सावंतवाडी : सिंधुदुर्गच्या विकासासाठी नारायण राणेंसोबत काम करायला मला आवडेल. कदाचित त्यामुळे माझे मंत्रीपद गेले तर जाऊ देत, त्याचे दुःख नाही. सिंधुदुर्गला काही मिळत असेल तर विनायक राऊत यांच्या पोटात का दुखते. राणे साहेबांशी माझा व्यक्तीगत कोणताही वाद नाही. मात्र, त्यांनी आपल्या वागण्याची पध्दत बदलून मातोश्रीवर टीका करणे बंद करतील, त्यादिवशी त्यांचा माझा वाद संपला, असे स्पष्ट मत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
शिंदे गटात सहभागी झालेले शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर तब्बल महिन्याभराने आपल्या सावंतवाडी मतदारसंघात दाखल झाले. सावंतवाडी येताच थेट अतिवृष्टीच्या आढावा बैठकीला पोचले. बैठक संपल्यानंतर दीपक केसरकर हे आपल्या निवासस्थानी पोचले तेथे केसरकर त्यांचे मोजक्याच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.
'कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला,' 'शिवसेना जिंदाबाद,' अशा घोषणा देत आमदार दीपक केसरकर यांचे सावंतवाडीत स्वागत करण्यात आले. या स्वागत सोहळ्याला दीपक केसरकर यांच्या कार्यकर्त्यांची कमी जाणवली. मात्र, आपण आपल्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला माझ्या स्वागतासाठी येऊ नका, असे आपण सांगितले असल्याचे दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले.
त्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंशी जुळवून घेण्याचे संकेत दिले. विनायक राऊतांवर टीका करताना श्री. केसरकर म्हणाले, विनायक राऊत हे मुख्यमंत्र्यांच्या रोलमधे गेल्यासारखे वागत होते. उद्धव साहेबांनी कधी आलेली सत्ता उपभोगली नाही, मात्र राऊत यांच्यासारख्यांनी सत्ता उपभोगली. विनायक राऊत हे आमच्यामुळे खासदार झाले आहेत. त्यांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा जनतेसाठी वेळ द्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
केसरकर म्हणाले, आपल्या आप्तस्वकीयांना आमदार म्हणून बघण्याची त्यांची सुप्त इच्छा असेल म्हणुन राऊत माझ्यावर टीका करतात. मुख्यमंत्र्यांच्या रोलमध्ये गेल्यासारखे वागत होते. त्यांना दुःख असेल की, वर्षावर आपल्याला कोणी राहिलेले नाही. मुळात त्यांनी टीका करण्यापासून अलिप्त राहिले पाहिजे होते. आज शिवसेनेचा जो काही डाऊनफॉल झाला त्याला त्यांच्यासारखी लोक कारणीभूत होती.
ते आमदारांना सांगत होते, तुमची कामे आमच्याकडे द्या आम्ही ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो. त्यांच्या या बुध्दीलाच लोक कंटाळली होती. त्यामुळेच आमदारांनी बंड केलं. त्यामध्ये तुम्ही सुध्दा एक होता, हे नाईलाजाने सांगावे लागत आहे, असेही केसरकर म्हणाले. नारायण राणे यांचे लवकरचं केंद्रातील मंत्रिपद जाईल असे विनायक राऊत यांनी सुतोवाचा केले होते. यावर केसरकर म्हणाले, मी सिंधुदूर्गातील नागरीक आहे, येथील कोणाचेही मंत्रीपद जाऊ नये असे मला मनापासून वाटते.
राणे साहेबांशी माझा कोणताही व्यक्तीगत वाद नाही. त्यांनी आपल्या वागण्याची पध्दत बदलली पाहिजे. कारण आजही ते मातोश्रीवर टीका करतात. ज्यावेळी ते मातोश्रीवर टीका करणे बंद करतील, त्यादिवशी त्यांचा माझा वाद संपला. मी पालकमंत्री होतो त्यावेळी सांगत होतो, विकासासाठी राणे साहेबांसोबत काम करायला मला आवडेल. कदाचित त्यामुळे माझे मंत्रीपद गेले तर जाऊ देत, त्याचे दुख नाही.
सिंधुदर्गला काही मिळत असेल तर विनायक राऊत यांच्या पोटात का दुखते. श्री. राणे यांच्याजवळ किती खाती आहेत, हे सुध्दा त्यांना माहिती नसेल. केवळ रोजगार निर्मितीसाठी त्यांच्याजवळील खात्याचे बजेट दोन लाख कोटींचे असते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणेंमुळे अनेक रोजगार येत असतील तर विनायक राऊत यांच्या पोटात शूळ का उठत आहे, असा सवाल केसरकर यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.