

जिल्हा परिषदेच्या पहिल्या सभेत विविध समित्यांच्या खात्यावरून गदारोळ
अर्थ व बांधकाम खात्यावर भाजप आणि राष्ट्रवादीत तीव्र रस्सीखेच
अखेर राष्ट्रवादीने बाजी मारत महत्वाचे खाते आपल्या ताब्यात घेतले
Raigad ZP News: जिल्हा परिषदेची पहिलीच सभा गदारोळात पार पडली असून अर्थ व बांधकाम, शिक्षण, आरोग्य, कृषी व पशुसंवर्धन या विषय समित्यांच्या (मलाईदार) खात्यावरून महायुतीत जोरदार रस्सीखेंच पाहायला मिळाली.
भाजप आणि राष्ट्रवादीत अर्थ व बांधकाम खात्यावरून शेवटपर्यंत इर्षा पहायला मिळाली. त्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंगही लावली. मात्र अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीने बाजी मारली आणि अर्थ व बांधकाम खाते आपल्या पदरात पाडून घेतले. यानंतर सदस्या गिता जाधव यांनी आपल्या शैलीत यामुद्दयावर जोरदार टोलेबाजी करत अभिनंदन केले.
त्यांनी अर्थ व बांधकाम सभापती पद मिळण्याची आशा काहींना होती. अनेकांनी बॅनरही लावले होते. परंतु, ते पद मिळाले नाही, असा चिमटा काढला. यामुळे याची जोरदार चर्चा जिल्ह्यात रंगली. तर आता जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मधुकर पाटील यांच्याकडे आरोग्य व बांधकाम विभागाची धुरा सभापती म्हणून सोपविण्यात आली असून वित्त व शिक्षण सभापती म्हणून चंद्रकांत कळंबे आणि कृषी व पशुसंवर्धन सभापती म्हणून वैकुंठ पाटील यांची निवड मंगळवारी (ता.७) करण्यात आली.
दरम्यान जिल्हा परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत रखडलेल्या वित्त, आरोग्य, शिक्षण, कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापती पदाची निवड करण्यात आली. तसेच विविध मुद्द्यावरून सदस्यांमध्ये चर्चा झाली.
बहुतांश सदस्य नव्याने निवडून आल्याने नियमांची अपुरी माहिती, अनुभवाचा अभावामुळे गोंधळ दिसून आला. शिक्षण विषय, जलजीवन मिशन योजना, पाणी टंचाई, भ्रष्टाचार अशा अनेक विषयांवर प्रचंड गदारोळ झाला. यावेळी ही जिल्हा परिषदेची सभा आहे, की गाव सभा अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली.
सदस्यांमध्ये बोलण्यासाठी स्पर्धाच सुरु असल्याचे दिसून आले. मतदार संघातील प्रश्न मांडताना सदस्यांमध्ये ताळमेळ दिसून आला नाही तर वाद दिसून आला. यावेळी अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्यांना ते जमले नाही. यामुळे जिल्हा परिषदेची सभा की, गाव सभा अशी चर्चा सभागृहातच दबक्या आवाजात सुरू होती. तर ही सभा उपाध्यक्ष आणि कृषी सभापतीच चालवित असल्याच्या चर्चेला देखील उधाण आले.
भाजपचा खेळ निष्फळ
जिल्हा परिषदेत सत्ता महायुती आली असून या दरम्यान अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. यावेळी भाजपचे नेते वैकुंठ पाटील यांनी राजकीय डाव टाकले. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळण्यासाठी त्यांनी रणनीती आखली मात्र शिवसेनेच्या सत्तेत प्रवेशा ने त्यांच्या अध्यक्षपदावर पाणी फेरले. यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेती मलईदार खात्यातील अर्थ व बांधकाम सभापतीपद पदरात पाडून घेण्यासाठी खेळी खेळली.
त्यासाठी जोरदार प्रयत्न करत नेत्यांची मदत घेत पडद्यामागे हालचाली केल्या, खळबतं केली. दरम्यान जिल्हा परिषदेत सत्तेच्या वाटपात शेवटपर्यंत रंगलेल्या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या. पाटील यांनी अर्थ व बांधकाम सभापतीपदासाठी काय करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
मात्र सर्वसाधारण सभेत अर्थ सभापती पद चंद्रकात कळंबे यांच्याकडे देण्यात आले. तर पाटील यांना कृषी व पशुसंवर्धन सभापती पदावर समाधान मानावे लागले. या खेळीत शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीने समीकरणे बदलली वैकुंठ पाटलांसह भाजपला मोठा धक्का दिला. यामुळे आता त्यांच्या समर्थकांमध्येही नाराजीचे वातावरण आहे.
1. जिल्हा परिषदेत वाद कशामुळे झाला?
समितींच्या महत्वाच्या खात्यांच्या वाटपावरून वाद झाला
2. कोणत्या खात्यावर सर्वाधिक वाद झाला?
अर्थ व बांधकाम खात्यावर सर्वाधिक संघर्ष झाला
3. अखेर कोणत्या पक्षाने बाजी मारली?
राष्ट्रवादी काँग्रेसने अर्थ खाते मिळवले
4. सभेत काय घडले?
सभागृहात गदारोळ झाला आणि नेत्यांमध्ये टोलेबाजी झाली
5. कोणत्या पदांवर नियुक्ती झाली?
वित्त, शिक्षण, आरोग्य आणि कृषी विभागांसाठी सभापती निवडण्यात आले
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.