

गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रथमच भाजपला नगराध्यक्षपद मिळाले आहे.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अखेरच्या क्षणी भाजपचाच नगराध्यक्ष असेल, अशी घोषणा केली होती.
शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर सौ. निता मालप यांनी निर्विवाद बहुमत मिळवत नगराध्यक्षपद जिंकले.
Ratnagiri News : गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजपलाच नगराध्यक्षपद मिळाले पाहिजे असा पराकोटीचा आग्रह भाजप कार्यकर्त्यांनी धरला होता. मात्र उमेदवारी अर्ज भरुन झाले तरी प्रदेश भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी हिरवा कंदिल मिळत नव्हता. अखेरच्या क्षणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गुहागरचा नगराध्यक्ष भाजपचाच असेल असे मुंबईच्या बैठकीत जाहीर केले. त्यामुळे भाजपमध्ये उत्साह संचारला. आता युतीचा निर्णय पालकमंत्र्यांनी जाहीर करणे अपेक्षित होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सकाळी शिवसेना नेते शशिकांत शिंदे युतीचा फतवा घेऊन आले अन् जागा वाटप निश्चित झाले. त्यानंतरच शिवसेना व भाजपचे मनोमिलन झाल्यावर सर्व कार्यकर्ते झपाटून कामाला लागले. त्याचा परिणाम म्हणून आज प्रथमच भाजपच्या उमेदवार सौ. निता मालप यांनी निर्विवाद बहुमत मिळवत नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे.
नगराध्यक्षपदाला हिरवा कंदील मिळत नसल्याने येथील भाजप कार्यकर्ते निराश झाले होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी देखील गुहागरची जागा भाजपलाच मिळणार याची ग्वाही भाजपचे नेते देत होते. मात्र जागावाटपात ही जागा शिवसेनेला दिली गेली. त्यामुळे भाजपमध्ये नाराजी होती. आता पुन्हा प्रदेश भाजपकडून असे झाले तर वेगळा विचार करावा लागेल अशी तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांची मानसिकता झाली होती. पण शेवटी भाजपच्या पारड्यात पद पडले आणि गुहागरचा नगराध्यक्ष भाजपचा झाला.
या घडामोडीसोबतच गुहागर नगरपंचायतीची निवडणूक लक्षवेधी ठरली. निकालात महायुतीने बाजी मारली. या निकालात काही वैशिष्ट्यपूर्ण निकालही लागले. यामध्ये पिता-पुत्र दोन्ही वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक रिंगणात होते. हे दोघेही निवडून आले. गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार राजेंद्र भागडे हे प्रभाग क्र. 13 मधून विजयी झाले, तर त्यांचा मुलगा सौरभ भागडे हे राष्ट्रवादीचे उमेदवार प्रभाग 14 मधून विजयी झाले. दोन पक्षातून उभे असलेले बाप बेटे विजयी झाले आहेत.
प्रभाग 13 मध्ये शिवसेना भाजप युतीकडून राजेंद्र भागडे हे उमेदवार होते. त्यांना 177 मते मिळाली. या ठिकाणी त्यांच्या विरोधात केवळ शिवसेना उबाठाचे सुजल होळंब हे एकमेव उमेदवार होते. दुरंगी लढतीत सुजल होळंब (19 मते) यांचा 158 मतांनी पराभव केला. प्रभाग 14 मध्ये (प्रभाग 13 मधील) शिवसेनेचे विजयी उमेदवार राजेंद्र भागडे यांचे पुत्र सौरभ भागडे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. त्यांनी भाजप सेना युतीचे संजय मालप (112) यांचा पराभव केला.
प्रभाग 14 मध्ये उबाठाला केवळ एकच मत मिळाले. येथील पराभूत उमेदवार संगीता संजय वराडकर यांना केवळ एक मत मिळाले आहे. या प्रभागात शिवसेना उबाठाला उमेदवार मिळत नव्हता. त्यामुळे शिवसेना उबाठाने प्रभाग 17 मधील कार्यकर्ती सौ. संगीता वराडकर यांना प्रभाग 14 मधून उमेदवारी दिली. शिवसेना उबाठा पक्षाचे मशाल हे चिन्ह असल्यामुळे किमान त्या प्रभागातील पक्ष कार्यकर्ते संगीता वराडकर यांना मत देतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रभागाबाहेरील उमेदवाराला मतदारांनी नाकारले. शिवसेना उबाठा पक्षाला केवळ एक मत मिळाल्याने पक्ष कार्यकर्ते निराश झाले आहेत. प्रभाग 8 मध्ये 231 मतदारांनी मतदान केले होते. या 231 मतदारांनी नोटाला (वरीलपैकी एकही नाही) नाकारले आहे.
उमेदवारांचा निसटता पराभव
शिवसेना उबाठा पक्षाच्या तीन उमेदवारांना निसटता पराभव स्वीकारावा लागला आहे. यामध्ये प्रभाग क्र. 7 मधील सौ. प्रगती वराडकर 6 मतांनी पराभूत झाल्या. प्रभाग क्र. 8 मधील सौ. रिया गुहागरकर या 5 मतांनी पराभूत झाल्या. प्रभाग 16 मधील उमेदवार राज विखारे 4 मतांनी पराभूत झाले.
मनसेचा नगरसेवक विजयी
गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रथमच मनसेचा उमेदवार विजयी झाला आहे. मनसेच्या स्थापनेनंतर गुहागर तालुक्यातील 1 ग्रामपंचायतीमध्ये मनसेने निर्विवाद बहुमत मिळविले होते. काही ग्रामपंचायतींमध्ये मनसेचे उमेदवार निवडून आले होते. मात्र 2009 नंतर कधीही मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरली नव्हती. गुहागर शहरात मनसेचे कार्यकर्ते काम करत होते. मात्र त्यांनाही निवडणूक लढण्याची संधी मिळाली नव्हती.
नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यावर महाराष्ट्रातील मनसे शिवसेनेच्या युतीचा शुभारंभ आमदार भास्कर जाधव यांनी केला. नगरपंचायतीमध्ये 2 जागा मनसेला देऊ केल्या. दुर्दैवाने मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आपल्या दोन उमेदवारांना पक्षाचा एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे या दोन उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागली. तरीही प्रमोद गांधी यांच्या नेतृत्वात मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केला. त्याचे फलित त्यांना प्रभाग 4 मधून कोमल जांगळी यांच्या विजयाने मिळाले आहे.
1. गुहागर नगरपंचायतीत नगराध्यक्षपद कोणाला मिळाले?
भाजपच्या सौ. निता मालप यांना नगराध्यक्षपद मिळाले.
2. हा विजय भाजपसाठी महत्त्वाचा का आहे?
गुहागरमध्ये प्रथमच भाजपचा नगराध्यक्ष निवडून आल्याने हा ऐतिहासिक विजय आहे.
3. भाजपकडून अंतिम निर्णय कोणी जाहीर केला?
प्रदेश भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अंतिम निर्णय जाहीर केला.
4. युतीचा निर्णय कसा झाला?
शिवसेना नेते शशिकांत शिंदे यांनी युतीचा फतवा आणल्यानंतर जागावाटप निश्चित झाले.
5. या निकालाचा राजकीय अर्थ काय आहे?
कोकणात भाजप-शिवसेना युतीची ताकद वाढल्याचे हे स्पष्ट संकेत मानले जात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.