Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency : शिवसेना फुटीमुळे विनायक राऊतांना हॅटट्रिकसाठी घ्यावे लागणार कष्ट

Lok Sabha Election 2024 : विनायक राऊत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघाचे विद्यमान खासदार असून ते एक आक्रमक आणि कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात.
Vinayak Raut
Vinayak RautSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Elections 2024 : विनायक राऊत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघाचे विद्यमान खासदार असून ते एक आक्रमक आणि कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. सर्वसाधारण कुटुंबातून आलेल्या विनायक राऊत यांनी शिवसेनेतून नगरसेवक पदापासून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेल्या राणे कुटुंबाला एकहाती कडवा विरोध करणारे नेते म्हणून विनायक राऊत यांना ओळखले जाते.

राणे कुंटुबांकडून शिवसेना पक्षावर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर होणारा प्रत्येक वार सडेतोड प्रत्युत्तराने परतवून लावणाऱ्या नेत्यांमध्ये विनायक राऊतांचाही समावेश आहे. विनायक राऊत केंद्र स्तरावरही संजय राऊत, अरविंद सावंत यांच्यानंतर पक्षाची भूमिका अगदी आक्रमकपणे मांडतात. Lok Sabha Election 2024

बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसैनिक म्हणून काम करणाऱ्या विनायक राऊत यांनी पहिल्यांदा 1985 मध्ये मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणून राजकीय करिअरची सुरुवात केली. ते 1992 पर्यंत नगरसेवक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर शिवसेनेने राऊत यांना 1999 मध्ये विलेपार्ले मतदारसंघातून ते पहिल्यांदा विधासनभेत गेले. त्यानंतर 2012 मध्ये त्यांची विधान परिषदेतही वर्णी लागली, तसेच पक्षातही विविध पदे मिळत गेली.

पुढे पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या राऊतांना शिवसेनेने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांनी निलेश राणे यांचा दीड लाखांच्या मताधिक्याने पराभव केला. 2019 मध्ये ते दुसऱ्यांदा खासदार झाले. आता शिवसेना फुटीनंतर विनायक राऊत ठाकरे गटाकडून लोकसभेच्या रणांगणात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. या निवडणुकीत ठाकरे गटाला आणि विनायक राऊतांना आपली ताकद दाखवून देण्याची संधी आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vinayak Raut
BJP Politics : भाजपचं ठरलं... चौथ्या जागेची चुरस वाढली; आमदारांची तातडीची बैठक

या संपूर्ण कालावधीत त्यांनी मतदारसंघात पक्षवाढीच्या कामासोबत आपला जनसंपर्क वाढवण्याचे काम नेटाने केले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात राऊतांचे मुख्य विरोधक एकमेव राणे कुटुंब होते. परंतु पक्ष संघटनेच्या जोरावर राणेंना मालवणमध्येच थोपवून धरण्यात विनायक राऊत आजपर्यंत यशस्वी ठरले आहेत. मात्र आता राणे कुटुंबाचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. त्यामुळे राणेंची ताकद वाढली आहे. त्यातच शिवसेना फुटीनंतर विनायक राऊतांच्या पाठिशी असलेल्या जनमताचेही विभाजन झाले आहे.

आगामी निवडणुकीत विनायक राऊत यांना कोकणात भाजपचे जठार, राणे, शिंदे गटाचे सावंत बंधू, केसरकर यांच्याशी दोन हात करायचे आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक ही विनायक राऊत यांच्यासाठी म्हणावी तितकी सोपी राहिलेली नाही. भाजपनेही आगामी लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून आपला उमेदवार देण्याची तयारी सुरू केली. दुसरीकडे, मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाची ताकद वाढल्याने शिंदे गटानेही आपला उमेदवार उतरवण्याचे संकेत दिले आहेत. शिंदे गटाकडून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांना भाजप आणि शिंदे गटाशी दोन हात करावे लागणार आहेत.

नाव (Name):

विनायक भाऊराव राऊत

जन्मतारीख (Birth Date):

15 मार्च 1954

शिक्षण (Education):

एमए

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background):

विनायक राऊत यांचा जन्म कोकणातील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. कोणतीही राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना राऊत यांनी स्वकर्तृत्वाने राजकारणात आपले स्थान भक्कम केले आहे. विनायक राऊत यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळगावात झाला. भाऊराव आत्माराम राऊत असे त्यांच्या वडिलांचे नाव, तर मातोश्रींचे नाव रुक्मिणी राऊत असे आहे. त्यांच्या पत्नी शामल राऊत याही राजकारणात सक्रिय आहेत. त्या 1992 मध्ये मुंबई महापालिकेच्या नगरसेविका होत्या. विनायक राऊत यांचे पुत्र गितेश राऊत हे राजकारणात सक्रिय आहेत. खासदार विनायक राऊत हे रामेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

Vinayak Raut
Dharashiv Railway : धाराशिव रेल्वेमार्गासाठी निधीचा बूस्टर डोस ; महायुतीच्या उमेदवाराला देणार बळ...

