गुहागर (जि. रत्नागिरी) : शेठ येऊ दे नाहीतर भाई येऊदेत. आगामी २०२४ च्या निवडणुकीत गुहागरचा (Guhagar) आमदार (MLA) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच (MNS) होणार आहे, विश्वास मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. मनसेने निवडणुकीचे रणशिंग फुंकत या मतदारसंघाचे माजी आमदार रामदास (भाई) कदम (Ramdas Kadam) आणि विद्यमान आमदार भास्कर जाधव (शेठ) (Bhaskar Jadhav) यांना खुले आव्हान दिले आहे. (Next MLA from Guhagar is from MNS : Ratnagiri District President Jitendra Chavan)
गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पाटपन्हाळे ग्रामपंचायतच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यापूर्वी शृंगारतळी बाजारपेठेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी शृंगारतळी बाजारपेठेतून रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले.
चव्हाण म्हणाले की, ‘गुहागर तालुक्यात मनसे पक्ष वाढण्यास काहीच अडचण नाही. येथील तालुकाध्यक्ष व तालुका संपर्क अध्यक्ष जोमाने मनसे पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. येथील लोकप्रतिनिधी तालुक्यातील विविध प्रश्न, समस्यांवर विधिमंडळात बोलत नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यातील विकासाचे वाटोळे करण्याचे काम फक्त शिवसेनेने केले. आगामी प्रत्येक निवडणुकीमध्ये पक्षांतर्गत राजकारण बाजूला ठेवून पक्षहितासाठी काम करा. रत्नागिरी आजही मागास राहिला आहे. नागरी सुविधा देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. आज जनतेच्या प्रश्नावर मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरले पाहिजे, जनतेला न्याय देण्याचे काम केले पाहिजे.’
काहीजण चुकीच्या गोष्टी पसरवून त्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न करत आहेत; परंतु, पुढील काळात हा प्रकार चालू देणार नाही. मनसे सैनिकांनी प्रत्येक घराघरात जाऊन नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहनही चव्हाण यांनी यावेळी केले.
गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी गणेशोत्सवामध्ये तालुक्यातील प्रत्येक गावात मनसे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्याला कार्यकर्त्यांनीही प्रचंड प्रतिसाद दिला. ग्रामीण भागातही मनसे सैनिक असल्याचे पाहून आनंद झाला. गावागावांत जल्लोषाने होणारे स्वागत पाहून एक दिवस नक्की गुहागरवर मनसेचा झेंडा फडकेल यात शंका नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मेळाव्यासाठी मनसे जिल्हा सचिव संतोष नलावडे, गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, तालुकाध्यक्ष विनोद जानवलकर, बोरगावचे सरपंच सुनीलहळदणकर, गुरू पाटील, प्रशांत सावर्डेकर, उदय घाग, रमेश गांधी, अभिनव भुरण, डॉ. प्रदीप आठवले, समीर जोयशी, राहुल जाधव, तेजस पोफळे आदी उपस्थित होते. या वेळी गुहागर तालुका मनसेच्यावतीने जितेंद्र चव्हाण, संतोष नलावडे, प्रमोद गांधी यांचा सत्कार करण्यात आला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.