

Raigad News : कर्जतच्या जंगलातील वृक्षतोड आणि प्रस्तावित प्रकल्पावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. जंगलातील जुन्या झाडांची कत्तल करून हा प्रकल्प कोणासाठी उभारला जात आहे, असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जंगलाच्या अंतिम संस्काराला आलोय, असं वाटलं,” अशा शब्दांत त्यांनी वृक्षतोडीबाबत संताप व्यक्त केला आहे. तसेच, या प्रकल्पाची महाराष्ट्राला नेमकी गरज काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पावरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. हा प्रकल्प भीमाशंकर अभयारण्यापासून अवघ्या 16 किलोमीटर अंतरावर आहे. तर या प्रकल्पासाठी तब्बल ३२ हजार झाडं तोडण्यात येणार आहेत. या वृक्षतोडीचा दुष्परिणाम भीमाशंकरच्या जंगलातील वन्यजीवांसह पर्यावरणावरही मोठ्या प्रमाणावर होण्याचा धोका आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी कर्जतमधील वृक्षतोडीच्या ठिकाणी आज (ता.२८) सकाळी भेट दिली होती.
यानंतर संध्याकाळी त्यांची कर्जत येथे सभा झाली. या सभेतून कर्जत परिसरातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी सरकारच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. “इतक्या वर्षांपासून उभी असलेली जुनी झाडं कोणत्या तरी गुजरात्याच्या फायद्यासाठी कापली जात आहेत,” असा आरोप त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणामागील कथित षड्यंत्र समजून घेण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
23 प्रकल्पांपैकी 20 खासगी कंपन्यांचे?
कर्जत परिसरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याच्या मुद्द्यावरूनही राज ठाकरे यांनी सरकारला लक्ष्य केले. “इंटरनेट बंद केलं, तर सूर्य उगवायचा थांबतो का? मन स्वच्छ असतं, तर ही वेळ आली नसती,” अशी टीका त्यांनी केली. राज ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार, एकूण २३ प्रकल्पांपैकी तीन प्रकल्प केंद्र सरकारचे असून उर्वरित २० खासगी क्षेत्रातील आहेत. या परिसरात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित डेटा सेंटर उभारण्याचीही योजना असल्याचे त्यांनी सांगितले. अशा डेटा सेंटरसाठी मोठ्या प्रमाणात वीज आणि पाण्याची गरज भासेल. त्याचबरोबर परिसरात वसाहती निर्माण होतील आणि बाहेरून लोक येतील, असेही त्यांनी नमूद केले. “हे सगळं तुमच्यासाठी केलं जात नाही,” असे म्हणत या प्रकल्पांचा फायदा स्थानिक नागरिकांना होणार आहे का, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
महाराजांचे मावळे पण...
‘छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आपण अभिमानाने सांगतो; पण प्रत्यक्षात अन्यायाविरोधात उभे राहत नाही,’ अशा शब्दांत त्यांनी जनतेच्या भूमिकेवरही भाष्य केले. महाराष्ट्रातील जमिनी, जंगल आणि नैसर्गिक साधनसंपत्तीबाबत सुरू असलेल्या निर्णयांवर जनतेने आवाज उठवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
‘प्रकल्प महाराष्ट्रासाठी की दुसऱ्यांच्या फायद्यासाठी?’
राज ठाकरे यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या अधिकारांवरही प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या मते, राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना केंद्रातील नेतृत्वाकडून पुरेसे महत्त्व दिले जात नाही. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर नाव न घेता टीका केली. “महाराष्ट्रात सत्तेत बसलेल्या लोकांच्या हातात काहीच उरलेलं नाही,” असे ते म्हणाले. मुख्यमंत्री यांनीच यापूर्वी केंद्र सरकार आणि एका खासगी कंपनीने प्रकल्पाबाबत निर्णय घेऊन प्रस्ताव दिल्याचे सांगितल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला.
उद्योगपती थेट दिल्लीला जाऊन केंद्रातील नेतृत्वाची भेट घेतात आणि प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनी किंवा जंगलांची माहिती देऊन मंजुरी मिळवतात, असा आरोपही त्यांनी केला. या प्रकल्पांमागील निर्णयप्रक्रिया आणि त्यातून महाराष्ट्राला होणारा फायदा याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली.
‘वीज आणि इंटरनेट बंद?’
प्रकल्पाला विरोध वाढत असताना सरकारकडून वीजपुरवठा बंद केला जाऊ शकतो, अशी भीती राज ठाकरे यांनी व्यक्त केली. सध्या इंटरनेट बंद करण्यात आल्याचा उल्लेख करत त्यांनी सरकारच्या संभाव्य भूमिकेवर टीका केली. तसेच “सरकारने सांगावं, या प्रकल्पांची महाराष्ट्राला किती गरज आहे. विजेची गरज आहे, असं सांगितलं जाईल आणि तसं वातावरण तयार केलं जाईल,” असे ते म्हणाले. या प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील नागरिकांच्या हितापेक्षा इतरांचे हित साधले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘मतदान करताना विचार करा’
राज ठाकरे यांनी नागरिकांच्या मतदानाच्या भूमिकेवरही भाष्य केले. निवडणुकीच्या वेळी पैसे घेऊन किंवा जाती-धर्माच्या नावावर मतदान केले जाते आणि त्यानंतर पुढील पाच वर्षे सरकारच्या कारभाराबाबत तक्रारी केल्या जातात, असे ते म्हणाले. अशा परिस्थितीसाठी नागरिकांनीही आत्मपरीक्षण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांची तोंडे बंद केली...
‘लाडकी बहीण’ योजनेवर टीका करताना राज ठाकरे यांनी, महिन्याला दीड हजार रुपये देऊन महिलांची मते मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. या योजनेच्या माध्यमातून महिलांची तोंडे बंद केली जात असून, सरकारच्या कारभारातील त्रुटींकडे दुर्लक्ष करण्यास भाग पाडले जात असल्याचा दावा त्यांनी केला.
कर्जतच्या जंगलातील वृक्षतोड, प्रस्तावित प्रकल्प, इंटरनेट बंदी आणि राज्य सरकारच्या भूमिकेवरून राज ठाकरे यांनी केलेल्या या टीकेमुळे रायगडमधील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रकल्पाची गरज, पर्यावरणीय परिणाम आणि स्थानिक नागरिकांना होणारा फायदा याबाबत सरकारची भूमिका काय असेल, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.