

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या सोमवारी (ता. 20) करण्यात आल्या. याबाबत नियोजन विभागाने सोमवारी (20 जुलै) शासन निर्णय जारी केला असून, समितीवर एकूण 11 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमधून सत्ताधारी महायुतीत समतोल साधण्यात पालकमंत्री उदय सामंत यांना यश आल्याचे दिसत आहे. शासन निर्णयानुसार, दोन लोकप्रतिनिधी म्हणून आमदार शेखर निकम आणि किरण सामंत यांचा समावेश करण्यात आला आहे.
नियोजन विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला असून, जिल्ह्याच्या विकास आराखड्याला दिशा देण्यासाठी या सदस्यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समिती ही जिल्ह्यातील विविध विकासकामांचे नियोजन, निधीचे प्राधान्यक्रम निश्चित करणे, ग्रामीण व शहरी भागातील विकास आराखड्यांचा समन्वय साधणे आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारी समिती आहे.
या समितीत दोन लोकप्रतिनिधी, जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले दोन सदस्य आणि जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेले विशेष निमंत्रित अशा एकूण 15 जणांची नियुक्ती करण्यात येते. या सदस्यांचा कार्यकाळ शासनाकडून नियुक्ती रद्द होईपर्यंत किंवा विद्यमान मंत्रिमंडळाचा कार्यकाळ संपेपर्यंत असतो.
राज्य सरकारने रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीवर विधानमंडळ किंवा संसद सदस्यांमधून दोन नामनिर्देशित सदस्य म्हणून आमदार शेखर निकम आणि आमदार किरण सामंत यांची नियुक्ती केली आहे. आमदार शेखर निकम हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असून आमदार किरण सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत. ते पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधुही आहेत.
तसेच या समितीत जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या नऊ जणांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये संतोष मैतापकर, सचिन जाधव, प्रसाद सावंत, विलास (बंडू) वाघीरे, संदेश (बापू) मेटे, अमित केतकर, केदार साठे, अजय बिरवटकर आणि सचिन वहाळकर यांचा समावेश आहे.
दरम्यान, या समितीत सध्या शिवसेनेचा वरचष्मा दिसत असून त्यांचे सहा सदस्य आहेत. त्यापाठोपाठ भाजपचे तीन सदस्य असून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन सदस्य आहेत. भाजपच्या कोट्यातून सचिन वहाळकर, केदार साठे आणि अमित केतकर यांना संधी देण्यात आली आहे. तसेच अजय बिरवटकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून जिल्हा नियोजन समितीवर पाठवण्यात आले आहे.
पालकमंत्री म्हणून उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समितीवर नियुक्त्या करताना शिवसेनेतील नेत्यांसह कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. तसेच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जागा देत त्यांची नाराजी होणार नाही, याचीही काळजी घेतली आहे.
या समितीत उदय सामंत यांचा वरचष्मा दिसून येत आहे. नियुक्त करण्यात आलेले सर्व सहाही जण सामंत यांच्या गटातील असल्याचे सांगितले जाते. राज्यमंत्री योगेश कदम यांच्या गटाला पुढील टप्प्यात संधी दिली जाणार असल्याचे महायुतीच्या गोटातून सांगण्यात आले आहे. मात्र, आपल्या गटाला डावलल्याने योगेश कदम समर्थक नाराज असल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.