

Raigad Politics : रायगड जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य केले जात आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघावरूनही एकनाथ शिंदे शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या टीकेला खासदार सुनील तटकरे यांनी एका वाक्यात प्रत्युत्तर दिले आहे.
'वाकडाई देवीने त्यांना क्षमा करावी, पांडुरंगाने त्यांना क्षमा करावी,' असा टोला लगावत श्रीवर्धन हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला काल, आज आणि उद्याही अभेद्य राहील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रायगडमधील राजकीय संघर्षावर बोलताना सुनील तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले, "वारंवार होत असलेल्या टीकेची मीच जास्त दखल घेत नाही, तर वरिष्ठ कशाला घेतील? वाकडाई देवीने त्यांना क्षमा करावी. पांडुरंगाने त्यांना क्षमा करावी." मतदार माझ्यासोबत आहेत. त्यांची परिपक्वता मला माहिती आहे. त्यांनी नेहमीच माझ्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे मी या टीकेकडे दुर्लक्ष करत राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध नसून तटकरे कुटुंबीयांना विरोध असल्याची भूमिका एकनाथ शिंदे शिवसेनेकडून (Shivsena) मांडली जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना तटकरे यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख केला. "1985 पासून मी रायगडमध्ये कष्टाने आणि समर्पित भावनेने काम करत आलो आहे. रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले आहे आणि पुढेही करत राहणार आहे. त्यामुळे कोणी काही बोलत असेल, तर त्याकडे मी दुर्लक्ष करत राहणार," असे त्यांनी सांगितले.
शिवसेनेच्या सभेत रायगडचा खासदार आणि श्रीवर्धनचा आमदार पुढच्या वेळी आमचाच असेल, असा दावा करण्यात आला होता. यावर तटकरे यांनी कोणतीही आक्रमक प्रतिक्रिया देण्याचे टाळले. "यावर माझी प्रतिक्रिया शून्य आहे. मी माझे काम करत राहणार आहे. माझे काम बोलते. जनता ठरवेल. मतदारांना कोणी गृहीत धरू नये आणि तसे धाडसही करू नये. सर्वसामान्य मतदार सुज्ञ आहेत," असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.
महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या पक्षप्रवेशांवरूनही तटकरेंनी विरोधकांना सूचक टोला लगावला. "आमच्यातील एक पक्षप्रवेश झाला म्हणजे सगळे काही झाले का?" असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. मला कितीही उचकवण्याचा प्रयत्न केला, तरी मी शांतच राहणार आणि शांतपणे काम करूनच उत्तर देणार, अशी भूमिका त्यांनी मांडली.
राजकीय गौप्यस्फोटांच्या चर्चांवरही तटकरे यांनी भाष्य केले. "कोणत्याही गौप्यस्फोटाने मी विचलित होत नाही. अविचलित राहून काम करणे ही माझी धारणा आहे. राज्यात आणि देशात मी काम करत आहे, हे सर्वांना दिसत आहे. माझ्या राजकीय जीवनात अनेक प्रसंग आले; मात्र मी थांबलो नाही आणि थांबणारही नाही. त्यामुळे कोणाच्या गौप्यस्फोटाला किती महत्त्व द्यायचे, हे ठरवले पाहिजे," असे ते म्हणाले.
एकीकडे एकनाथ शिंदे शिवसेनेकडून रायगड आणि श्रीवर्धनवर दावा केला जात असताना, दुसरीकडे सुनील तटकरे यांनी मतदारांवरील विश्वास व्यक्त करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आगामी काळात रायगडमधील एकनाथ शिंदे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस हा राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.