
Raigad News: शिंदे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले आणि राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) मंत्री अदिती तटकरे यांच्यामध्ये रायगडच्या पालकमंत्रिपदावरून सुरू असलेला वाद संपत नाही तोच आता आमदार भरत गोगावले यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठे विधान केले आहे. "एकनाथ शिंदे आमच्या जिवावर मुख्यमंत्री झाले आहेत", असे विधान एका सभेत बोलताना गोगावलेंनी केले. त्यांच्या या विधानाची मोठी चर्चा रंगली आहे.
महाडचे आमदार भरत गोगावले हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. बुधवारी तर त्यांनी कहरच केला. अलिबाग येथील पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात गोगावलेंनी स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांनी नाही, तर त्यांच्या मूठभर मावळ्यांनी स्थापन केले, असे आणखी एक खळबळजनक वक्तव्य करीत अकलेचे तारे तोडले.
पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात पहिले नाव असूनही डावलल्याने गोगावलेंनी नंतर अनेक वादग्रस्त विधाने करीत वाद ओढवून घेतले आहेत. बुधवारीही अलिबागमध्ये बोलताना त्यांनी मावळ्यांनी जीवाला जीव देऊन स्वराज्य स्थापन केले, ते शिवाजी महाराजांनी नाही, असे वक्तव्य केले.
तसेच एकनाथ शिंदे हे त्यांच्या एकट्याच्या जिवावर मुख्यमंत्री झाले नाहीत, तर, ते ही आमच्यासारखे चाळीस शिलेदार पाय रोवून त्यांच्यामागे उभे राहिल्याने ते आज या पदावर आहेत, असे दुसरे स्फोटक विधान गोगावलेंनी केले.
"शिवसेनेचे आम्ही चाळीस शिलेदार (आमदार) व इतर आणखी चार शिलेदारांमुळे एकनाथ शिंदे यांच्या सारखा चांगला माणूस मुख्यमंत्री झाला", असे म्हणत गोगावले यांनी शिंदे मुख्यमंत्री होण्यामागील श्रेय आपल्यासह शिवसेनेत बंड केलेल्या चाळीस आमदार व चार अपक्ष आमदारांकडे घेतले.
अलिबागमधील खानावचे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळींनी बुधवारी आमदार गोगावले आणि आमदार महेंद्र दळवींच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. या सोहळ्यात जाहीर भाषणात आमदार गोगावलेंनी मंत्रीपद न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त केली. ते का मिळाले नाही, हे सुद्धा सांगितले.
"एका आमदाराने पत्नी आत्महत्या करेल सांगितलं, दुसऱ्याने राजीनाम्याची धमकी दिली तर तिसऱ्याने नारायण राणे संपवतील, असं म्हणत तीन आमदारांनी मुख्यमंत्र्यांना मंत्रीपदासाठी गळ घातली, म्हणून पेचात पडलेल्या मुख्यमंत्र्यांना या आमदारांना मंत्रीपद द्यावे, असे सांगून आपण मंत्रीपदापासून दूर राहिलो", असेही गोगावले म्हणाले.
Edited By- Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.