोडण्यापर्यंत आव्हान देण्यात आले होते. जे स्विकारत संजू परब यांनी काही पक्ष प्रवेशही करून दाखवले होते. दरम्यान भाजपचे कुडाळ नगरपंचायतीचे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकरांसह पाच नगरसेवकांवर शिवसेनेच्या कार्यक्रमात उठबस अधिक तर भाजपच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे कारण देत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्ष सावंत यांनी ही कारवाई केल्यानंतर जिल्हाधिकारी यांना सुद्धा लेखी पत्र दिले आहे. त्यांनी नगरसेविका संध्या तेरसे व नगरसेवक रामचंद्र ऊर्फ नीलेश परब यांना त्या आठ जणांच्या गटातून वगळण्यात यावे अशी विनंती केली आहे. सावंत यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता कुडाळमधील महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
सावंत यांनी म्हटले आहे की, भाजप पक्षाच्या ‘कमळ’ निशाणीवर निवडून आलेल्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, संध्या तेरसे, रामचंद्र परब यांचा अधिकृत सिद्धिविनायक नगरविकास आघाडी हा गट स्थापन आहे. मात्र गेल्या काही महिन्यापासून या गटातील नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी हे सहा नगरसेवक पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये सहभागी होत नाहीत, त्यांना वेळोवेळी सूचना देवूनही याकडे लक्ष दिले जात नाही.
उलट इतर राजकीय पक्षांच्या व्यासपीठावर हजर राहणे, पक्षाच्या अधिकृत सदस्यता नोंदणी मोहिमेत सहभागी न होणे आणि सक्रिय सदस्यत्व न घेणे, इतर पक्षाच्या सभासद नोंदणी कार्यक्रमांना हजेरी लावणे, पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात सार्वजनिक विधाने केली जात आहेत. तसेच बॅनरवर पक्षनेत्यांचे फोटो न लावता, इतर पक्ष नेत्यांचे फोटो प्रदर्शित केली जात आहेत.
यामुळे कुडाळ नगरपंचायत क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी यासंदर्भात नगराध्यक्षांसह संबंधित नगरसेवकांना प्रत्यक्ष व दूरध्वनीद्वारे तोंडी समज देण्यात आली होती. मात्र यांनी पक्षशिस्त पाळलेली नाही. यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याने भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षघटनेतील अधिकारांचा वापर करून नगराध्यक्षांसह सहाही नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
या सर्वांना 11 ऑगस्टपासून पक्षातील सर्व पदांवरून व प्राथमिक सदस्यत्वातून निलंबित करण्यात आले आहे. श्री सिद्धिविनायक नगरविकास आघाडी या गटात सौ. संध्या प्रसाद तेरसे व रामचंद्र ऊर्फ नीलेश मनोहर परब हे राहण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे या दोघांना वगळून इतर सहा जणांवर कारवाई करण्यात यावी. यांनी श्री. सिद्धिविनायक नगरविकास आघाडी या गटातून वगळण्यात यावे अशी विनंती जिल्हाधिकारी यांना केली आहे.
दरम्यान भाजपने केलेल्या या कारवाईबाबत आमदार नीलेश राणे यांना विचारले असता त्यांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले. त्यांनी, यावर प्रतिक्रिया देताना, नगरसेवकांच्या निलंबनाचे अधिकृत किंवा जाहीररित्या कोणी स्टेटमेंट केलं आहे का? अशी विचारणा केली. तसेच जर कोणी बोलले असेल तरच त्यावर मला बोलत येईल, अन्यथा मी बोलण्यास बांधील नाही, असे म्हणत त्यांनी या प्रकरणातून काढता पाय घेतला आहे.
प्रश्न 1: ही कारवाई कुठे झाली?
➡️ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ नगरपंचायतमध्ये.
प्रश्न 2: किती नगरसेवकांवर कारवाई झाली?
➡️ नगराध्यक्षासह सहा नगरसेवकांवर.
प्रश्न 3: कारवाई कोणी केली?
➡️ भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी.
प्रश्न 4: कारवाईचे कारण काय सांगितले जात आहे?
➡️ शिवसेनेच्या कार्यक्रमांना नगरसेवकांनी हजेरी लावली म्हणून.
प्रश्न 5: या कारवाईचा पुढील परिणाम काय होऊ शकतो?
➡️ भाजप गोटात खळबळ माजून स्थानिक निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.