Mahayuti Dispute : एका खुर्चीने वाढला राजकीय वाद, कदमांच्या कृतीने राष्ट्रवादीत नाराजी अन् भाजपमध्येही खदखद

Mahayuti Clash In Ratnagiri : रामदास कदम यांच्या कृतीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी उसळली असून कार्यक्रमापासून भाजपला दूर ठेवल्याने भाजपचे पदाधिकारीही आक्रमक झाले आहेत.
Ramdas Kadam
Ramdas Kadam sarkarnama
Published on: 
Updated on: 

Ratnagiri News : खेड तालुक्यातील पोयनार धरणाच्या भूमिपूजन सोहळ्यावरून महायुतीमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. एका बाजूला शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय अजय बिरवटकर यांना भर कार्यक्रमात खुर्चीवरून उठवल्याने राष्ट्रवादीमध्ये नाराजी पसरली आहे. तर दुसरीकडे, या कार्यक्रमाला भाजपच्या एकाही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याला निमंत्रण न दिल्याने भाजपमध्येही संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे पोयनार धरणाच्या भूमिपूजन सोहळ्याने खेडमधील महायुतीतील अंतर्गत संघर्षाला पुन्हा तोंड फुटले आहे.

खेड तालुक्यातील रखडलेल्या पोयनार लघुपाटबंधारे योजनेच्या कामासाठी राज्य शासनाने २६५ कोटी ३८ लाख रुपयांच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेला (सुप्रमा) मंजुरी दिली आहे. त्यानंतर ५ नोव्हेंबर रोजी या धरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. या योजनेमुळे खेड तालुक्यातील १४ गावांमधील सुमारे ११५१ हेक्टर शेतजमिनीला सिंचनाचा थेट लाभ मिळणार आहे. मात्र, विकासकामाच्या या कार्यक्रमातही राजकीय श्रेयवाद आणि मानापमान नाट्य रंगले.

रामदास कदमांनी अजय बिरवटकरांना खुर्चीवरून उठवलं

पोयनार धरणाच्या भूमिपूजन सोहळ्यात माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय अजय बिरवटकर हे व्यासपीठावरील रिकाम्या खुर्चीवर बसण्यासाठी गेले. मात्र, रामदास कदम यांनी त्यांना त्या खुर्चीवरून उठवले. सार्वजनिक कार्यक्रमात घडलेल्या या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Ramdas Kadam
Ramdas Kadam : रामदास कदम शिवसेनेत एकाकी? एकनाथ शिंदेंना फोन करून व्यक्त केली खंत; 'स्वकीयांविरोधात' तक्रार

रामदास कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यातील राजकीय संघर्ष जुना आहे. विकासकामांच्या मंजुरीवरूनही यापूर्वी दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाले आहेत. तटकरे यांची विकासकामे अडवून ठेवली जात असल्याचा आरोप कदम यांनी यापूर्वी केला होता. आता पोयनार धरणाच्या भूमिपूजन सोहळ्यात घडलेल्या खुर्चीच्या प्रकरणामुळे या वादाला पुन्हा नवे वळण मिळाले आहे.

सुनील तटकरे १२ नोव्हेंबरला खेडमध्ये; पुनर्वसनाच्या बैठकीकडे लक्ष

या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. गुरुवारी (१२ नोव्हेंबर) खासदार सुनील तटकरे पुनर्वसनासंदर्भात आयोजित बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीत तटकरे काय भूमिका मांडणार आणि रामदास कदम यांच्या गटाकडून काय प्रतिक्रिया दिली जाणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

भूमिपूजन सोहळ्याला भाजपला डावलल्याने नाराजी

दरम्यान, पोयनार धरणाच्या भूमिपूजन सोहळ्यात भाजपच्या एकाही पदाधिकारी अथवा कार्यकर्त्याला निमंत्रण देण्यात आले नसल्याने भाजपमध्येही नाराजीचा सूर उमटला आहे. भाजपचे खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी यावरून महायुतीतील समन्वयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

या धरणाच्या कामासाठी २६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर होण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे. असे असताना भूमिपूजन सोहळ्यात त्यांच्या नावाचा साधा उल्लेखही करण्यात आला नाही, अशी खंत मोरे यांनी व्यक्त केली.

शासनाकडून मंजूर झालेल्या निधीचे श्रेय घेताना त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांचे योगदान नाकारणे योग्य नाही. निधी स्वतःच्या खिशातून खर्च करणार असाल तर तसे स्पष्ट सांगावे, असा टोलाही ऋषिकेश मोरे यांनी लगावला. मित्रपक्षातील प्रमुख नेत्यांचा उल्लेख टाळणे आणि भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण न देणे, हा महायुतीतील समन्वयाचा अभाव असल्याची टीकाही त्यांनी केली.

Ramdas Kadam
Ramdas Kadam : शिवसेनेला मोठा धक्का देण्याचा भाजपचा प्लॅन? कदमांनी थेट नाव घेत 'या' 2 आमदारांवर केला खळबळजनक आरोप!

खेडमध्ये महायुतीतील अंतर्गत संघर्ष उघड

एकीकडे रामदास कदम यांच्या कृतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे, तर दुसरीकडे भाजपला कार्यक्रमापासून दूर ठेवल्याने भाजपचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे २६५ कोटी ३८ लाख रुपयांच्या महत्त्वाकांक्षी धरण प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याने विकासकामापेक्षा राजकीय संघर्षाचीच अधिक चर्चा घडवून आणली आहे. आता सुनील तटकरे यांच्या खेड दौऱ्यात काय घडते आणि महायुतीतील हा वाद वरिष्ठ नेते कसा मिटवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.