

पनवेल महानगरपालिकामध्ये महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर आता स्थायी समिती सभापती निवडीकडे लक्ष लागले आहे.
५ मार्च रोजी सभागृह नेता, विरोधी पक्षनेता आणि स्थायी समिती सभापती पदाची निवड अपेक्षित आहे.
भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींच्या हातात राहणार आहे.
पनवेल : वसंत जाधव
पनवेल महानगरपालिका मध्ये महापौर आणि उपमहापौर पदांची निवड पूर्ण झाल्यानंतर आता सत्तेच्या पुढील टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ५ मार्च रोजी सभागृह नेता, विरोधी पक्षनेता तसेच तिजोरीच्या चाव्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापती पदाची निवड अपेक्षित आहे. भाजपकडे अर्धशतकाहून अधिक सदस्यसंख्या आणि स्पष्ट बहुमत असल्याने या सर्व पदांवर अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींच्याच हातात राहणार आहे. महापौरपदी नितीन पाटील आणि उपमहापौरपदी प्रमिला पाटील यांची सव्वा वर्षांसाठी नियुक्ती झाली आहे. गटनेतेपदाची जबाबदारीही नितीन पाटील यांच्याकडेच असल्याने पुढील सत्ताकारणात त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.
मागील टर्ममध्ये परेश ठाकूर यांनी सभागृह नेतेपद सांभाळले होते; मात्र यंदा त्यांनी निवडणूक लढवलेली नसल्याने नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश बिनेदार, अॅड. मनोज भुजबळ आणि अमर पाटील यांच्या नावांची चर्चा रंगली आहे. अनुभवी व संघटनाशी जवळीक असलेल्या बिनेदार यांना आघाडी मिळू शकते, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
विरोधी पक्षनेतेपदासाठी सुरुवातीला शेकापचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांना संधी दिली जाणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यानंतर हरेश केणी यांचाही पर्याय पुढे येऊ शकतो. विरोधी बाकांवरून प्रभावी आवाज देण्यासाठी अनुभवी नेतृत्वाची निवड होईल, अशी अपेक्षा आहे.
स्थायी समिती सभापतीपदासाठी अनेक पर्याय
महापालिकेच्या कारभारात आर्थिक अधिकारांच्या दृष्टीने स्थायी समिती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या पदासाठी समीर ठाकूर, डॉ. कविता चौतमोल, विकास घरत आणि प्रवीण पाटील यांची नावे चर्चेत आहेत.
भाजपकडे पर्यायांची रेलचेल असल्याने अंतिम क्षणापर्यंत उत्सुकता कायम राहणार आहे. स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनांनुसार व पक्ष नेतृत्वाच्या निर्णयानुसारच या पदांवर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ५ मार्च हा दिवस पनवेलच्या राजकीय भवितव्यासाठी निर्णायक ठरणार आहे.
महिला व बालकल्याण समिती सभापतीपदालाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या पदासाठी सुशिक्षित व कार्यक्षम महिला सदस्याची निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपच्या एकहाती सत्तेमुळे औपचारिक निवड प्रक्रियेपेक्षा पक्षांतर्गत समीकरणे आणि संतुलन अधिक निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे ५ मार्चला कोणाच्या हाती सभागृहाचे नेतृत्व आणि तिजोरीच्या चाव्या जातात, याकडे संपूर्ण पनवेलकरांचे लक्ष लागले आहे.
1. पुढील महत्त्वाची निवड कधी होणार आहे?
५ मार्च रोजी स्थायी समिती सभापती आणि इतर पदांची निवड अपेक्षित आहे.
2. सध्या महापौर आणि उपमहापौर कोण आहेत?
नितीन पाटील महापौर आणि प्रमिला पाटील उपमहापौर आहेत.
3. स्थायी समिती सभापती पद का महत्त्वाचे आहे?
हे पद महापालिकेच्या आर्थिक निर्णयांशी संबंधित असल्याने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
4. कोणत्या पक्षाकडे बहुमत आहे?
भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे.
5. अंतिम निर्णय कोण घेणार?
पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावर सर्व पदांची निवड अवलंबून राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.