local body election : तळकोकणातील नगरपंचायत, नगरपरिषदा अन् नगरपालिकाचं चित्र क्लिअर : नगराध्यक्ष कोणाला राखीव?

Municipalities Reservation Women : तळकोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपंचायत, नगरपरिषदा आणि नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण आज जाहीर झाले आहे.
local body election
local body electionsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. मालवण आणि सावंतवाडी नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव ठरल्याने स्थानिक पुरुष कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.

  2. या आरक्षणामुळे पुरुष उमेदवारांची निवडणूक लढवण्याची संधी संपली, तर महिला नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

  3. कोकणातील राजकीय समीकरणात मोठा बदल घडवून आणणारा हा निर्णय ठरत असल्याची चर्चा सुरू आहे.

Sindhudurg News : गेल्या तीन एक वर्षापासून रखडलेल्या नगरपंचायत, नगरपरिषदा आणि नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण आज जाहीर झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले, कुडाळसह पाच नगराध्यक्ष पदे खुली झाली आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यात जिल्ह्यात सात ठिकाणी महिला ‘कारभारी’ होणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांतील अनेक इच्छुक पुरूष उमेदवारांचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत, तर काहीजण पत्नीसाठी मोर्चेबांधणीला लगेच लागले आहेत.

काही दिवसापूर्वी तळकोकणातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांसह राज्यभरतील जिल्हा परिषदेच्या सभापतीपदांच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली होती. त्यापाठोपाठ आता निवडणूक आयोगाने आज मुंबई येथे राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायत यांच्या अध्यक्ष पदाची सोडत जाहीर केली. त्यात तळकोकणातील जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि पाच नगरपंचायत अशा आठ स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश आहे.

सिंधुदुर्गात रेकॉर्ड ब्रेक प्रशासकीय राजवट

रेकॉर्ड ब्रेक प्रशासकीय राजवट राहिलेल्या जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी नगरपालिका आणि कणकवली, वाभवे-वैभववाडी, कुडाळ, देवगड नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाच्या सोडती आज झाल्या. वेंगुर्ले, वाभवे-वैभववाडी, कुडाळ, देवगड, दोडामार्ग सर्वसाधारणासाठी खुले झाले आहे. सावंतवाडी सर्वसाधारण महिला आणि मालवण नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आणि कणकवली नागरिकांचा मागास प्रवर्ग अशाप्रकारे आरक्षित झाला आहे. आज जाहीर झालेल्या आरक्षणानुसार मालवण आणि सावंतवाडी नगरपरिषदेवर महिलाराज राहणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष पदानंतर नगरपरिषदा व नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या सोडती जाहीर झाल्याने सिंधुदुर्गात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.

local body election
Local Body Election Reservation : मोठी बातमी! नगराध्यक्ष आरक्षण जाहीर; बीड, शिर्डी, अकलूजसह 17 नगरपालिकांवर 'महिला राज', 'एससी'साठी राखीव!

मालवण, वेंगुर्ले आणि सावंतवाडी या तीन नगरपरिषदांच्या मुदती डिसेंबर 2021 मध्ये संपल्या होत्या; परंतु त्यावेळी कोरोनासारखी राष्ट्रीय आपत्ती सुरू असल्याने शासनाने निवडणुका न घेता या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक नियुक्त केले. त्यानंतर वर्षभराने कणकवली नगरपंचायतची मुदत संपली होती. तेथेही शासनाने प्रशासकीय राजवट लागू केली. सुरुवातीला सहा महिन्यांसाठी लागू केलेले प्रशासक अद्यापही कार्यरत आहे. मालवण, वेंगुर्ले आणि सावंतवाडी नगरपरिषदेवर प्रशासक लागू झालेल्याला डिसेंबर 2025 मध्ये चार वर्षे पूर्ण होणार आहेत. कणकवलीत अद्यापही प्रशासक लागू आहे. त्यामुळे प्रदीर्घ काळ रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली होती.

कही खुशी, कही गम

आता होणाऱ्या नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे. जुन्या पद्धतीनुसार निवडून येणाऱ्या नगरसेवकांतून नगराध्यक्ष निवडला जाणार नाही. तसेच निवडून येणाऱ्या नगराध्यक्षांचा कालावधी पाच वर्षाचा राहणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण काय पडते? याकडे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले होते. परंतु, आज झालेल्या आरक्षण सोडतीमुळे अनेकांचे नगराध्यक्ष होण्याचे 'स्वप्न'च राहणार असल्याचे स्पष्ट झाले. अनेक इच्छुक व मातब्बर कार्यकर्त्याचे मनसुबे नगराध्यक्ष पद आरक्षित झाल्याने धुळीस मिळाले आहे. विशेषतः मालवण आणि सावंतवाडी नगराध्यक्ष पद महिलांसाठी आरक्षित झाल्याने नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या पुरुष कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.

