

रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील मतभेद कायम आहेत.
भरत गोगावले यांनी महाड येथे छबिना उत्सवादरम्यान आपण या पदाबाबत आजही आशावादी असल्याचे सांगितले.
महाड येथे दिलेल्या त्यांच्या “देवाच्या मनात आल्यावर काय होणार नाय” या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा आणि हशा पिकला.
raigad News : राज्यात महायुतीची सत्ता स्थापन होऊन जवळपास १४ महिन्याचा कालावधी होत आला आहे. तरी देखील रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. नाशिकच्या पालकमंत्रीपदावर सध्या कोणतीच चर्चा होताना दिसत नसली तरी रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीतील वाद समोर येताना दिसत आहे. येथे शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीत पालकमंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेंच पहायला मिळत आहे. दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या आशावादी वक्तव्यामुळे आता राज्यभर चर्चा होताना दिसत आहे.
रायगडसह राज्यात नुकताच जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांची निवडणूक झाली असून निकालात महायुतीच्या पारड्यात सत्ता पडली आहे. रायगडमध्ये देखील महायुतीच सत्ता येण्याची शक्यता आहे. मात्र या सत्तेत भरत गोगावलेंच्या नेतृत्वात लढलेली शिवसेना वाटेकरी असणार नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या राजकीय खेळीमुळे येथे भाजप-राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना अशी युतीची जवळजवळ घोषणा झाली आहे. यामुळे सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेला आता विरोधी बाकावर बसण्याची नामुष्की ओढावली आहे.
राज्याप्रमाणेच जिल्ह्यात देखील शिवसेनेला सत्तेत वाटा मिळावा अशी मागणी करणारे वक्तव्य शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी केलं असून राज्यात महायुती असून त्यापद्धतीने राष्ट्रवादीने युती धर्म पाळावा असे म्हणत तटकरेंना राज्यातील महायुतीची आठवण करून दिली आहे. तसेच जिल्हा परिषदेसाठी अद्याप युतीची घोषणा झाली नसून याचा निर्णय राज्याचे नेतृत्व करणारे तिन्ही पक्षाचे नेते करतील असेही त्यांनी म्हटलं आहे.
याचदरम्यान रायगडच्या पालकमंत्री पदावरून महाडच्या छबिना उत्सवादरम्यान भरत गोगावले यांनी भाष्य केले आहे. त्यांनी पालकमंत्री पदाबाबत आपण आजही आशावादी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. गोगावले यांनी, आपल्या कार्यकर्त्यांनी आणि वीरेश्वर महाराजांच्या भक्तांनी रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत साकड घातल्याच गोगावले यांनी सांगितलं आहे.
तर गेली पाच वर्ष पालकमंत्री पद हुलकावणी देत असताना आता देवाच्या मनात आल्यावर काय नाही होणार? असे त्यांनी म्हटलं आहे. तर आता या गोष्टींना वेग आला असून सर्व मार्ग मोकळे झाले आहेत का असे पत्रकारांनी प्रश्न करताच त्यांनी बहूतेक दिसतयं तसं असेही म्हणत आपण पालकमंत्री पदाबाबत आशावादी असल्याचे म्हटलं आहे. त्यांच्या या आशावादीपणामुळे तेथे एकच हशा पिकला.
दरम्यान आता मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदावरून रंगलेल्या 'देवाच्या मनात असेल तर...' या वक्तव्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होईल', असं सूचक विधान करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती.
तर या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत मिश्किल टोला लगावला होता. त्यांनी, 'देवा कुठला मी का वरचा देव' असे म्हणत, आम्हाला पूर्ण बहुमत मिळालं असून गेल्या तीन निवडणुकांमध्ये कुणालाही मिळाल्या नाहीत. पण आता वरच्या देवानेच ठरवलं आहे, महायुतीचाच महापौर करायचा. त्यामुळे मुंबईत महायुतीचाच महापौर होणार. शिंदे साहेब आणि आम्ही एकत्र बसून सगळं ठरवू आणि मुंबई चांगल्या पद्धतीने चालवू असे फडणवीस म्हणाले होते.
1. रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद का सुरू आहे?
महायुतीतील शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात या पदाच्या वाटपावरून मतभेद असल्याने वाद कायम आहे.
2. भरत गोगावले यांनी काय प्रतिक्रिया दिली?
त्यांनी “देवाच्या मनात आल्यावर काय होणार नाय” असे म्हणत आपण आशावादी असल्याचे सांगितले.
3. हे वक्तव्य कुठे करण्यात आले?
महाड येथील छबिना उत्सवादरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले.
4. पालकमंत्री पद गेली किती वर्ष प्रलंबित आहे?
गेल्या पाच वर्षांपासून या पदाबाबत चर्चा आणि प्रतीक्षा सुरू असल्याचे सांगितले जाते.
5. या वादाचा पुढील राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
महायुतीतील संबंध आणि रायगडच्या सत्तासमीकरणावर या वादाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.