मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात भारतीय जनता पक्षाकडून (BJP) ‘मशिन लोकसभा’ राबवली जात आहे. आता शिवसेना (shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही पक्षसंघटना वाढविण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी मुंबईत येऊन जमीन दाखवण्याचा इशारा दिल्यानंतर ठाकरे यांनी थेट भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये (UP) लक्ष घातले आहे. त्यानुसार ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे ‘यूपी’चे प्रदेशाध्यक्ष अनिल सिंह यांनी ३० जिल्हाप्रमुखांची घोषणा केली आहे, त्यानुसार शिवसेना संघटना वाढविण्याचा आदेश ठाकरेंनी दिला आहे. (Shiv Sena has appointed district chiefs in 30 districts of Uttar Pradesh)
उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर, फरुखाबाद, नोएडा, बुलंदशहर, कासगंज, फिरोजाबाद, अमरोहा, बरेली, पिलीभीत, मिर्झापूर, आंबेडकर नगर, लखीमपूर खिरी, मुरादाबाद, मेरठ, गाझियाबाद, सीतापूर, गोंडा, कन्नौज, बहराईच, बस्ती, चंदौली, प्रतापगढ, बाराबंकी, फतेहपूर, कौशांबी, बांदा, चित्रकूट, सोनभद्र, प्रयागराज आणि आग्रा या ३० जिल्ह्यांत शिवसेनेचे ‘यूपी’चे प्रमुख अनिल सिंह यांनी जिल्हाप्रमुखांची घोषणा केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत येऊन ‘उद्धव ठाकरे यांनी भाजपशी गद्दारी केली आहे. त्यांना जमीन दाखवा’ असे आवाहन केले होते. ती टीका शिवसेनेच्या जिव्हारी लागली आहे. त्यानंतर शिवसेनेनेही भाजपशी तडजोड न करता दोन हात करण्याची तयारी चालवली आहे. त्यानुसार भाजपचे वर्चस्व असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेने लक्ष घातले आहे. त्यानुसार उत्तर प्रदेशात शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी ३० जिल्हाप्रमुखांची तातडीने नियुक्ती केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांना ४० आमदार आणि १२ आमदारांनी पाठिंबा दर्शवत शिवसेनेत खिंडार पाडले होते. शिंदे यांच्या बंडानंतर खिळखिळी झालेल्या शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यात पाऊले उचलली आहेत. त्यानुसार आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचा दौरा करत आहेत, थोड्याच दिवसांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
दुसरीकडे महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातही पक्ष संघटना वाढविण्याकडे ठाकरे यांनी लक्ष घातले आहे. त्यानुसार आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील तीस जिल्ह्यांत जिल्हाप्रमुखांची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ३० जिल्हाप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी काळात शिवसेना पक्षप्रमुख आणि मोठे नेते यूपीचा दौरा करणार आहेत. केवळ लोकसभा निवडणूकच नव्हे तर आगामी महापालिका निवडणुकाही शिवसेना ताकदीने लढणार आहे, असे अनिल सिंह यांनी स्पष्ट केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.