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business):

व्यवसाय

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency):

रत्नागिरी सिंधुदुर्ग

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation):

शिवसेना (ठाकरे गट)

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey):

विनायक राऊत यांची राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरू झाली. बाळासाहेब ठाकरेंच्या सभांमधील भाषणे आणि मराठी भाषिकांसाठी त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे प्रभावित होऊन ते शिवसेनेत दाखल झाले. 1985 मध्ये मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणून त्यांनी सक्रिय राजकारणात पाऊल ठेवले. त्यानंतर 1992 पर्यंत ते नगरसेवक म्हणून कार्यरत होते. पुढे पक्ष संघटनेची जबाबदारी घेऊन पक्ष विस्तारात हातभार लावला. 1999 मध्ये राऊत यांनी विधानसभेच्या त्यांच्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसचे अशोक जाधव यांचा पराभव केला. त्यानंतर 2004, 2009 मध्येही राऊत यांना उमेदवारी मिळाली, पंरतु अशोक जाधव यांच्या कडून त्यांना पराभव पत्कारावा लागला. या दरम्यान शिवसनेने 2012 मध्ये राऊत यांना विधानपरिषदेवर संधी दिली. राऊतांनी विधानसभा आणि विधान परिषदेत आक्रमकपणे भूमिका मांडली. दरम्यानच्या काळात पक्षाने राऊत यांना 2005 मध्ये पक्षाचे राष्ट्रीय सचिव केले होते.

पुढे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सेनेने राऊत यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत त्यांचा सामना तत्कालीन काँग्रेसचे उमेदवार निलेश राणे यांच्याशी झाला. या निवडणुकीवेळी देशभरात मोदी लाट होती. त्याचा फायदा विनायक राऊत यांना झाला आणि तब्बल दीड लाख मताधिक्क्याने राऊतांनी राणेंचा पराभव केला. राऊत राज्याच्या राजकारणातून आता दिल्लीच्या राजकारणात सक्रिय झाले होते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात विकासकामे करत राऊतांनी आपल्या जनसंपर्काच्या कक्षा अधिक रुंदावल्या. पहिल्यांदाच मुंबई सोडून राऊत तळकोकणातील मतदारसंघाचे नेतृत्व करत होते. त्यातच कोकणच्या मतदारांनी नेहमीच शिवसेनेला साथ दिली होती. त्यामुळे विनायक राऊत यांनी हिरीरीने मतदारसंघात विकासाची कामे केली.

2019 ज्या निवडणुकीतही विनायक राऊत आणि निलेश राणे आमनेसामने आले. मात्र यावेळी राणे कुटुंबीयांनी काँग्रेस सोडून स्वत:चा स्वाभिमान महाराष्ट्र पक्ष स्थापन केला होता. तो पुढे अल्पावधीतच भाजपमध्ये विलीन झाला. या पक्षाकडून निलेश राणे निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. मात्र याही निवडणुकीत राणेंना पराभवाचा सामना करावा लागला. विनायक राऊत यांचा दुसऱ्यांदा विजय झाला, मात्र निलेश राणे सक्रिय राजकारणातून बाहेर पडत गेले. 2019 च्या विजयानंतर विनायक राऊत संसदेत शिवसेनेचे गटनेते झाले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी राज्यात बंड केले आणि जून 2022 मध्ये पक्ष फोडला. त्यावेळी शिवसेनेच्या 18 पैकी 13 खासदारांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र विनायक राऊत यांनी पक्षाशी इमान राखत ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाही तर पक्ष फुटीनंतर शिंदे गटाला सडेतोड प्रत्युत्तर देत पक्षाची बाजू जनतेसमोर मांडली आणि आजही मांडत आहेत. त्यामुळेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून पुन्हा एकदा विनायक राऊत यांचे नाव आघाडीवर आहे.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency):

विनायक राऊत यांनी खासदार निधीतून मतदारसंघात अनेक विकासाची कामे केली आहेत. गावपाड्यांना पक्क्या रस्त्यांनी शहरांशी जोडणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, याचबरोबर शाळा, महाविद्यालयांत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्याकडूनही त्यांनी मतदारसंघातील कणकवली, देवगड, वैभववाडी येथील रस्त्यांच्या कामासाठी निधी प्राप्त करून घेतला होता. याशिवाय कोकणात आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठीही राऊत यांनी प्रयत्न केले आहेत.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election):

विनायक राऊत यांनी या निवडणुकीत स्वाभिमान महाराष्ट्र पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांचा पराभव केला होता.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election):

