
वेंगुर्ले तालुक्यातील पाच जिल्हा परिषद मतदारसंघांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
तुळस व म्हापण महिला आरक्षण, तर आडेली, रेडी आणि उभादांडा सर्वसाधारण ठेवण्यात आले आहे.
भाजप, शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेना — तिन्ही गटांनी स्वबळाचा नारा दिल्याने आघाड्यांचे समीकरण धूसर झाले आहे.
Sindhudurg News : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सदस्य पदांसाठी आरक्षण जाहीर झाले आणि अनेकांची उत्सुकता संपली. सर्वच ठिकाणी आता जिल्हा परिषदेच्या जागेसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून अनेक गणिते जुळवली जात आहेत. वेंगुर्ले तालुक्यात जिल्हा परिषद मतदारसंघाचा विचार करता बहुसंख्य जागांवर खुले आरक्षण जाहीर झाले आहे. यामुळे अनेक इच्छुक चेहरे पुढे येत आहेत. यात तुळस व म्हापण जिल्हा परिषद महिलांसाठी राखीव झाल्याने मात्र अनेक दिग्गज नाराज झाले आहेत.
तालुक्यात 5 जिल्हा परिषद मतदारसंघांतील तुळस व म्हापणमध्ये सर्वसाधारण महिला, तर आडेली, रेडी, उभादांडा मतदारसंघासाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले आहे. यामुळे आता मोर्चेबांधणीला वेग आला आहे. सर्वच पक्षांनी राजकीय गणिते मांडायला सुरुवात केली असून इच्छुकांची चाचपणी केली जात आहे. या निवडणुकीबाबत नुकत्याच झालेल्या भाजपच्या बैठकीत कार्यकर्त्यांकडून स्वबळाचा नारा देण्यात आला, तर पाचही जिल्हा परिषद लढवायला शिंदे शिवसेना सक्षम असल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे ठाकरे शिवसेनेकडूनही जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत स्वबळाचा नारा देण्यात आला. यामुळे आगामी निवडणुका महायुती व महाविकास आघाडी अशी होण्याची चिन्हे काहीशी धूसर झाली आहेत.
रेडी जिल्हा परिषद मतदारसंघाचा विचार करता या ठिकाणी सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्याने अनेक इच्छुक पुढे येत आहेत. या ठिकाणी भाजप, शिंदे शिवसेना व ठाकरे शिवसेना अशी त्रिशंकू लढत होण्याची चिन्हे आहेत. यात भाजपकडून माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ यांचे नाव आघाडीवर आहे. माजी ग्रामपंचायत उपसरपंच राहुल गावडे, ग्रामपंचायत सदस्य मयुरेश शिरोडकर यांची नावे चर्चेत आहेत.
शिंदे शिवसेनेचा विचार करता या पक्षात काँग्रेसमधून दाखल झालेले माजी उपसभापती सिद्धेश परब व कोस्टल विभाग तालुकाप्रमुख काशिनाथ नार्वेकर यांची नावे आघाडीवर, तर उपतालुकाप्रमुख कौशिक परब, विभागप्रमुख अमित गावडे यांची नावे चर्चेत आहेत. ठाकरे शिवसेनेकडून या पक्षाचे एकनिष्ठ मानले जाणारे नामदेव राणे व शिरोड्यातून प्रवीण धानजी ही नावे आघाडीवर आहेत.
उभादांडा जिल्हा परिषद मतदारसंघातही सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले आहे. यामुळे या मतदार संघात इच्छुकांची गर्दी पाहायला मिळत आहे. भाजपकडून तालुकाध्यक्ष पप्पू परब, मनवेल फर्नांडिस, माजी जिल्हा परिषद सदस्य दादा कुबल, युवामोर्चा पदाधिकारी हितेश धुरी, सुजाता देसाई यांची नावे चर्चेत आहेत, तर शिंदे शिवसेनेकडून माजी सभापती सुनील मोरजकर, उपविभागप्रमुख संजय गावडे, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे यांची नावे चर्चेत आहेत.
