

Raigad Sudhakar Ghare Arrest News : खालापूर तालुक्यातील तरुणांच्या रोजगार प्रश्नावरून सत्तेत सहभागी असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने ३ सप्टेंबरला महाएल्गार आंदोलनाचे अस्त्र काढले होते. पण हे आंदोलन टाळण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई केली. जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेत अटक केली. यामुळे कर्जत-खालापूर तालुक्यातील वातावरण चांगलेच तापले असून, सरकारने दडपशाही केल्याचा आरोप आता होताना दिसत आहे.
दरम्यान, आंदोलनाची झळ सरकारला लागली असून, याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेली. यानंतर त्यांनी आंदोलकांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. तर या आश्वासनानंतर हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. पण येत्या दोन दिवसांत यावर तोडगा न निघाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
येथील टाटा स्टील आणि गोदरेजसारख्या मोठ्या उद्योगसमूहांत स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा, अशी रास्त मागणी स्थानिक तरुणांसह राजकीय पक्षांची आहे. पण या मागणीवर अद्याप येथील कंपन्यांनी विचारच केलेला नाही. यावरून महाएल्गार करत आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला. ज्याला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला.
भूमिपुत्रांना डावलून बाहेरील कामगारांना प्राधान्य देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. पण आंदोलनाच्या आधीच पोलिसांनी आंदोलनाचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांना खालापूर पोलिसांनी अटक केली. जिल्हा परिषद सदस्य संतोष बैलमारे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश पाटील, काँग्रेसचे सागर जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, शेतकरी कामगार पक्षाचे कैलास गायकवाड, रखी रोकडे यांच्यासह अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनादेखील ताब्यात घेत सर्व नेत्यांना पोलीस वाहनातून अलिबागला नेण्यात आले. तर रात्री उशिरा अटक केलेल्या कार्यकर्त्यांना सोडण्यात आले.
दोन तास रस्ता बंद
दरम्यान, या अटकेच्या कारवाईमुळे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते. ज्यामुळे खालापूरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. कर्जतच्या सभापती नमिता घारे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी तर दोन तास रस्ता रोखून धरला होता.
तटकरे तातडीने खालापुरात दाखल
या आंदोलनात नेत्यांना अटक झाल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे तातडीने खालापुरात दाखल झाले. यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करत मंगळवारी किंवा बुधवारी यासंदर्भात बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले. तसेच घारे यांच्यासह अटक आणि ताब्यात घेतलेल्या सर्व आंदोलकांना सोडण्यात आल्याची घोषणा केली.
हजारो तरुण तरुणी रस्त्यावर
स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा, या मागणीसाठी पुकारलेल्या महाएल्गार आंदोलनाला जवळपास ७ ते ८ हजार कार्यकर्ते व कामगार तरुण-तरुणी रस्त्यावर उतरले होते. यामुळे आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.