रत्नागिरीत सात ठिकाणी महिला ‘कारभारी’

जिल्ह्यातील 4 नगरपालिका आणि 5 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण आज जाहीर झाले. त्यामध्ये 9 पैकी 7 ठिकाणी सर्वसाधारण महिला आरक्षण आहे तर चिपळूण नगरपालिका आणि दापोली नगरपंचायतीत सर्वसाधारण प्रवर्गाला संधी मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात सात ठिकाणी महिलाराज येणार आहे. आरक्षणामुळे सर्वच पक्षांतील अनेक इच्छुक उमेदवारांचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत, तर काहीजण पत्नीसाठी मोर्चेबांधणीला लगेचच सुरुवात करणार आहेत.

रत्नागिरीचे नगराध्यक्षपद खुला प्रवर्ग महिलासाठी आरक्षित असल्यामुळे अनेक प्रतिष्ठित इच्छुक लोकप्रतिनिधींचा हिरमोड झाला आहे. दोन वर्षांपासून सर्वसाधारण पदासाठी आरक्षण राहिल्यास उमेदवारी मिळावी यासाठी तयारी ठेवली होती. आता महिला आरक्षणामुळे सर्वंच पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांना शहरांचा कारभार हाकण्याची संधी मिळणार आहे. चिपळूण आणि दापोली पालिका याला अपवाद ठरणार आहे. चिपळूणचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहे.

मागील वेळी या ठिकाणी महिला नगराध्यक्ष होत्या. या निवडणुकीत दिग्गज पुरुष इच्छुकांना संधी मिळणार आहे. ही एकप्रकारे सर्वच पक्षांसाठी डोकेदुखीच ठरणार आहे. दापोली नगरपंचायतीचा पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण झालेला नाही. त्यामुळे तेथील निवडणुकीसाठी अजून कालावधी आहे. खेड, राजापूरमध्ये सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आरक्षण आहे. त्यामुळे तिथेही अनेक दिग्गजांचा हिरमोड झाला आहे. जिल्ह्यातील 5 पंचायत समितीत हीच परिस्थिती आहे. मंडणगड, गुहागर, देवरूख, लांजा या चार नगरपंचायतीमध्येही खुला प्रवर्ग महिलांसाठी राखीव पडला आहे. जिल्ह्यात 7 ठिकाणी महिला नगराध्यक्ष विराजमान होणार असून, शहरांचा कारभार हाकण्याची संधी महिलांना मिळाली आहे.

ही नावे चर्चेत

दरम्यान रत्नागिरीतून नगराध्यक्ष पदासाठी महायुतीकडून शिल्पा सुर्वे, शितल पावसकर, उज्वला शेट्ये, शिल्पा पटवर्धन, वर्षा ढेकणे आणि यापूर्वी प्रभावी नगराध्यक्ष राहिलेले मिलींद किर यांच्या सौभाग्यवती हिमानी मिलींद किर, दिलंशाद दिलावर गोदड यांचे नाव महाविकास आघाडीकडून चर्चेत राहण्याची शक्यता आहे. तर चिपळूण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीतर्फे रमेश कदम आणि महायुतीतर्फे उमेश सकपाळ हे चर्चेत आहेत. आता आरक्षण जाहीर झाल्याने रत्नागिरी व चिपळूणमध्ये निवडणूकीची धुळवड सुरु होणार आहे.

महिला आरक्षण पडल्यामुळे आमच्या पक्षात अनेक ज्येष्ठ आणि नवीन महिला यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत पक्ष निर्णय घेईल.
- प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी, शिवसेना तालुकाप्रमुख, रत्नागिरी
नगराध्यक्षपद हे महिलांसाठी आरक्षण पडले आहे. भाजपला नगराध्यक्षपद मिळावे यासाठी आम्ही पक्षाकडे मागणी करणार आहोत. यासाठी भाजपमधील अनेक महिला इच्छुक आहेत.
- राजेश सावंत, जिल्हाध्यक्ष, भाजप
local body election
Local Body Elections : शरद पवारांच्या पक्षातून मोठं ‘इन्कमिंग’? भाजपमध्ये पेटला अंतर्गत वाद, कारवाईच्या भीतीने कार्यकर्ते मौनात...

FAQs :

प्रश्न 1: मालवण आणि सावंतवाडी नगराध्यक्षपद कोणासाठी राखीव झाले आहे?
👉 दोन्ही नगराध्यक्षपदे महिलांसाठी राखीव ठरली आहेत.

प्रश्न 2: पुरुष कार्यकर्ते नाराज का आहेत?
👉 कारण त्यांनी निवडणुकीची तयारी केली होती, पण आरक्षणामुळे आता त्यांना उमेदवारी मिळणार नाही.

प्रश्न 3: या आरक्षण सोडतीचा उद्देश काय आहे?
👉 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढवणे हा उद्देश आहे.

प्रश्न 4: या निर्णयाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
👉 स्थानिक स्तरावर महिला नेतृत्व वाढेल, तर काही पक्षांमध्ये अंतर्गत नाराजी निर्माण होऊ शकते.

प्रश्न 5: पुढील पाऊल काय असेल?
👉 पक्ष आता योग्य महिला उमेदवार शोधण्याच्या हालचाली सुरु करतील आणि प्रचाराची रणनीती बदलतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com