

स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी भाजपने रत्नागिरीत जनता दरबार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या कार्यक्रमाचं नेतृत्व जेष्ठ नेते नारायण राणे करणार असून तो शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात होणार आहे.
महायुती एकत्र लढण्याचा दावा असतानाही भाजपचा स्वतंत्र कार्यक्रम चर्चेत आला आहे.
Ratnagiri News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधीच तळकोकण आणि कोकणात जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुतीतील तिन्ही पक्षांकडून मोर्चे बांधणीली वेग आला असून राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना महायुती म्हणून लढणार असल्याचे सांगत आहे. पण भाजपकडून रत्नागिरीसह सिंधुदुर्गमध्ये स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. यामुळे आता महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे बोलले जात आहे. अशातच आता चेतावणी देणाऱ्या उदय सामंत यांच्या बालेकिल्ल्यात भाजप जनता दरबार घेणार असल्याचे समोर येत आहे. यामुळे स्थानिकच्या आधीच येथे राजकीय वातावरण आता चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादीकडून दिल्या जाणाऱ्या स्वबळाच्या नाऱ्यावरून उदय सामंत यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यांनी खुमखुमी म्हणत आमदार शेखर निकम आणि भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना फटकारले होते. ज्यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये युती होणार नाही अशी घोषणा केली.
त्यापाठोपाठ उदय सामंत यांनी देखील जे सिंधुदुर्गमध्ये होईल तोच पॅटर्न रत्नागिरीत वापरू असे म्हणत चेतावणी दिली. ज्याला पुन्हा नितेश राणेंनी हवा देत, त्यांना ताकद दाखवण्याची इच्छा असेल तर दाखवावी. आम्हाला भांड्याला भांड लावायचे नाही. पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनी स्वबळासाची परवानगी दिल्याचे सांगितले. त्यामुळे हा वाद आणखी वाढणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
अशातच नितेश राणेंचे बंधू निलेश राणे यांनी थेट आपल्याच भावाला आव्हान देत सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वबाळाचा नारा देत युती होणार नाही असे जाहीर केले. तसेच जिल्हा परिषदेवर भगवा फडवण्यासाठी शिवसैनिकांनी तयार रहावं असे आवाहन केले होते. यामुळे सिंधुदुर्गमध्ये युतीतच थेट लढत होणार हे चित्र पूर्ण स्पष्ट झाले आहे.
याचवेळी भाजपने मोठी खेळी खेळत रत्नागिरीत जनता दरबार घेण्याचे फर्माण सोडले आहेत. याची खासदार नारायण राणे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी भाजप राजकीय खेळी खेळत असल्याचे बोलले जात आहे. नारायण राणे रत्नागिरी, चिपळूण आणि देवरूख येथे जनता दरबार घेणार असून आगामी स्थानिकसाठी चाचपणी येथे केली जाणार आहे. तसेच नागरिकांनी आपले प्रश्न घेऊन दिलेल्या वेळेत उपस्थित राहून मांडावेत, असे भाजपने यावेळी आवाहन केले आहे.
नारायण राणे 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता चिपळूण येथील सहकार भवन येथे यांचा जनता दरबार घेणार आहेत. 29 ऑक्टोबरला दुपारी 12 वा. देवरूख येथील मराठा हॉल (भाजप तालुका कार्यालयजवळ) येथे देवरूख आणि संगमेश्वर तालुक्यासाठी जनता दरबार होणार आहे. तर 30 ऑक्टोबरला सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन डीपीडीसी सभागृहात रत्नागिरी तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न नारायण राणे जाणून घेणार आहेत. याच जनता दरबारात आगामी स्थानिकसाठी भाजपकडून आखणी करण्यात येणार असून उमेदावारांची चाचपणी देखील केली जाण्याची शक्यता आहे. याच शक्यतमुळे राणेंच्या खांद्यावर बंदुक ठेवून फडणवीस ‘धडाकेबाज’ खेळी खेळण्याची शक्यता असल्याची येथे चर्चा सुरू झाली आहे.
1. भाजपचा जनता दरबार कुठे आयोजित करण्यात आला आहे?
रत्नागिरीत, जो शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो.
2. या कार्यक्रमाचे नेतृत्व कोण करणार आहेत?
जेष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे जनता दरबाराचे नेतृत्व करणार आहेत.
3. जनता दरबाराचा उद्देश काय आहे?
स्थानिक जनतेशी थेट संवाद साधणे आणि निवडणुकीपूर्वी मतदारांशी संपर्क वाढवणे.
4. महायुतीतील इतर पक्षांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे?
एकनाथ शिंदे यांच्या गटातून यावर चर्चा आणि नाराजी व्यक्त होत असल्याचे वृत्त आहे.
5. या कार्यक्रमाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील संबंधांवर याचा प्रभाव पडू शकतो आणि स्थानिक निवडणुकांतील समीकरणे बदलू शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.