
Sangli News : 24 मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी सात लाख रुपये लाचेची मागणी करणाऱ्या उपायुक्त वैभव साबळे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून साबळे यांच्यावर सोमवारी (ता.09) कारवाई केली होती. ज्यानंतर सांगलीसह साताऱ्यातील त्यांच्या घरांवर छापा टाकण्यात आला होता. या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा झाली होती. तर आता याचे पडसाद एक जिल्हा सोडून असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमटले आहेत.
उपायुक्त साबळे याच्यावर झालेल्या कारवाईने सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग शहरात खळबळ उडाली आहे. तर वेंगुर्ल्यासह इस्लामपूर शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. साबळे यांच्यावर झालेल्या अटकेच्या कारवाईमुळे दोडामार्ग शहरात एकच खळबळ उडाली. याचे कारण असे की साबळे यांनी कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचे पहिले मुख्याधिकारी म्हणून कारभार पाहिला होता. तर येथेच त्यांच्या शासकीय सेवेलाही सुरूवात झाली होती.
2015 साली कसई-दोडामार्ग नगरपंचायतीची स्थापना झाली होती. यावेळी पहिले मुख्याधिकारी म्हणून साबळे येथे रूजू झाले होते. तर त्यांचा कार्यकाळ 14 ऑक्टोंबर 2018 मध्ये संपला होता. या कालावधीत त्यांनी शहरात आपला संपर्क दांडगा वाढवला होता. यादरम्यान आता त्यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे येथे खळबळ उडाली आहे.
उपायुक्त वैभव साबळे यांना लाचेच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर वेंगुर्ले शहरातही काही नागरिक, व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी फटाके वाजवून व पेढे वाटल्याचे समोर आले आहे. नागरिक, व्यापारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या कारवाईचे स्वागत करत आनंदोत्सव साजरा केला. वैभव साबळे यांनी वेंगुर्ले शहरात मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले होते. त्यावेळी त्यांनी कोरोना काळात शहरातील नागरिक, व्यापारी यांना प्रचंड त्रास दिला होता. त्यांच्यावर झालेली कारवाई हा नियतीने दिलेला धडा असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान वैभव साबळे हे वेंगुर्ल्याचे मुख्याधिकारी असताना त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
उपायुक्त वैभव साबळे हे इस्लामपूर येथील नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून काम केले होते. त्यानंतर त्याची सांगली पालिकेत उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. सोमवारी त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर पालिकेच्या कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. यापूर्वी पालिकेच्या मानधनावरील कर्मचारी लाच घेताना सापडल्यानंतर फटाके फोडले होते. त्यानंतर साबळे याच्यावर कारवाई झाल्यानंतरही फटाके फोडण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.