

Raigad News : कर्जत तालुक्यातील टोरंटो वीज प्रकल्पावरून रायगडच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेतील संघर्ष आता अधिक तीव्र झाला असून राष्ट्रवादीच्या भूमिकेवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी प्रकल्पाविरोधात घेतलेल्या भूमिकेवरून कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यासह घारेंना लक्ष्य केले आहे. राज्य सरकारच्या प्रकल्पाला विरोध करायचा असेल, तर आधी सत्तेतून बाहेर पडा, असे जाहीर आव्हान थोरवे यांनी दिले आहे.
कर्जत येथील टोरंट पॉवर प्रकल्पाला पर्यावरणप्रेमींसह काँग्रेस, शेकाप, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीने विरोध दर्शवला आहे. प्रकल्पस्थळी झालेल्या वृक्षतोडीची पाहणी करत विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला होता. यामुळे महायुती सरकारच्या अडचणी वाढल्या असतानाच शिंदेंच्या शिवसेनेसह राष्ट्रवादीनेही प्रकल्पाच्या सध्याच्या स्वरूपाला विरोध केल्याने सत्ताधारी आघाडीतील मतभेद उघड झाले आहेत.
सुनील तटकरे यांनी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे. विकासकामांना पाठिंबा असला तरी निसर्गाचा ऱ्हास करून आणि स्थानिकांवर अन्याय करून विकास नको, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. याच मुद्द्यावरून थोरवे यांनी राष्ट्रवादीला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
खालापूरमधील कारखान्यावरून तटकरे लक्ष्य
थोरवे यांनी खालापूर तालुक्यातील उजळोली येथे उभारल्या जात असल्याचा आरोप असलेल्या दारू कारखान्याचा मुद्दा उपस्थित केला. अनिकेत तटकरे आणि सुनील तटकरे यांचे साडू यांच्या भागीदारीत हा कारखाना उभारला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. चिलठण ग्रामपंचायतीचा विरोध असतानाही कथित बोगस ना-हरकत प्रमाणपत्रांच्या आधारे प्रकल्पाचे काम सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.
"लोकांची काळजी असेल, तर खालापूरमधील दारूची फॅक्टरी आधी बंद करा. त्या ठिकाणी काम सुरू असताना सुधाकर घारे विरोधासाठी पुढे येत नाहीत. मात्र, कर्जतमध्ये पर्यावरणपूरक प्रकल्प येत असताना त्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करतात," असा टोला थोरवे यांनी लगावला.
सत्तेत राहून विरोध कशासाठी?
सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असून त्यांची कन्या राज्य सरकारमध्ये मंत्री आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या प्रकल्पाला विरोध करण्याच्या भूमिकेवर थोरवे यांनी प्रश्न उपस्थित केला. "टोरंटो प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मंजुरी दिली आहे. जर राज्य सरकारच्या प्रकल्पाला विरोध करायचा असेल, तर आधी सत्तेतून बाहेर पडा आणि मग विरोध करायला समोर या. आम्ही यावर बोलायला तयार आहोत," असे थोरवे म्हणाले.
कर्जतच्या जनतेने विरोधकांना नाकारल्याचा दावाही त्यांनी केला. "तुमचा पराभव झाला आहे. प्रत्येक ठिकाणी प्रकल्पांना विरोध करण्याचे काम सुरू आहे आणि सुनील तटकरे त्यांना पाठीशी घालत आहेत," अशी टीका थोरवे यांनी केली. टोरंटो प्रकल्पावरून सुरू असलेला हा वाद आता महायुतीतील राजकीय संघर्षाचे रूप घेत असून रायगडच्या राजकारणात पुढे काय घडते, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.