

दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन कायमची बंद केल्यामुळे कोकणवासियांमध्ये संताप वाढला आहे.
गोरखपूर एक्सप्रेसला मंजुरी दिल्याने यूपी-बिहारला प्राधान्य दिल्याचा आरोप होत आहे.
मनसेने १५ दिवसांचा अल्टिमेटम देत गाड्या रोखण्याचा इशारा दिला आहे.
Mumbai News : पूर्वांचलमधील प्रवाशांना खूश करत केंद्रीय रेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दादर-गोरखपूर रेल्वे सेवेला नियमित एक्सप्रेस ट्रेन म्हणून चालवण्यास मंजुरी दिली. पण यावेळी युपी-बिहारला खूश करण्यासाठी कोकणवासियांना मोठा धक्का दिला. कोकणात जाणारी दादर रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे कायमची बंद केली. याबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गोरखपूरचे खासदार रवी किशन यांना पाठवलेल्या अधिकृत पत्रातून दुजोरा मिळत आहे.
यावरून आता कोकणवासियांमध्ये संतापाची लाट उसळली असून पुन्हा दादर रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच याबाबत निर्णय झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. आता या वादात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नव निर्माण सेनेनं उडी घेतली आहे. तर थेट सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यात आला असून १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. तसेच योग्य कारवाई नाही झाली तर युपी-बिहारला जाणाऱ्या गाड्या रोखू असाही इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मुंबईतून कोकणात जाणाऱ्या सामान्य चाकरमान्यांसाठी रत्नागिरी-दादर पॅसेंजर ट्रेन महत्वाची असून ती रेल्वे खात्याने कोणतेही कारण न देता रद्द केली. तर ती फक्त दिव्यापर्यंतच चालवण्याचा निर्णय घेतला. यामुळे कोकणात जाणाऱ्या अनेक प्रवाशांची प्रचंड गैरसोय झालीय. यावरून कोकणवासियांकडून संताप व्यक्त करण्यासह अनेकदा आंदोलनाचा वापर करण्यात आला होता. तसेच दादर-रत्नागिरी पॅसेंजर सुरू करण्यात यावी म्हणून मध्य रेल्वेला निवेदन देखील देण्यात आले होते.
मात्र मागणी, विनंती, आंदोलने आणि निवेदनाकडे दुर्लक्ष करत दादर-गोरखपूर रेल्वे सेवेला नियमित करण्याचे काम रेल्वे मंत्रालयाने केले आहे. याविरोधात संतापाची लाट उसळली असतानाच आता यात मनसेने उडी घेतली आहे. तसेच ही पॅसेंजर ट्रेन दिवा स्थानकात न थांबता पूर्वीप्रमाणे दादर स्थानकापर्यंत चालवण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच याबाबत आक्रमक पवित्रा घेत येत्या 15 ते 20 दिवसांमध्ये या रेल्वे बाबत निर्णय न घेतल्यास उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेन रोखू असा इशाराही देण्यात आला आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी यावर आक्रमक भूमिका घेत मनसेची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, कोरोनाच्या काळात बंद ही रेल्वे बंद करण्यात आली. जेव्हा सुरू केली तीही फक्त दिवा स्थानकापर्यंतच. तर मागणी करूनही ती दादर स्थानकापर्यंत सुरु करण्यास रेल्वेने नकार दिला. कोकणवासियांच्या मागणी, आंदोलनाकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या या धोरणामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिवा स्थानकात जावे लागते. ज्यात गैरसोय होते. ही गैरसोय मनसेला मान्य नसून मनसे कोकणवासियांची गैरसोय खपवून घेणार नाही. यावर मार्ग काढला नाही तर रेल्वेला मनसे स्टाईल उत्तर दिले जाईल असाही इशारा त्यांनी दिला आहे.
संदीप देशपांडे यांनी कोकण रेल्वेसाठी कोकणवासियांनी त्यांची जमीन दिली असून रेल्वे विभाग आता या पद्धतीने वागत आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, पॅसेंजर ट्रेन दादरपर्यंत चालवल्यास लोकलच्या वेळापत्रकात गैरसोय होईल. मात्र आम्ही आमच्या मागणीवर ठाम असून कोकणवासीयांसाठी लढत राहू जर. ही गाडी रद्द होऊ नये, यासाठी मनसे स्टाइल उत्तर द्यावे लागेल तर तेही देवू. कोकणवासीय सहनशील आहेत म्हणून अजून किती अन्याय सहन करायचा? एकीकडे सरकार रो-रो सेवा सुरू करत आहे. मग मग रत्नागिरी-दिवा पॅसेंजर रेल्वेबद्दल महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी का बोलत नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
1. दादर-रत्नागिरी ट्रेन का बंद करण्यात आली?
गोरखपूर एक्सप्रेस नियमित करण्याच्या निर्णयामुळे ही सेवा बंद करण्यात आली.
2. या निर्णयावर कोण आक्रमक झाले आहे?
कोकणवासी आणि मनसे पक्षाने तीव्र विरोध दर्शवला आहे.
3. मनसेने काय इशारा दिला आहे?
१५ दिवसांत निर्णय न झाल्यास गाड्या रोखण्याचा इशारा दिला आहे.
4. हा निर्णय कोणी घेतला?
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली.
5. पुढे काय होऊ शकते?
या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात आंदोलन आणि राजकीय संघर्ष वाढू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.