2019 च्या निवडणुकीत विनायक राऊत यांना दुसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी शिवसेना -भाजप युती होती. त्यामुळे रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्लाच मानला जात होता. या मतदारसंघात भाजपची फारशी ताकद नव्हती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद ही राणे आणि केसरकर यांच्या रूपाने होती. मात्र राणेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन स्वत:चा स्वाभिमान पक्ष काढल्याने काँग्रेसही नावालाच उरली होती. काँग्रेसने या निवडणुकीत नवीन चंद्र बांदीवडेकर यांना उमेदवारी दिली होती. तरीही खरी लढत ही महाराष्ट्र स्वाभिमानचे उमेदवार निलेश राणे आणि विनायक राऊत या दोघांतच रंगली होती. युतीच्या बळावर विनायक राऊत यांनी 2014 च्या निवडणुकीपेक्षा जास्त मते घेत निलेश राणे यांना पराभवाचा झटका दिला होता.

या निवडणुकीत विनायक राऊत यांनी एक लाख 76 हजार 691 मताधिक्क्याने दणदणीत विजय मिळवला होता. राऊत यांना शिवसेनेचे रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्या मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्क्य मिळाले होते. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी मोदींच्या न ओसरलेल्या लाटेचा प्रभाव आणि पुलवामा हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानला दिलेले चोख प्रत्युत्तर, याचा एक हिंदुत्ववादी पक्ष म्हणून शिवसेनेला आणि विनायक राऊत यांना फायदा झाला होता. विनायक राऊत यांनी पहिल्या टर्ममध्ये तळकोकणात विकासकामे केली होती, त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत झाला. दुसरीकडे काँग्रेस सोडून स्वत:चा पक्ष महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन करून रिगंणात उतरलेल्या राणे यांना काँग्रेस आणि शिवसेनेशी दोन हात करावे लागले. मात्र नवखा पक्ष आणि राणेंची अरेरावी याला जनतेने मतपेटीतून उत्तर दिले होते. याचा फायदा देखील विनायक राऊत यांना झाला होता.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

विनायक राऊत हे मूळचे सिंधुदुर्गातील असल्याने त्यांचा मतदारसंघातील जनसंपर्क पूर्वीपासूनच होता. विनायक राऊत हे मुंबई आणि कोकणातील राजकारणात दीर्घकाळापासून सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्या जनसंपर्काच्या कक्षा ते आमदार असल्यापासूनच विस्तारलेल्या होत्या. राजकारणात प्रभावीपणे कार्यरत असल्यामुळे त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. राऊत हे मुंबईत वास्तव्याला असले तरी गणपती, यात्रा-जत्रा, मतदारसंघातील पक्षाचे कार्यक्रम, कार्यकर्त्यांचे कार्यक्रम, भेटीगाठी, डीपीडीसी बैठका या माध्यमातून सातत्याने मतदारसंघात उपस्थिती लावायचे.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

विनायक राऊत हे सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करतात. लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघातील विकासकामांची माहिती, तसेच मतदारसंघातील दौरे आणि महत्वाच्या घडामोडी ते सोशल मीडियावर शेअर करताना दिसून येतात. त्याचसोबत पक्षाचे प्रवक्ते म्हणून आपली भूमिका ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्रमकपणे मांडतात. याचबरोबर राणे कुटुंबीयांकडून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात होणाऱ्या टिकेलाही ते सोशल मीडियाच्या माध्यमातून सडेतोड उत्तर देताना दिसून येतात. शिवसेना फुटीनंतर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाची बाजू मांडली होती.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate):

विनायक राऊत आक्रमक शिवसेना नेते आहेत. ते सातत्याने सडेतोड भूमिका मांडतात. पक्षाच्या भूमिका मांडत असताना किंवा राणे गटाला विरोध करत असताना त्यांनी अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे ते टिकेचे धनीही झाले आहेत. नुकतेच त्यांनी एनडीएमध्ये गडकरींना डावलले जात असल्याचे वक्तव्य करताना नितीन गडकरी यांनी इंडिया आघाडीमध्ये यावे. आम्ही त्यांना पंतप्रधान करू, अशी खुली ऑफर दिली होती. भाजपचा नितीन गडकरी यांना संपवण्याचा डाव असल्याचेही विधान विनायक राऊत यांनी केले होते.

याखेरीज शिवसेना पक्ष फुटल्यानंतर विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांवर सातत्याने विखारी टीकेचे बाण सोडले आहेत. नुकतेच त्यांनी शिंदे गट म्हणजे खाल्ल्या ताटात घाण करणारी ही राजकीय अवलाद असल्याची सडकून टीका केली होती. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला होता.

शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी वर्षा निवासस्थान सोडलं, त्यावेळी महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला वाईट वाटले. मात्र बंडखोर आमदार हे गुवाहाटीमध्ये पेढे वाटून नाचत होते. या बेईमानीच्या अवलादींना काय म्हणावे अशी जहरी टीका राऊत यांनी शिंदे गटावर केली होती. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री चाटू आणि देवेंद्र फडणवीस संधीसाधू असल्याचे विधान त्यांनी केले होते. विनायक राऊत यांनी 2022 मध्ये राज ठाकरे हे एक करमणुकीचे केंद्र असून त्यांचा मनसे हा भाडोत्री पक्ष असल्याचा घणाघात केला होता.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru):

बाळासाहेब ठाकरे

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate):

विनायक राऊत हे विद्यमान खासदार असून त्यांनी दोन टर्म मतदारसंघात विकासकामे केली आहेत. ती कामे घेऊन ते जनतेसमोर जातील. याशिवाय कोकणातील मतदार हा नेहमीच ठाकरे परिवाराच्या पाठिशी राहिला आहे. आता शिवसेना फुटीनंतर राऊत हे ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहिले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाबाबत असलेल्या सहानुभूतीच्या लाटेचा त्यांना नक्कीच फायदा होईल. या शिवाय बारसू प्रकल्पाला ठाकरे गटाचा विरोध आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून नाणार प्रकल्पाबाबत दबावाचे राजकारण केले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीतील बारसू भागात रिफायनरीविरोधात स्थानिकांनी मोठे आंदोलन उभे केले होते. स्थानिकांच्या आंदोलनाला विनायक राऊतांनी पाठिंबा दिला आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले होते. त्याचा विनायक राऊतांना फायदा होण्याची शक्यता आहे. राऊत यांनी अदानी समूहाने संगमेश्वर तालुक्यात शेकडो हेक्टर शेतजमीन लाटल्याचा प्रकार उघडकीस आणला होता. त्यामुळे कोकणातील मतदारांमध्ये राऊत यांच्याबद्दल एक विश्वासार्ह लोकप्रतिनिधी,असा सकारात्मक दृष्टीकोण तयार झाला आहे.

Vinayak Raut
Raosaheb Danve : राम मंदिर आंदोलन अन् संसदेवरील हल्ल्याचा प्रसंग अडवाणींनी कसा हाताळला; रावसाहेब दानवे आठवणीत रमले

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate):

विनायक राऊत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे दोन टर्म नेतृत्व केले असले तरी, त्यावेळी ते युतीचे उमेदवार म्हणून होते. मात्र आता मतदारसंघातील राजकीय समीकरणे बरीच बदलेली आहेत. भाजपने आपली ताकद वाढवण्यासाठी कोकणातील मातब्बर अशा राणे कुटुंबाला ताकद दिली आहे. नितेश राणे भाजपचे आमदार आहेत, तर नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी देण्यात आली. भाजपने दिलेल्या ताकदीच्या जोरावर राणेंचे कमबॅक झाले आहे. त्यातच आता शिवसेना फुटीनंतर शिंदे गटामुळे युतीची ताकद आणखी वाढली आहे.

परिणामी, विनायक राऊत यांच्यापुढे आव्हाने वाढली आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेची ताकद विभागली गेली आहे. दीपक केसरकर, उदय सामंत हे शिंदे गटात गेले आहेत. त्यांची मते आता विनायक राऊत यांच्या पाठिशी राहणार नाहीत. त्यातच आता शिंदे गटाकडून किरण सावंत यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. एकीकडे भाजपकडून राणे किंवा प्रमोद जठार आणि शिंदे गटाकडून उमेदवार उभा राहिल्यास किरण सावंत यांचे महायुतीकडून विनायक राऊत यांना तगडे आव्हान असेल.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

सद्यस्थितीत शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसची महाआघाडी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा केला आहे. जागावाटपात हा मतदारसंघ ठाकरे यांनाच सुटण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या ठिकाणी विनायक राऊत यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पुन्हा उमेदवारी मिळाल्यास राऊत हे या मतदारसंघातून विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी निवडणुकीच्या आखाड्यात उतरतील.

दरम्यान, सद्यस्थितीत ठाकरे गट अथवा महाआघाडीकडे विनायक राऊत यांच्याशिवाय दुसरा ताकदीचा उमेदवार नाही. त्यामुळे विनायक राऊत यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे. या मतदारसंघात विनायक राऊत यांच्याविरोधात भाजपकडून प्रमोद जठार यांचे नाव पुढे केले जात आहे. असे असले तरी शिंदे गटानेही या मतदारसंघावर दावा केला आहे. शिंदे गटाकडून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांना लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी करण्यात येत आहे. युतीच्या जागावाटपानंतर या मतदारसंघातील चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Vinayak Raut
MP Shriniwas Patil : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी; खासदार श्रीनिवास पाटील बॅनरवरून गायब

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com