

Palghar Ashram School Case : पालघर जिल्ह्यातील मासवण येथील अनुदानित आश्रमशाळेत दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबईच्या आदिवासी सेवा मंडळ संस्थेचे अध्यक्ष आणि एकनाथ शिंदे शिवसेना उपनेते नीलेश सांबरे यांच्यासह पाच जणांविरोधात पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आजारपणाकडे दुर्लक्ष करणे, वेळेवर उपचार न मिळवून देणे आणि आश्रमशाळेच्या व्यवस्थापनात हलगर्जी केल्याप्रकरणी सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मासवण येथील आदिवासी सेवा मंडळ संचालित अनुदानित आश्रमशाळेत (School) शिकणारी विद्यार्थिनी रिया मनू हाडळ (वय 7, रा. वाडाखडकोना, पालघर) हिची सहा ऑगस्टला प्रकृती खालावली. त्यानंतर मनोर ग्रामीण रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत विद्यार्थिनीला एक ऑगस्टला ताप आला होता. तिच्या आजाराच्या निदानासाठी रुग्णालयात नेण्याऐवजी तिला पालकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यामुळे योग्य उपचार न मिळाल्याने तिचा आजार वाढून मृत्यू झाल्याचे उघड झाले.
याशिवाय याच आश्रमशाळेतील विद्यार्थी (Student) श्रेयांश शैलेश अंबात याचा 24 ऑगस्टला मृत्यू झाला. त्याच्या आजारपणात योग्य उपचार न मिळाल्याने आणि काळजी घेण्यात हलगर्जी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष नीलेश सांबरे, मानद सचिव महेश नाईक, प्रभारी मुख्याध्यापक राहुल संखे, मुलींच्या अधीक्षिका अमृता सावंत आणि मुलांचे अधीक्षक पांडुरंग रामचंद्र लहारे यांच्यावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संस्थेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यात अपयश, आश्रमशाळेतील मूलभूत सुविधा व व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष, आजारी विद्यार्थ्यांना वेळेवर उपचार न मिळणे तसेच प्रशासनिक निष्काळजी यामुळे विद्यार्थ्यांचे मृत्यू झाल्याचे सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या प्रकरणात पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.