
Mumbai News : गेल्या वर्षभरात लोकसभा व विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. दोन्ही निवडणुकीत परस्परविरोधी चित्र पहावयास मिळाले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील नेतेमंडळीने उमेदवारीसाठी महाविकास आघाडीत एंट्री केली होती. आता मात्र चित्र पूर्णपणे बदलले आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाल्यानंतर परत एकदा महाविकास आघाडीत आलेल्या नेतेमंडळींचा उलटा प्रवास सुरु झाला आहे. त्यामुळे महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी रांग लागली आहे. त्यातच सध्या राज्य व केंद्रात महायुती सत्तेत असल्याने राजकारणावर त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे येत्या काळात महायुतीमुळे विरोधकांना भविष्यात राजकीय स्पेस मिळणार का? असा सवाल विचारला जात आहे.
लोकशाहीत विरोधी पक्ष हे सरकारला उत्तरदायी ठेण्यासाठी आवश्यक असतात. विरोधक जर प्रभावी नसतील, तर सत्ताधाऱ्यांना कुठलाही विरोध होणार नाही. ज्यामुळे लोकशाहीचा तोलही बिघडू शकतो. त्यामुळे विरोधकांची जागा लोकशाहीत कायम असावी लागते. महायुतीचे आर्थिक, राजकीय व प्रसारमाध्यमांवर नियंत्रण आहे. त्यामुळे विरोधी पक्षांना त्यांच्या भूमिका मांडायला जास्त मेहनत घ्यावी लागत आहे. हे पाहता विरोधकांची जागा कमी होत चालली आहे, हे मान्य करावे लागणार आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून विरोधी पक्षातील नेतेमंडळींचा सत्ताधारी पक्षाकडे ओढा अधिक दिसत आहे.
राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. आतापासूनच सर्वच पक्षाचे नेतेमंडळी कामाला लागले आहेत. त्यामुळे निवडणुकीची लगीनघाई या निमिताने सुरु आहे. त्यामुळेच या निवडणुकीच्या निमित्ताने नेतेमंडळीचा महायुतीकडे (Mahayuti) मोठ्या प्रमाणात ओढा दिसून येत आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील महायुती सरकारमध्ये भाजप, शिवसेना (Shivsena) शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तीन पक्षांचा समावेश आहे. हे तीन पक्षांचे सरकार चालवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठी कसरत करावी लागते. सरकार स्थापन करीत असताना खातेवाटप, पालकमंत्री पद, बंगले यावरून तीन पक्षात मोठी रस्सीखेच पाहवयास मिळाली. मात्र, आता सर्व काही स्थिरस्थावर झाले आहे.
त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमावेळी विरोधकांसाठी सूचक विधान केले आहे. 'आम्ही तीन पक्ष मिळून एकमेकांना कॉम्लिमेंट करतो. आम्ही तिघेही डायव्हर्स स्वभावाचे आहोत. कितीही वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या चालवल्या तरी आमचा समन्वय चांगला आहे. एकमेकांना सोबत घेऊन आम्ही काम करत आहोत. कोणासाठीही पॉलिटीकल स्पेस राहणार नाही, आम्ही तिघे मिळून सर्व सगळी राजकीय स्पेस व्यापून टाकणार आहोत. त्यामुळे कोणाकरिता काही स्पेस राहणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले.
गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचे दिसत आहे. निवडणुका झाल्यानंतर अनेक माजी आमदार व माजी खासदार यांनी पक्ष सोडून महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे येत्या काळात ही गळती रोखायची कशी ? असा प्रश्न महाविकास आघाडीमधील काँग्रेस, उद्धव ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सतावत आहे.
महाविकास आघाडीमधील या तीन पक्षामधून अनेक नेतेमंडळी महायुतीमध्ये येऊ इच्छित आहेत. या तीन पक्षाची वाटचाल अधोगतीकडे होत आहे. त्यामुळे त्यांना भविष्य दिसत नाही. त्यासोबतच नेतृत्वाचा संघर्ष या पक्षांमध्ये दिसत असल्याने मोठ्या प्रमाणात नेतेमंडळी पक्ष सोडत आहेत. त्यामुळे या पक्षातील नेत्यांना मुख्य प्रवाहात जायचे असल्याने ते सत्तेत असलेल्या पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसत आहेत.
गेल्या काही दिवसातील घटनाक्रम पहिला तर महायुतीमुळे विरोधकांची स्पेस कमी झाली असली, तरी ती पूर्णपणे नष्ट होईल असे नाही. परिस्थितीवर, नेतृत्वावर आणि जनतेच्या मूडवर सर्व काही अवलंबून असणार आहे. त्यामुळे विरोधक किती ताकदीने उभे राहतात, यावर सर्व काही अवलंबुन असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.