Mahayuti Politics : महायुतीचं ठरलं, पण उमेदवार कोण? रत्नागिरीत तगडी स्पर्धा, भाजप, शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत चढाओढ!

Ratnagiri Politics : तळकोकणात एकीकडे महायुतीत वाद विकोपाला गेल्याचे दिसत आहे. तर शेजारी जिल्ह्यात महायुतीवर शिक्कामोर्तब झाला आहे. यामुळे आता उमेदवारीसह इच्छुकांच्या नावावर महायुती अन् मविआत खलबते सुरू झाली आहेत.
Mahayuti Political Alliance CM devendra fadnavis DCM Ajit Pawar And Eknath Shinde
Mahayuti Political Alliance CM devendra fadnavis DCM Ajit Pawar And Eknath Shinde sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीवर अधिकृत शिक्कामोर्तब झाले असून आता उमेदवारीवरून दोन्ही बाजूंत खलबते सुरू आहेत.

  2. महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार मुंबईत ठरणार असल्याने इच्छुक नेत्यांनी मुंबई गाठली आहे.

  3. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्यानंतर उमेदवारीसंदर्भातील हालचालींना गती मिळाली आहे.

Ratnagiri News : तळकोकणात महायुतीत वाद विकोपाला गेला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात युतीचे काय होणार यावरच रत्नागिरीचे पुढचे राजकारण ठरेल असे स्पष्ट संकेत पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले होते. यामुळे येथे महायुतीत काय होणार असा संभ्रम निर्माण झाला होता. तर महाविकास आघाडीत तेथील जागावाटपावरून चर्चा झाली नव्हती. पण आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची बैठक रायगड येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी झाली असून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत,योगेश कदम यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील महायुतीवर शिक्कामोर्तब झाला आहे. यामुळे आता प्रत्यक्ष निवडणुकीला आता गती येणार आहे. पण यावेळी बैठकीला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नेता अथवा पदाधिकारी उपस्थित नसल्याने या बैठकीतून राष्ट्रवादीला डावलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

आगामी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात ‘महायुती’ करण्यावर शिक्कामोर्तब झाला असून आता महायुतीच्या नेत्यांनी एकत्रित येत निवडणुकीच्या तयारीला लागा आणि विजय खेचून आणा, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. तसेच मुंबईतील बैठकीतही महायुतीवर शिक्कामोर्तब करण्यात आला होता. मात्र नगराध्यक्षपदाचा तिढा कायम असून त्यावर येत्या तीन दिवसात वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाणार आहे. या पदासाठी अजूनही महायुतीचे तिन्ही पक्ष आग्रही असून त्यामुळे जागा वाटपाचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता आता वर्तवली जातेय.

यादरम्यान रत्नागिरीतील महायुती आणि महाविकास आघाडीचा उमेदवार मुंबईत ठरणार असल्याची माहिती समोर आली असून इच्छुकांच्या मुंबई वाऱ्या सुरू झाल्या आहेत. नेत्यांच्या भेटीसाठी इच्छुकांनी मुंबईत तळ ठोकला असून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या जिल्हादौऱ्यानंतर या प्रक्रियेला अधिकच वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने निवडणूक लढण्याचा दोन्ही बाजूंनी निर्णय झाला आहे; मात्र, प्रत्येकाचे उमेदवार कोण असणार यावरच मोठी खलबते सुरू आहेत.

Mahayuti Political Alliance CM devendra fadnavis DCM Ajit Pawar And Eknath Shinde
Mahayuti politics : 'युतीच्या काळात आमदारांना फुटकी कवडीही मिळाली नाही; एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत हे दुर्दैव'; शिंदेंच्या आमदाराचा घरचा आहेर

नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय वारे जोरात वाहू लागले आहेत. महायुतीच्या माध्यमातून घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीनही पक्षांनी आपले उमेदवार तयार केले होते. राष्ट्रवादीकडून मिलिंद कापडी, शिवसेनेकडून उमेश सकपाळ, सुधीर शिंदे यांचे नाव पुढे आले होते. तर भाजपकडून सहा नावे पुढे येत होती. यामध्ये मंगेश तांबे व विजय चितळे यांचे नाव चर्चिले जात आहे. मात्र, आता महायुतीचा निर्णय झाल्यानंतर तीनही पक्षांच्या इच्छुकांमधून उमेदवारीची लॉटरी कोणाला लागते, हे महत्त्वाचे असणार आहे.

महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून त्यांचा उमेदवार जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने रमेश कदम यांच्या नावाला पसंती दिली आहे; मात्र, कदम यांनी नुकताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली होती. यामुळे ते नगराध्यक्षपदाची उमेदवारीसाठी भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. तर ते नगराध्यक्षपदाची उमेदवारी कशी कुठून मिळवतात याबाबत शहरात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

काँग्रेसकडून लियाकत शाह यांनी नगराध्यक्षपदासाठी इच्छा व्यक्त केली आहे तर, ठाकरे शिवसेनेकडून बाळा कदम यांचे नाव पुढे येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण हे अद्याप गुलदस्त्यात आहे. महायुतीच्या उमेदवाराच्या निश्चितीनंतरच महाविकास आघाडीचा उमेदवाराबाबत आपले पान काढणार आहे. तर याबाबत सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत हे चिपळुणात चाचपणी करताना दिसत आहेत.

भाजप -शिंदेसेनेने ताकद लावली पणाला

दरम्यान, भाजपनेही नगराध्यक्षपदावर आपला दावा ठोकला आहे. त्यामुळे चिपळूण नगराध्यक्षपदासाठी भाजप तसेच शिंदेसेना यांनी आपली ताकद पणाला लावली आहे. विद्यमान उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांना चिपळूणमध्ये नगराध्यक्षपदाचा उमेदवार आपल्याच पक्षाचा हवा यासाठी ते देखील प्रयत्न करत आहेत. त्यामुळे महायुतीत एकमत झाल्यास उमेदवार कोण? हे प्रश्नचिन्ह आहे. इच्छुकांमधून महायुती उमेदवार देणार की, नव्याने आयात होणार याबाबत शहरात मात्र चर्चा रंगू लागल्या आहेत.

राष्ट्रवादीला निमंत्रण नव्हते

जिल्ह्यात महायुतीत स्वबळाच्या नाऱ्यावरून आधी वाद सुरू झाला होता. त्यावरून खुमखुमी काढण्यापर्यंत पालकमंत्री उदय सामंत यांनी शब्द वापरले होते. तर त्यानंतर आमदार शेखर निकम यांनी दोन पावले मागे घेत आपण देखील महायुती संदर्भात आग्रही असल्याचेही ते म्हणाले होते. पण मुंबईसह रायगडवर झालेल्या महायुतीच्या बैठकीला राष्ट्रवादीला निमंत्रणच देण्यात आले नाही. यावरून नवा वाद सुरू झाला आहे. महायुतीतच राष्ट्रवादीला डावलेले जातयं अशी कुजबुज आता सुरू झाली आहे. यावरून महायुती संदर्भातला निर्णय आधीच झाला असून त्या निर्णयाशी राष्ट्रवादी सहमत आहे. मात्र मुंबईतील बैठकी विषयी राष्ट्रवादीला निमंत्रण नव्हते. त्यामुळे कोणी पदाधिकारी तेथे उपस्थित राहिले नाहीत, असे स्पष्टीकरण आता आमदार निकम यांनी दिलं आहे.

Mahayuti Political Alliance CM devendra fadnavis DCM Ajit Pawar And Eknath Shinde
Mahayuti Politics: विधानसभेला किंग मेकर ठरवलेला भाजप नेता जिल्हा परिषदेला मात्र आमदार दिलीप बनकर थेट भिडणार?

FAQs :

1. रत्नागिरीत महायुतीवर शिक्कामोर्तब झालं का?
होय, रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीवर अधिकृत शिक्कामोर्तब झालं आहे.

2. उमेदवार ठरवण्यासाठी बैठक कोठे होणार आहे?
महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ठरवण्यासाठी बैठक मुंबईत होणार आहे.

3. इच्छुक नेते कोण आहेत?
रत्नागिरीतील भाजप, शिंदे सेना आणि ठाकरे गटातील अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

4. रवींद्र चव्हाण यांचा दौरा का महत्त्वाचा मानला जातो?
त्यांच्या जिल्हा दौऱ्यानंतर उमेदवारी आणि आघाडीबाबतच्या चर्चांना गती मिळाल्याचं दिसून आलं आहे.

5. या प्रक्रियेचा पुढचा टप्पा काय असेल?
मुंबईतील बैठकीनंतर अधिकृत उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com