

Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिकेच्या आगामी राजकारणात महापौरपदावरून महायुतीतील हालचालींना वेग आल्याचे चित्र आहे. महापौरपद मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नगरसेवकांचे संख्याबळ वाढवण्यावर भर दिला जात असून, त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांना लक्ष्य केले जाणार असल्याची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
‘मिशन टायगर’च्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी या केवळ बातम्या असल्याचे म्हटले. शिवसेना ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहतील, असा दावा त्यांनी केला. उद्धव ठाकरेंवर नगरसेवकांचा विश्वास आहे आणि ठाकरेंचा नगरसेवकांवर विश्वास आहे, असे राऊत म्हणाले.
नगरसेवक फोडण्याच्या राजकारणावरून राऊत यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेवर निशाणा साधला. आमचे नगरसेवक उद्धव ठाकरेंबरोबर एकनिष्ठ आहेत. ते कुठेही जात नाहीत म्हणून त्यांना जात प्रमाणपत्राच्या नावाखाली बाद केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. फोडाफोडीच्या राजकारणावर टीका करताना राऊत यांनी शिंदे पिता-पुत्रांना खोचक टोला लगावला. फोडा-झोडा हे त्यांना करण्याची सवय लागली आहे. दोन दिवस कुणाला फोडले नाही तर ते अस्वस्थ होतात, असे ते म्हणाले. तसेच, त्यांच्या मुलाने त्यांच्यावर लवकर उपचार करावेत, अशी खोचक टिप्पणीही राऊत यांनी केली.
मुंबै सहकारी बँकेच्या निवडणुकीत थेट भाजपला आव्हान देण्याची तयारी एकनाथ शिंदे शिवसेनेकडून केली जात असल्याच्या चर्चेवरही राऊत यांनी भाष्य केले. एकनाथ शिंदे यांच्या राजकारणात फोडाफोडीशिवाय दुसरे काही स्थान नाही, असा आरोप त्यांनी केला. फोडा, झोडा आणि विकत घ्या, याशिवाय त्यांना काही सुचत नाही, अशी टीका राऊत यांनी केली. भाजपने मोठे केलेले राजकीय घटक भविष्यात भाजपलाच अडचणीत आणतील, असा दावाही त्यांनी केला.
मुंबै सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्षाचाही पॅनेल असेल, असे संकेत राऊत यांनी दिले. त्यामुळे आगामी काळात मुंबईतील सहकार क्षेत्रातील राजकारणातही महायुतीतील घटकांमध्ये संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई महापालिकेतील सत्ताधारी महायुतीतील महापौरपदाची गणिते, नगरसेवकांचे संख्याबळ आणि शिवसेना ठाकरे पक्षातील संभाव्य फोडाफोडीच्या चर्चांमुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. आता ‘मिशन टायगर’च्या चर्चेला प्रत्यक्ष निवडणुकीत किती राजकीय आकार मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.