ठाकरे शिवसेनेकडून उपतालुकाप्रमुख तथा वीज ग्राहक संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय गावडे यांचे नाव आघाडीवर आहे. तुळस जिल्हा परिषद मतदारसंघाचा विचार करता या ठिकाणी सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने अनेक दिग्गजांची निराशा झाली. या मतदारसंघात भाजपकडून महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, ज्येष्ठ पदाधिकारी कुंदा पै, पेंडूरच्या माजी पंचायत समिती सदस्य सावरी गावडे, मातोंड ग्रामपंचायत सदस्य किशोरी परब यांची, तर शिंदे शिवसेनेकडून माजी पंचायत समिती सभापती सुचिता वजराटकर, महिला तालुका संघटिका दिशा शेटकर, विभागप्रमुख संजय परब यांच्या पत्नी संजना परब यांची नावे चर्चेत आहेत.
ठाकरे शिवसेनेकडून तालुकाध्यक्ष यशवंत परब यांच्या पत्नी व माजी जिल्हा परिषद सदस्य योगिता परब यांचे नाव चर्चेत आहे. तसेच शरद पवार राष्ट्रवादीकडून वजराट ग्रामपंचायत सदस्य दीपिका राणे चर्चेत आहेत. या ठिकाणी काँग्रेसचा विचार केला तर ज्येष्ठ नेते दादा परब कोणती भूमिका घेतात यावर उमेदवार ठरणार आहे.
आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात सर्वसाधारण आरक्षण पडले आहे. भाजपकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांचे सुपुत्र सौरभ नाईक, साईप्रसाद नाईक, समीर कुडाळकर, सुभाष बोवलेकर यांचीही नावे चर्चेत आहेत. शिंदे शिवसेनेकडून तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांचे नाव आघाडीवर आहे. ठाकरे शिवसेनेकडून प्रकाश गडेकर, पप्पू चमणकर चर्चेत आहेत. अजित पवार राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते एम. के. गावडे कोणता उमेदवार देतात याकडे लक्ष असणार आहे.
म्हापण जिल्हा परिषद मतदारसंघात सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने या ठिकाणीही अनेक दिग्गजांची निराशा झाली आहे. या ठिकाणी भाजपकडून वंदना किनळेकर, नाथा मडवळ यांच्या पत्नी तसेच माजी पंचायत समिती सदस्य गौरवी मडवळ यांची नावे चर्चेत आहेत. या ठिकाणी माजी सभापती नीलेश सामंत यांचीसुद्धा महत्वाची भूमिका ठरणार आहे, तर शिंदे शिवसेनेकडून नवीन चेहरा रिंगणात पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
या ठिकाणी गेली 10 वर्षे पंचायत समिती सदस्य राहिलेल्या प्रणाली बंगे यांचे नाव चर्चेत आहे. मात्र या ठिकाणी उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, ज्येष्ठ पदाधिकारी महेश सामंत, दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक योगेश तेली हे कोणती रणनीती आखणार, यावर उमेदवार ठरणार आहे. या मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचासुद्धा उमेदवार असणार आहे.
‘आडेली’वर विशेष लक्ष
आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात सर्वसाधारण आरक्षण पडले आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजपच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आडेली मतदारसंघात जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने या मतदार संघावर विशेष लक्ष केंद्रित झाले आहे.
1. वेंगुर्ले तालुक्यात किती जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत?
वेंगुर्ले तालुक्यात एकूण पाच जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत — तुळस, म्हापण, आडेली, रेडी आणि उभादांडा.
2. कोणत्या मतदारसंघात महिला आरक्षण आहे?
तुळस आणि म्हापण मतदारसंघ हे सर्वसाधारण महिला श्रेणीत आरक्षित झाले आहेत.
3. भाजप आणि शिवसेनेची निवडणूक भूमिका काय आहे?
भाजप तसेच शिंदे गटाची आणि ठाकरे गटाची शिवसेना — या सर्वांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे.
4. याचा महायुती आणि महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल?
या निर्णयामुळे दोन्ही आघाड्यांचे समीकरण धूसर झाले असून स्थानिक पातळीवर स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
5. निवडणुका कधी अपेक्षित आहेत?
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.