
Ratnagiri News : शिवसेना फुटीनंतर शाखा कुणाच्या असा वाद स्थानिक पातळीवर जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये पोहचला होता. यानंतर या वादावर काही अंशी पडदा पडला होता. मात्र आता पुन्हा एकदा या वादाची ठिकणी रत्नागिरीत पडण्याची शक्यता असून पुन्हा नवा वाद रंगला आहे. शहरातील साळवी स्टॉप येथील शिवसेना शाखेवरून नवा वाद सुरू झाला असून शाखा कोणाची? उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची की, शिंदे शिवसेनेची असा वाद रंगला आहे.
शिवसेनेतील फुट शाखांच्या दरवाजापर्यंत पोहचली असून शाखांवर दावा ठोकण्यावरून मध्यंतरी दोन्ही गट आमने-सामने आले होते. जोरदार राडे देखील झाले होते. यानंतर हे वाद थांबले होते. पण आता रत्नागिरीत ठाकरे गटाचे नवनियुक्त रत्नागिरी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी शहरातील साळवी स्टॉप येथील शिवसेना शाखेवर हक्क सांगितला आहे. यामुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे.
दरम्यान वादाच्या तोंडावर नवनियुक्त तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी या शाखेतून कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्विकारून कार्याला सुरवात करणार असल्याची भूमिका घेतली आहे. तर त्यांच्या हक्क सांगण्यावरून शिंदे गटाने अद्याप कोणतीच प्रतिक्रीया दिली नसून शिवसेनेत नुकताच प्रवेश केलेले बंड्या साळवी यांनी मात्र सामंजस्याची भूमिका घेतली आहे.
रत्नागिरीत सध्या उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वात शिवसेना वाढवण्याचे कार्याक्रमांचा सपाटा सुरू झाला आहे. येथे सामंत यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गट फोडण्यास सुरूवात केली आहे. तर त्यांनी काही दिवसांपूर्वीच गेली १७ वर्षे शिवसेनेचे (उबाठा) तालुकाप्रमुख म्हणून काम केलेले बंड्या साळवी यांचा शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करून घेतला. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक स्वराज्य संस्थेतील अनेक सदस्य, पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला होता. या प्रवेशामुळे उबाठाला रत्नागिरीत धक्का बसल्याच्या चर्चा सुरू असतानाच शिवसेनेनं तत्काळ शेखर घोसाळे यांच्याकडे तालुकाप्रमुखपद देत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.
घोसाळे यांनी पदभार स्वीकारताच आता साळवी स्टॉप येथील शाखेवरून आक्रमक भूमिका घेत उबाठा गटाचा हक्क सांगितला आहे. यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. यावरून घोसाळे यांनी, साळवी स्टॉप शिवसेना शाखा ही बाळासाहेब ठाकरे यांच्या कारकिर्दीत स्थापन करण्यात आली आहे. याच शाखेतून शिवसेनेने कारभार चालवला. आता आपण आपल्या कारभाराची सुरवात देखील याच शाखेतून करणार असल्याचे सांगितले आहे. तर आज (ता. २९) सायंकाळी पाच वाजता ते साळवी स्टॉप शाखेत जाणार असून येथून कारभार सुरू सुरू करणार आहेत.
दरम्यान वादाला तोंड फुटण्याची शक्यता असतानाच यावरून शिंदे शिवसेनेचे नेते बंड्या साळवी यांनी सामंजस्याची भूमिका घेतली आहे. साळवी यांनी, घोसाळे यांनी तालुकाप्रमुखपद घेतले त्यांचे अभिनंदन. ते शाखेत येत असतील तर त्यांचे स्वागतच असेल. त्यांनी यावे शुभेच्छा स्वीकारव्यात. त्यांनी त्यांचे काम काम करावे आम्ही आमचं काम करू. आम्ही दोघं वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आमची मन दुभंगलेली नाहीत, असे म्हटले आहे. त्यामुळे आता राज्यात काहीही असो पण किमान रत्नागिरीतून शिवसेना उबाठा आणि शिवसेना शिंदे गटाचे कामकाज एकाच छताखालून होणार का हे पाहावं लागणार आहे. तर तसे होते का याची उत्सुकता रत्नागिरीकरांना देखील लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.